बोलीभाषेच्या संवर्धनासाठी एक पाऊल पुढे

बोलीभाषेच्या संवर्धनासाठी एक पाऊल पुढे

Published on

आगरी भाषा संवर्धनासाठी युवकांचा पुढाकार
आगरी ग्रंथालय चळवळ संस्थेची स्थापना

कल्याण, १५ (वार्ताहर) : आगरी भाषेच्या संवर्धनासाठी युवा साहित्यिक सर्वेश तरे, गायक-गीतकार दया नाईक, आगरी संस्कृती अभ्यासक मोरेश्वर पाटील, चित्रकार प्रकाश पाटील यांनी आगरी ग्रंथालय चळवळ संस्था स्थापन केली. संस्थेने आगरी ग्रंथालय, आगरी शाळा, सरावनसरी-आगरी साहित्य संमेलन, संपूर्णतः आगरी-कोळी बोलीतील ‘ब-बोली’ पुस्तिका असे विविध उपक्रम राबविले आहेत. तसेच सध्या आगरी बोलीच्या संवर्धनासाठी सक्रिय सदस्यांची नुकतीच नियुक्ती केली आहे. विविध क्षेत्रांतील कार्यरत व्यक्तींना त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून या चळवळीचे सक्रिय सभासदत्व बहाल केले आहे.

नवीन सदस्यांमध्ये साहित्य, शिक्षण, वैद्यकीय, कायदेशीर, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांतील प्रतिनिधित्व आहे. आगरी बोली भाषेच्या संवर्धनासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे, असे मत चळवळीच्या संयोजकांनी व्यक्त केले. या यादीत डॉ. अनिल रत्नाकर (डोंबिवली) यांचा समावेश आहे. ते निळजे गावात गेली अनेक वर्षे रुग्णसेवा करीत आहेत. ब्राह्मण समाजाचे असूनही त्यांनी ‘ब’ या टोपणनावाने आगरी कवितांचे पुस्तक प्रकाशित करून आगरी साहित्यात भरीव योगदान दिले आहे.

प्रा. प्रीतम टकले (उरण) हे एमए, बी.एड. असून, पदाजी पांडुरंग मुंबईकर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्राचार्य आहेत. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच बोली भाषेच्या जपणुकीसाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. कवी श्याम माळी (बदलापूर) हे शिक्षक असून, त्यांनी अनेक आगरी कविता, गीते व पुस्तकांचे लेखन केले आहे. विविध साहित्यिक उपक्रमांत त्यांचा सहभाग आहे. डॉ. मनोज घनघाव (भिवंडी) हे समुपदेशक असून, आगरी समाजातील मानसिक आरोग्य, संवाद आणि समाजभान यावर लक्ष केंद्रित करीत आहेत.

चळवळीला नवचैतन्य
मीनल माळी (उरण) या शिक्षिका असून, आगरी कविता लेखनात त्यांचा विशेष सहभाग आहे. त्या विद्यार्थ्यांमध्ये बोली भाषेची गोडी निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर उज्ज्वला पाटील सध्या अमेरिकेत सॉफ्टवेअर टेस्टर म्हणून कार्यरत आहेत. त्या समाजमाध्यमांद्वारे आगरी बोली टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. वेदिका भोईर (कल्याण) या बॉम्बे हायकोर्टमध्ये वकिली करीत आहेत. नितेश पाटील (डोंबिवली - शिरढोण) हे ऐतिहासिक दुर्ग संवर्धनाचे कार्य करीत असून, आगरी मातीशी घट्ट नाते टिकवले आहे. या नवीन सदस्यांच्या सहभागामुळे ‘आगरी ग्रंथालय चळवळी’ला नवचैतन्य प्राप्त होईल, अशी अपेक्षा आगरी संस्कृती अभ्यासक मोरेश्वर पाटील यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com