खारघरमधील स्वच्छतागृहांची दुरवस्‍था

खारघरमधील स्वच्छतागृहांची दुरवस्‍था

Published on

खारघरमधील स्वच्छतागृहांची दुरवस्‍था
बहुतांश ठिकाणी दिवे बंद, पाण्याची टाकी कोरड्या अवस्थेत
खारघर, ता. १५ (बातमीदार) : शैक्षणिकदृष्ट्या महत्त्व आलेल्या खारघरमध्ये सध्या स्‍वच्‍छतागृहांची दुरवस्‍था झालेली पाहायला मिळत आहे. पूर्वी ग्रामपंचायत असताना स्वच्छतागृहाची देखभाल केली जात असे, मात्र पालिका अस्तित्वात आल्यानंतर प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने स्‍थानिकांसह बाहेरून आलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. बहुतांश स्वच्छतागृहातील पाण्याच्या टाक्या कोरड्या पडल्या असून, अनेक ठिकाणी दिवे बंद आहेत, तर काही ठिकाणी दरवाजे गायब झाले आहेत. विशेष म्हणजे काही स्वच्छतागृहावर महिला आणि पुरुष असे नमूद नसल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम परसरत आहे.
पनवेल महापालिका अस्तित्वात येण्यापूर्वी खारघर आणि ओवे गट ग्रामपंचायत हद्दीतील खारघर, कोपरा, मुर्बी, ओवे, पेठगाव, खुटूकबांधण आणि ओवे कॅम्प आदी ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहाची योग्य प्रकारे देखभाल केली जात होती, मात्र त्‍यानंतर महापालिका अस्तित्वात आल्यानंतर प्रशासनाकडून स्‍वच्‍छतागृहांच्या देखभालीकडे दुर्लक्ष करण्यात आले. खारघर, कोपरा आणि बेलपाडा गावात तळमजल्यावर महिलांसाठी तर पहिल्या मजल्यावर पुरुषांसाठी स्वच्छतागृहाची सोय केली आहे. येथील स्वच्छतागृहाच्या टाइल्स निखळल्या आहेत. पहिल्या मजल्यावरील वीज दिवे बंद आहेत. बेसिंगमधील नळ गायब झाले आहेत. परिसरातील बहुतांश स्वच्छतागृहातील पाण्याच्या टाक्‍या कोरड्या पडल्या आहेत, तर काही स्वच्छतागृहातील पाण्याच्या टाक्‍या उघड्या अवस्थेत असल्यामुळे लहान मुले पडून अपघात होण्याचा धोका आहे. ओवेगावातील स्वच्छतागृहातील दरवाजे मोडकळीस आले असून, पाण्याची टाकी दगड आणि कचऱ्यांनी भरून वाहत आहे. मुर्बीगाव आणि बेलपाडा गॅरेज लाइन येथील स्वच्छतागृहावर महिला व पुरुष असे नमूद नसल्यामुळे नव्याने आलेल्या व्यक्ती संभ्रमात पडत आहेत. ओवे कॅम्प गावात ग्रामपंचायत काळातील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे.
...................
पालिकेने बेलपाडा गॅरेज लाइन शेजारील टेकडीच्या पायथ्याशी स्वच्छतागृह उभारले आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी कोणतीही वस्ती नाही. शिवाय रस्त्याच्या कडेला गॅरेज लाइनमधील दुकानात स्वछतागृह असताना पालिकेने लाखो रुपये खर्च करून स्वच्छतागृह कोणासाठी उभारले आहे, असा सवाल केला जात आहे. शिवाय या स्वच्छतागृहाच्या परिसरात दिवाबत्ती नसल्याने रात्रीच्यावेळी अंधार असतो. त्‍यामुळे काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास कोण जबाबदार, असे नागरिकांकडून विचारले जावू लागले आहे.
......................
कोट
महापालिकेकडून स्वच्छतागृह साफसफाईचा ठेका दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी अचानक भेट देऊन माहिती घेणे आवश्यक आहे, मात्र अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे गावातील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. तसेच परिसरात पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
- अवचित राऊत, सहसचिव युवासेना (ठाकरे गट)
.................
कोट
महापालिकेडून नियमितपणे स्वच्छतागृहाची देखरेख आणि साफसफाई केली जाते. तसेच मोडकळीस आलेले दरवाजे बसविले जातात, शिवाय विद्युत सोयदेखील केली जाते, मात्र दरवाजा व दिवे नागरिक चोरी करून घेऊन जातात, नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.
- वैभव विधाते, उपायुक्त, पनवेल महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com