प्रस्तावित वीज उपकेंद्रासाठी स्थळ पाहणी

प्रस्तावित वीज उपकेंद्रासाठी स्थळ पाहणी

Published on

विरार, ता. १५ (बातमीदार) : विरार-मनवेलपाडा येथील प्रस्तावित वीज उपकेंद्र जागा निश्चितीनिमित्ताने महावितरणचे प्रभारी कार्यकारी अभियंता ईश्वर भारती यांनी अभियंत्यांसह मंगळवारी (ता. १५) स्थळ पाहणी केली. बहुजन विकास आघाडीचे संघटक अजीव पाटील आणि माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांनी या केंद्रासाठी मनवेलपाडा-रेल्वे कल्व्हर्टशेजारील सरकारी, तसेच खासगी जागांचा पर्याय सूचवला आहे. त्या अनुषंगाने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या जागांची प्राथमिक पाहणी केली.

विविध वीज समस्यांवर बविआने माजी आमदार क्षितिज ठाकूर यांच्या नेतृत्वात महावितरणविरोधात रविवारी (ता. १३) मोर्चाचे आयोजन केले होते. समस्याग्रस्त ग्राहकांनी अधिकाऱ्यांसमोर आपली कैफियत मांडली होती. प्रसंगी महावितरणला येणाऱ्या अडचणी आणि अडथळ्यांबाबत अधिकाऱ्यांनीही खंत व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांच्या समस्या सोडविल्या जाव्यात, याकरिता महावितरणला आवश्यक त्या ठिकाणी सहकार्य करू, असा विश्वास बहुजन विकास आघाडीने दिला होता. या पार्श्वभूमीवर महावितरणचे प्रभारी कार्यकारी अभियंता ईश्वर भारती यांनी स्थळ पाहणी केली. या केंद्रासाठी सोयीस्कर जागा उपलब्ध झाल्यास मनवेलपाडा वफुलपाडा परिसरातील वीजग्राहकांना आणखी चांगल्या पद्धतीने वीजपुरवठा करता येऊ शकेल, असा विश्वास ईश्वर भारती यांनी व्यक्त केला.

Marathi News Esakal
www.esakal.com