हिंदीसक्तीची लटकती तलवार कायम

हिंदीसक्तीची लटकती तलवार कायम

Published on

हिंदीसक्तीची लटकती तलवार कायम
हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
भाईंदर, ता. १५ (बातमीदार) : तीव्र विरोधानंतर राज्य सरकारने हिंदीसक्तीचा आदेश मागे घेतला आहे. असे असले तरी या विषयावर सरकारने नियुक्त केलेल्या नरेंद्र जाधव समितीचा अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रावर हिंदीसक्तीची तलवार कायम लटकत आहे; मात्र सत्ताधाऱ्यांचा हा कुटील डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मंगळवारी (ता. १५) दिला. मिरा रोड येथे मराठी भाषेवरून उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून ‘आम्ही मराठी आम्ही भारतीय’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला सपकाळ यांनी मार्गदर्शन केले.
इतर भाषांचा आदर करत असताना मराठी भाषेचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, ही काँग्रेसची भूमिका आहे. हिंदी, हिंदुत्व व हिंदू राष्ट्र अशी मांडणी भाजपला करायची आहे. त्यासाठीच भाजपचा हिंदीचा आग्रह आहे. हिंदी ज्या ठिकाणी बोलली जाते, त्या ठिकाणी कमळ उगवते असा भ्रमही भाजपला आहे. मराठी संत वाड्मय हिंदू धर्मात बसत नाही का, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम भाजपला व हिंदुत्वाला मान्य नाही का, आपल्या बोलीभाषेतील शब्द भाजपला मान्य नाहीत का, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत, असे सपकाळ यांनी या वेळी सांगितले.
मिरा रोडमध्ये भाषेच्या नावावर जो धिंगाणा घालण्यात आला त्याचा आम्ही निषेध करतो. या घटनेमुळे दुर्दैवाने मिरा रोड हे तणावाचे क्षेत्र निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर आम्ही मराठी आहोत व आम्ही भारतीय आहोत ही सामंजस्याची व शाश्वत भूमिका घेऊन काँग्रेसने या ठिकाणी ‘आम्ही मराठी आम्ही भारतीय’ कार्यशाळेचे आयोजन केले असल्याचे सपकाळ यांनी सांगितले. या वेळी प्रदेश कार्यकारी अध्यक्ष मुझफ्फर हुसेन, मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार उपस्थित होते.

काॅंग्रेस मराठीसह अन्य प्रत्येक भाषेसोबत
आम्ही मराठी भाषा सर्वांना शिकवू व मराठी भाषा टिकवू ही आमची भूमिका आहे. काँग्रेस यावर कोणतेही राजकारण करत नाही. पं. जवाहरलाल नेहरू यांनी जो तीन भाषांचा फॉर्म्युला सांगितला होता, त्यावर काँग्रेस आजही कायम आहे. आम्ही संविधानासोबत असून, मराठी भाषा तसेच भारतातील प्रत्येक भाषेसोबत आहोत, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी या वेळी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com