क्रांतिवीर भगतसिंग'' शाळेच्या दुरुस्तीला सुरुवात
क्रांतिवीर भगतसिंग शाळेच्या दुरुस्तीला सुरुवात
टिटवाळा, ता. १६ (वार्ताहर) : पालिकेच्या क्रांतिवीर भगतसिंग शाळेची दुरवस्था झाली आहे. याबाबत ‘सकाळ’ने बुधवारी (ता. १६) ‘गळक्या छताखाली शिक्षणाचे धडे’ या मथळ्यासह वृत्त प्रसिद्ध केले होते. या बातमीनंतर क्रांतिवीर भगतसिंग मराठी शाळा क्र. ३० येथील धोकादायक अवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष गेले आहे. तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शाळेच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू केले.
शाळेची जीर्ण, मोडकळीस आलेली इमारत, गळके छत, कुजलेले दरवाजे, भेगाळलेल्या भिंती आणि पाण्याच्या अस्वच्छ टाक्यांमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला होता; मात्र वृत्त प्रसिद्ध होताच शाळेच्या गळक्या छतावर नवे पत्रे बसवण्यात येत आहेत; तर भिंतींचे प्लॅस्टर सुरू आहे. जुनाट खिडक्या, दरवाजे बदलण्यात येत आहेत. याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले असून, प्रशासनाने केवळ डागडुजीवर न थांबता संपूर्ण इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित्वात असलेल्या या शाळेची अवस्था मागील काही वर्षांपासून अत्यंत दयनीय बनली होती. विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण करणारी ही परिस्थिती अनेकदा दुर्लक्षित करण्यात आली; मात्र सकाळच्या वृत्तानंतर यंत्रणा कामाला लागली. वृत्ताची आयुक्तांनी दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या आहेत. तसेच शाळेची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले.
स्थानिक माजी नगरसेवक संतोष तरे यांनी ‘सकाळ’चे आभार मानत म्हटले, गेल्या कित्येक महिन्यांपासून पाठपुरावा करूनही पालिका काही करत नव्हती; मात्र ‘सकाळ’ने बातमी प्रसिद्ध करताच प्रशासन जागे झाले, तर राजे ग्रुपच्या महेश एगडे यांनी म्हटले की, ही सुरुवात आहे, पण ही इमारत भगतसिंग यांच्या नावाला साजेशी होईपर्यंत आमचा लढा थांबणार नाही. बुधवारी सकाळी ९ वाजताच बांधकाम विभागाचे कर्मचारी शाळेत दाखल झाले. तातडीने या ठिकाणी बांधकाम साहित्य आणले, तसेच कामगार बोलावून डागडुजीचे कामही सुरू केले आहे.
समाजमाध्यमावर संतापाची लाट
‘सकाळ’च्या वृत्तामुळे या प्रश्नाची दखल घेण्यात आली; मात्र केवळ तात्पुरती दुरुस्ती नको, तर इमारतीच्या संपूर्ण पुनर्बांधणीसाठी पालिका, शासन, स्थानिक संस्था व माध्यमांनी सातत्याने लक्ष द्यावे, अशी मागणी माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत यांच्यासह पालकांनी केली आहे. ‘सकाळ’च्या वृत्तामुळे फक्त स्थानिक प्रशासनच नव्हे, तर समाजमाध्यमावरही एक लाट उसळली. #SaveBhagatSinghSchool हा हॅशटॅग समाजमाध्यमांवर ट्रेंड होताना दिसला. शाळेच्या दुरवस्थेचे फोटो, नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया यामधून प्रशासनाच्या अपयशावर रोष व्यक्त करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.