
ठाण्याचा विकास दावणीला
पालिकेत १६६ अभियंत्यांची पदे रिक्त; कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : महापालिकेच्या आस्थापनेवर असलेले अनेक अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. दुसरीकडे भरती प्रक्रिया राबविण्यात येत नसल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. अशातच शहराच्या विविध विकासकामांची मदार असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागातील ३०० पैकी १६६ अभियंत्यांची पदे रिक्त असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे अभियंत्यांवर अतिरिक्त ताण येत असून, त्यांच्या आरोग्यावरदेखील परिणाम होत आहे. याचा विकासकामांवरदेखील परिणाम होत आहे.
ठाणे पालिका क्षेत्रातील लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार १८ लाख ४१ हजार इतकी आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांत ठाणे शहराचे झालेले विस्तारीकरण, वाढलेल्या गृहसंकुल प्रकल्पांमुळे शहराच्या लोकसंख्येत वाढ झाली असून, सोयीसुविधांवरदेखील ताण वाढत आहे. अशातच ठाणेकरांना मूलभूत सेवासुविधा पुरविण्याची जबाबदारी असलेल्या पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडू लागली आहे. ठाणे पालिका सेवेतून दरमहा १५ ते २० कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. दुसरीकडे भरती प्रक्रिया राबविण्यात येत नसल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील ताण वाढत आहे. हा ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने आकृतीबंधामध्ये ८८० वाढीव पदांना मंजुरी दिली; मात्र ही भरती काही कारणास्तव होऊ शकलेली नाही. यामुळे पालिकेत सद्य:स्थितीत कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा दुहेरी ताण वाढला आहे.
शहरातील विकासकामांत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांचीदेखील पोकळी निर्माण होत आहे. नागरी प्रकल्पांची आखणी करून त्याची अंमलबजावणी करण्याचे काम अभियंते करतात. पाणीपुरवठा, रस्ते सुस्थितीत ठेवणे अशी महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात येते. असे असताना पालिका सेवेतील ३०० मंजूर पदांपैकी १६६ पदे रिक्त असून, केवळ १३४ पदांवर अभियंते कार्यरत आहेत. यामध्ये कनिष्ठ अभियंता (१) या संवर्गातील मंजूर १२६ पदांपैकी ४६ पदे कार्यरत असून, ८० पदे रिक्त आहेत. तर कनिष्ठ (२) या संवर्गतील मंजूर ६८ पदांपैकी दोन पदे कार्यरत असून, ६६ पदे रिक्त आहेत.
ठाणे पालिका सेवेत कर्मचारी
ठाणे महापालिकेची स्थापना १९८२ मध्ये झाली असून, ही ‘ब’ वर्ग महापालिका आहे. ठाणे महापालिकेत शिक्षण मंडळासह ९,०८८ तर परिवहन सेवेत दोन हजार ६०० कर्मचारी आहेत. तसेच सुमारे अडीच हजार कंत्राटी कामगार आहेत.
रिक्त पदे आकडेवारी
पद मंजूर पदे कार्यरत रिक्त
नगर अभियंता १ १ -
अति. नगर अभियंता १ - १
उप नगर अभियंता ४ - ४
शहर विकास नियोजन १ - १
कार्यकारी अभियंता ३४ २७ ७
उप अभियंता ६५ ५८ ७
कनिष्ठ अभियंता (१) १२६ ४६ ८०
कनिष्ठ अभियंता (२) ६८ २ ६६
एकूण ३०० १३४ १६६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.