थोडक्‍यात बातम्या रायगड

थोडक्‍यात बातम्या रायगड

Published on

विद्यार्जनासाठी चिखलातून वाट
लोधिवलीतील सेंट जोसेफ शाळेतील विद्यार्थ्यांचे हाल
खालापूर, ता. १६ (बातमीदार) ः जलवाहिनीसाठी सुरू असलेले खोदकाम, त्‍यातच पावसाळ्यात जमा झालेल्या चिखलातून लोधिवलीतील सेंट जोसेफ शाळेतील विद्यार्थ्यांना वाट काढत शाळा गाठावी लागत आहे. त्‍यातच शाळा व्‍यवस्‍थापनदेखील विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी येणाऱ्या बसलादेखील परवानगी देण्यात येत नसल्याने बाहेरच चिखलात उतरून प्रवेश करावा लागत आहे. यामुळे पालकवर्गामध्ये संतापाचे वातावरण आहे.
लोधिवली येथील सेंट जोसेफ शाळेकडे जाण्याचा मार्ग महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पनवेल यांच्या मालकीचा आहे. सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असल्याने लोखंडी पाइप, मशिनरी यामुळे हा मार्ग चिखलमय झाला आहे. त्यातच विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी येणाऱ्या बसना शाळा व्यवस्थापन प्रवेशद्वाराच्या आतमध्ये प्रवेश देत नसल्याने बाहेर उतरून चिखलातून वाट काढावी लागत आहे. पालकदेखील या प्रकाराने संतप्त झाले आहेत. दरम्यान, याप्रकरणी स्थानिक राजकीय नेत्यांनीदेखील विद्यार्थ्यांचे हाल होऊ नये, यासाठी बस शाळेच्या आवारात घ्याव्यात, अशी विनंती शाळा व्‍यवस्‍थापनाकडे केली आहे; मात्र शाळा व्‍यवस्‍थापनाकडून अद्यापही कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. तसेच प्राधिकरणाने दुरुस्‍तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी पालकवर्गातून केली जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत जलवाहिनीचे काम प्रगतिपथावर असून या ठिकाणी शाळेचे विद्यार्थी व वाहनांची मोठी वर्दळ असते. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याबाबत शाळा प्रशासनाने आपल्या स्तरावरून आवश्यक ती उपाययोजना करावी. शाळेच्या आवारात वाहनांचे पार्किंग दिल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता आर. टी. वायदंडे यांनी सांगितले.
.................
लग्नव्यवस्था आधिक सक्षम होणे ही काळाची गरज : डॉ. गौरी कानिटकर
रोहा, ता. १६ (बातमीदार) ः हिंदुसंस्कृतीचा पाया असलेली लग्नव्यवस्था अधिक सक्षम होणे ही काळाची गरज असल्याचे मत अनुरूप विवाह संस्थेच्या संचालिका डॉ. गौरी कानिटकर यांनी प्रकट मुलाखतीत व्यक्त केले. ब्राह्मण मंडळ रोहाच्या श्री धावीर नाम सप्ताहाचे यंदाचे १२५वे वर्ष असून त्यानिमित्ताने अनेक दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन रोह्याच्या श्री ओंकारेश्वर मंदिरात करण्यात आले आहे. मंगळवार (ता. १५) रोजी सुप्रसिद्ध अनुरूप विवाह संस्थेच्या संचालिका डॉ. गौरी कानिटकर यांच्या ‘लग्न बदलतंय’ या विषयावरील प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध वक्त्या ॲड. पल्लवी दाते यांनी अत्यंत खुमासदार शैलीत ही मुलाखत घेतली. लग्न ठरणे, लग्न टिकणे, लग्न बहरणे या विषयातील विविध पैलू उपस्थितांसमोर मांडताना, या विषयातील बारकावे त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष अमित आठवले, सचिव निखिल दाते, सप्ताहप्रमुख महेश पेंडसे, उपाध्यक्ष सुहास फडके, खजिनदार उमेश जोशी, सदस्य प्रज्वल बापट, प्रतीक पाटणकर, स्वाती पेंडसे, स्मृती जोशी आदींसह सर्व ज्ञातीबांधवांनी अथक परिश्रम घेतले. दिवसभर पावसाची संततधार असूनही कार्यक्रमाला रोहेकरांनी चांगली गर्दी केली होती.
.............
पीएनपी महाविद्यालयात रेड रिबीन क्लबवर जिल्हास्तरीय कार्यशाळा
अलिबाग (वार्ताहर) : प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील (पीएनपी) राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (ता. १५) रेड रिबीन क्लबच्या संदर्भात जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे संचालक विक्रांत वार्डे उपस्‍थित होते. रायगड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील रेड रिबीन क्लबचे नोडल अधिकारी आणि जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथील विविध पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली होती.
जिल्हा सामान्य रुग्णालय येथील जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाचे संजय माने यांनी या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेल्या सर्वांना मार्गदर्शन केले. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. टी. पी. मोकल, विभागीय समन्वयक प्रा. डॉ. प्रवीण गायकवाड आणि प्रा. डॉ. दत्ता हिंगमिरे यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. पीएनपी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रवींद्र पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनामधून रेड रिबीन क्लबसंदर्भात माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. या कार्यशाळेला जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग येथील रवींद्र कदम, संपदा मलेकर, रुपेश पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. मिलिंद घाडगे, प्रा. पूजा पाटील, प्रा. कैलाससिंग राजपूत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पीएनपी कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. दिनेश पाटील यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com