नंदीबाबा उड्डाणपुलावरून संभ्रम
नंदीबाबा उड्डाणपुलावरून संभ्रम
ठाणे शहर, ता. १६ (बातमीदार) : महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यानुसार कोलशेत ढोकाळी रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. कापूरबावडी ते लोढा अमारा संकुलापर्यंत दोन्ही बाजूने ६०-६० फुटांचे रुंदीकरण सुरू आहे; मात्र रस्त्याचे रुंदीकरण सुरू असतानाच आता या रस्त्यावर उड्डाणपूल बांधण्याची मागणी होत आहे. याला नंदीबाबा देवस्थान आणि ग्रामस्थांनी विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. महापालिकेने रस्त्यासाठी विकास आराखडा मंजूर केला आहे. त्याप्रमाणे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू केले आहे; मात्र आता रुंदीकरणाचे काम अपूर्ण असताना त्यात उड्डाणपुलाची मागणी का होत आहे, असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे, तर पालिका प्रशासनाकडून उड्डाणपुलाबाबत कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.
शरद पवार मिनी स्टेडियमपासून कापूरबावडीपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण होणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरील डीमार्ट चौक आणि नंदीबाबा मंदिर चौकात वाहतूक कोंडी होते. ही कोंडी दूर करण्यासाठी या ठिकाणी दोन ते अडीच किलोमीटरचा उड्डाणपूल बांधावा, अशी मागणी ठाणे महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी पालिकेकडे केली आहे. या मागणीला ठाकरे गटाचे विभागप्रमुख तथा नंदीबाबा मंदिर देवस्थान प्रमुख विश्वस्त साईनाथ पाटील आणि परिसरातील गावाकऱ्यांनी विरोध केला आहे. हा पूल मंदिराचे पवित्र नष्ट करणारा आहे. त्याचा परिसरात राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना कोणताही फायदा होणार नाही. लोढा अमारा, ओबेरॉय आणि कल्पतरू सिटी संकुलांना त्याचा लाभ होणार आहे. त्यांच्यासाठी पूल बांधण्याचा खटाटोप केला जात असल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे.
तत्कालीन पालिका आयुक्त संजीव जैयसवाल यांनी मंजूर विकास आराखड्यानुसार नंदीबाबा मंदिराला हात न लावता त्याच्या पाठीमागून रस्ता बांधण्याचे नियोजिले होते. त्यामुळे मंदिराच्या पाठीमागून जाणारा रस्ता पुढे शरद पवार स्टेडियमसमोर उतरणार आहे, परंतु काही राजकीय मंडळी स्वहितासाठी त्यात बदल करून उड्डाणपूल बांधण्याची मागणी करत असल्याचा आरोप साईनाथ पाटील यांनी केला आहे. या पुलासाठी २०० ते २५० कोटींचा खर्च होईल, असा अंदाज पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच या उड्डाणपुलाला विरोध करण्यासाठी स्थानिक आणि नंदीबाबा मंदिर देवस्थानकडून तीव्र आंदोलन केले जाईल, असे येथील चंद्रकांत नार्वेकर यांनी सांगितले.
६० फुटापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण
कापूरबावडी नाका ते कोलशेतदरम्यान १० वर्षांत झपाट्याने विकास झाला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गृहसंकुल उभी राहिली आहेत. त्यामुळे या रस्त्यावर सकाळ- संध्याकाळ वाहतूक कोंडी होती. त्यासाठी ठाणे महापालिकेकडून कापुरबावडी नाका ते कोलशेतदरम्यान दोन्ही बाजूने ६०-६० फुटांपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण केले जात आहे. यासाठी पालिकेने रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या दुकान, घरांचे पुनर्वसनसुद्धा सुरू केले आहे. लोढा अमारा ते ढोकाळी गावापर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
१) ढोकाळी ते कोलशेत मार्च २०१९ मध्ये रस्त्याच्या रुंदीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता. हे काम अंदाजे १२०० मीटर लांब आणि ४० मीटर रुंदीचे नियोजन होते.
२) रस्त्याचा एकूण खर्च २६ कोटी
३) रस्त्यावरील विद्युतवाहिन्या, रोहित्रे आणि इतर विजेच्या कामासाठी १२ कोटींचे नियोजन
४) पुलासाठी अंदाजे खर्च २००-२५० कोटी
भविष्यातील गर्दीचा विचार केला, तर या ठिकाणी पुलाची अत्यंत गरज आहे. भविष्यात या मार्गाने दोन ते तीन लाख गाड्यांची वर्दळ होणार आहे. हा पूल बांधला, तर त्याला मनोरमा नगर, नमो सेंट्रल मैदान आणि नंदीबाबा मंदिर परिसरासाठी येथे तीन कट देता येऊ शकतात. वाहतूक कोंडीच्या मुक्तीसाठी हा पूल आवश्यक आहे. ठाणे महापालिकेचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
-संजय भोईर, माजी सभापती, स्थायी समिती, ठाणे
धार्मिक भावना व तांत्रिक निकषांच्या आधारे प्रकल्पाची मागणी रद्द करावी. तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंदिर व म्युझिकल गार्डन अबाधित ठेवून मागून रस्त्याचे नियोजन केले होते. १० वर्षांपासून ढोकाळी-कोलशेत मुख्य रस्त्याचं रुंदीकरण प्रलंबित आहे. ते नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आले, तर आहेत तोच रस्ता वाहतुकीसाठी पुरेसा होईल. या प्रकल्पाचे कोणतेही तांत्रिक दस्तऐवज उपलब्ध नाही. तज्ज्ञ समितीचा अहवाल नाही. ट्रॅफिक डेटावर आधारित कोणताही अभ्यास नाही.
-साईनाथ पाटील, प्रमुख विश्वस्त, नंदीबाबा मंदिर देवस्थान
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.