मुंबईतून जलमार्गाने नवी मुंबई विमानतळावर
जलमार्गाने थेट नवी मुंबई विमानतळावर
कुलाबा येथील रेडिओ क्लब जेट्टीला न्यायालयाची मंजुरी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : गेटवे ऑफ इंडियावरील वाढता ताण कमी करण्यासाठी कुलाबा येथील अत्याधुनिक रेडिओ क्लब जेट्टी प्रकल्पाला अखेर न्यायालयाने मंजुरी दिली आहे. २०२७ पर्यंत ही जेट्टी पूर्ण होणार असल्याने मुंबईतून जलमार्गाने थेट नवी मुंबई विमानतळापर्यंत जाता येणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने प्रकल्पाविरोधातील तीन याचिका फेटाळत सागरी महामंडळाच्या बाजूने निर्णय दिला. प्रकल्प राबवताना काही महत्त्वाच्या अटींचे पालन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. प्रकल्पाचा उद्देश प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा असून, त्यासोबतच्या इतर सुविधा केवळ पूरक असाव्यात आणि पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, याची काळजी घेण्याचा आदेशही दिला आहे. त्यामुळे हा प्रकल्प सार्वजनिक हिताचा असून, पर्यटन आणि सागरी वाहतुकीला चालना देणारा ठरणार आहे.
-------------------------------------------------
प्रकल्पाचा खर्च २२९ कोटींवर
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी २०२३ मध्ये निविदा काढण्यात आल्या होत्या. सुरुवातीला दोन टप्प्यांत कामाची आखणी करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात सहा तराफ्यांसाठी ८० कोटींची तरतूद होती, मात्र केंद्र सरकारच्या सूचना मान्य करत अखेर एकाच टप्प्यात १० तराफे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे लागलेल्या अवधीमुळे प्रकल्पाचा खर्च तब्बल १६० कोटींवरून २२९ कोटींवर गेला.
ग्राफिक्स -
जेट्टीची वैशिष्ट्ये
- जेट्टी समुद्रात २०० मीटर लांब असणार.
- एकाच वेळी २० फेरी बोटी थांबण्याची सुविधा.
- १० तराफे असलेली जेट्टी.
- २०२७ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट.
- सर्व परवानग्या व मंजुरी प्राप्त.
--------------------------------
गेटवेवरील ताण कमी होणार
सध्या गेटवेवर फक्त तीन तराफ्यांमधून ९२ फेरी बोटी चालक सेवा देतात. परिणामी, आठवड्याच्या सुट्ट्यांच्या दिवशी एलिफंटा तसेच अलिबागकडे जाणाऱ्या पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळते. त्यामुळे प्रवाशांच्या गर्दीतून हेरिटेज असलेल्या गेटवेला मोकळे करण्यासाठी रेडिओ क्लब परिसरातील अत्याधुनिक नवी जेट्टी उभारण्यात येणार आहे. या जेट्टीमुळे ही गर्दी कमी होणार आहे. तसेच प्रवाशांचा वेळ, पैशांची बचत होईल.
-----------------------------
‘ब्लू इकॉनॉमी’ ला गती
या प्रकल्पामुळे राज्य सरकारच्या ‘ब्लू इकॉनॉमी’धोरणाला मोठा हातभार लागणार आहे. पर्यटनवाढीबरोबरच जलमार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढेल. मांडवा, अलिबाग, एलिफंटा यांसारख्या पर्यटनस्थळांना वेगाने पोहोचता येणार आहे. विशेष म्हणजे, सागरी महामंडळाने हे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी विशेष तांत्रिक टीम तैनात केली असून, रात्रीच्या वेळेतही काम सुरू ठेवण्याचा निर्धार आहे.
------------------------------------
विमान प्रवाशांना दिलासा
- जेट्टीचा सर्वात मोठा फायदा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी होणार आहे. या विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असून, २०२५ च्या अखेरीस पहिले टप्पे सुरू होणार आहेत. दरवर्षी नऊ कोटी प्रवाशांची क्षमता असलेला हा देशातील एक प्रमुख विमानतळ आहे. याच पार्श्वभूमीवर सागरी महामंडळाने कुलाबा (रेडिओ क्लब) आणि डोमेस्टिक क्रूझ टर्मिनस येथून नवी मुंबई विमानतळावर थेट जलमार्गाचा आराखडा तयार केला आहे. हायस्पीड वॉटर टॅक्सीद्वारे प्रवाशांना अवघ्या १५-२० मिनिटांत विमानतळ गाठता येणार आहे. याशिवाय अदाणी समूह रेडिओ क्लब जेट्टीवर बॅगेज व पासपोर्ट तपासणी केंद्र सुरू करण्याच्या तयारीत आहे. यामुळे प्रवाशांना दक्षिण मुंबईतूनच चेक-इन करण्याची सुविधा मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.