जुईनगर रेल्वे स्थानकात ना सुविधा, ना सुरक्षा
जुईनगर रेल्वेस्थानकात ना सुविधा, ना सुरक्षा
प्रवाशांचा प्रवास ‘रामभरोसे’; उपाययोजना करण्याची मागणी
जुईनगर, ता. १५ (बातमीदार) : हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील महत्त्वाचे स्थानक म्हणून जुईनगरकडे पाहिले जाते, मात्र मागील काही वर्षांपासून हे रेल्वेस्थानक समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. प्रवाशांना दररोज अनेक अडथळ्यांचा सामना करत प्रवास करावा लागत आहे. स्थानकात स्वच्छतेचा अभाव, अपुरी बैठकव्यवस्था, बंद पडलेल्या पाणपोई, स्थानकाबाहेर फेरीवाल्यांचा सुळसुळाट आणि असुरक्षितता यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
जुईनगर रेल्वेस्थानक पूर्वेकडील औद्योगिक पट्टा आणि पश्चिमेकडील घनवस्तीत राहणाऱ्या नागरिकांसाठी दैनंदिन प्रवासाचे केंद्रबिंदू आहे. या स्थानकावरून दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असते, मात्र मूलभूत सुविधा तोकड्या पडत असल्याने प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. फलाटांवरील अपुरे बाक तेही मोडकळीस आल्याने गंजलेल्या लोखंडी चौकटींवर प्रवाशांना बसावे लागते, तर ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिला यांना उभ्याने गाडीची प्रतीक्षा करावी लागते. स्थानकातील पाणीगळतीने अनेक ठिकाणी घसरून पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
फलाटावरील काही पाणपोई मागील काही महिन्यांपासून पूर्णपणे बंद आहेत, तर काही उघड्या असलेल्या नळांमधून पाणीगळती होत आहे. अनेक ठिकाणी गुटखा, तंबाखू खाऊन थुंकण्यात आल्याने परिसर कमालीचा अस्वच्छ झाला असून, स्थानकाचे विद्रुपीकरण झाले आहे. कचरापेट्यांअभावी कचरा थेट फलाटावर टाकण्यात येत असल्याने प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
संध्याकाळी आणि रात्रीच्या सुमारास स्थानकाच्या प्रवेशद्वारावर काही संशयास्पद आणि उपद्रवी टोळक्यांचा वावर वाढतो. महिला प्रवाशांना याचा विशेष त्रास होत असून, स्थानकात रात्रपाळीतील सुरक्षा रक्षकांची मागणी दिवसेंदिवस तीव्र होत आहे. रेल्वे प्रशासनाने जुईनगर स्थानकातील ही परिस्थिती गांभीर्याने घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी प्रवाशांची मागणी आहे.
.....................
अनधिकृत व्यवसाय
स्थानकाच्या पूर्व परिसरात आणि समोरील रस्त्यावर अनेक व्यापारी अनधिकृत व्यवसाय करत आहेत. काही दुकानमालकांनी दुकानाबाहेरील जागासुद्धा बळकावली आहे. परिणामी स्थानकाच्या पूर्वेकडील रस्त्यावर नियमितपणे वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागतो.
.....................
स्थानकात कुत्र्यांचा वावर
स्थानकात मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. रात्रीच्यावेळी स्थानक परिसरात भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या ठाण मांडून असतात. त्यामुळे प्रवाशांना कुत्र्यांपासून इजा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रेल्वे प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
......................
कोट
जुईनगर स्थानकात अनेक समस्या आहेत, मात्र सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे महिलांच्या सुरक्षेची आहे. स्थानकातील पथदिवे अनेकदा बंद असल्याने अधरांतून ये-जा करावी लागते. त्यामुळे चोरट्यांची भीती वाटते असते. परिणामी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
- सुप्रिया सावंत, जुईनगर, रहिवासी
..............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.