ग्रामीण आरोग्य विभागाचा गलथानपणा
ग्रामीण आरोग्य विभागाचा गलथानपणा
एकट्या डॉक्टरांकडे बोर्लीपंचतन रुग्णालयाचा भार
श्रीवर्धन, ता. १६ (बातमीदार) ः श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर गेल्या काही महिन्यांपासून केवळ एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर ताण पडला आहे. परिणामी या भागातील आरोग्यसेवा विस्कळित झाली असून, रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. याशिवाय कायमस्वरूपी सफाई कर्मचारी नसल्याने स्वच्छतेचा मुद्दादेखील समोर आला आहे.
बोर्लीपंचतन हे श्रीवर्धन तालुक्यातील एक महत्त्वाचे किनारपट्टीवरील गाव आहे. येथील आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात दांडगुरी, आसुफ, खुजारे, दिवेआगर, वडवली, वेळास, आदगाव दिघी व आजूबाजूच्या अनेक गावांचा समावेश होतो. या संपूर्ण परिसरातील हजारो नागरिकांसाठी हे आरोग्य केंद्रच एकमेव सरकारी उपचार केंद्र आहे. ओपीडी तपासण्या, लसीकरण, प्रसूतीपूर्व तपासण्या, बालसंगोपन सेवा, अपघातग्रस्त रुग्णांचे प्राथमिक उपचार, शाळा तपासण्या, तसेच हिवताप, डेंगी, लेप्टो अशा साथ रोगांविरोधातील प्रतिबंधात्मक उपाययोजना या साऱ्याची जबाबदारी याच केंद्रावर आहे. पाऊस व पर्यटन हंगामात कोकणात पर्यटकांची वर्दळ वाढल्याने, आकस्मिक रुग्णसेवेची गरज अधिक भासत असते. अशा वेळी केवळ एक डॉक्टर उपलब्ध असल्यामुळे रुग्णांवर वेळेवर उपचार मिळण्यास अडथळे निर्माण होत आहेत.
.........................
रुग्णांचे हाल, डॉक्टरही त्रस्त
दिवसातून जवळपास ८० रुग्ण येतात. त्यात गर्भवती महिलांची तपासणी, आपत्कालीन प्रसूती, शाळेतील आरोग्य तपासण्या, घरभेटी, लसीकरण असे सर्वच प्रकार आहेत. आपण मनापासून सेवा देतो, मात्र एका डॉक्टरकडून एवढी कामे होणे अशक्य आहे, असे मत सध्या कार्यरत असलेल्या डॉक्टरांनी व्यक्त केले.
....................
लोकप्रतिनिधींचीही उदासीनता
बोर्लीपंचतन व परिसरातील लोकसंख्या वाढत असून आरोग्य सुविधा अधिक सक्षम होणे आवश्यक आहे, मात्र ना लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून, ना आरोग्य खात्याच्या प्रयत्नांमधून ही स्थिती बदलताना दिसून येत आहे.
...................
कोट
बोर्लीपंचतन रुग्णालायात जायला कुणी तयार होत नाही; मात्र लवकरच मुलाखत घेऊन नवीन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येईल.
- नेहा भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी, अलिबाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.