वर्षभरात १५ एमएलडी पिण्याचे पाण्याची बचत

वर्षभरात १५ एमएलडी पिण्याचे पाण्याची बचत

Published on

वर्षभरात १५ एमएलडी पिण्याच्या पाण्याची बचत

नव्या नळजोडण्यांना उर्वरित पाण्यावर भागवले

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १६ ः वाढत्या लोकसंख्येमुळे सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांपुढे पाण्याच्या नव्या स्रोताचा प्रश्न निर्माण झाला आहे; मात्र नवी मुंबई महापालिकेने सांडपाण्यावर प्रक्रिया करून स्वच्छ केलेल्या पाण्यातून तब्बल १५ एमएलडी पाण्याची बचत केली आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्या या प्रयत्नांमुळे वर्षाकाठी ६० कोटींचे उत्पन्नही मिळाले आहे. महापालिकेचा हा प्रकल्प राज्यातील इतर महापालिकांकरिता आदर्श ठरला आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सात मलनिस्सारण केंद्रातून कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले प्रक्रियायुक्त पाणी वापराविना समुद्रात सोडले जायचे; पण राज्‍य सरकारने केंद्राच्या अमृत योजनेंतर्गत नवी मुंबई महापालिका क्षेत्रात जवळजवळ ३०७ कोटी रुपये खर्च करून टर्शिअरी ट्रीटमेन्ट प्रकल्प तयार करण्यात आले. या प्रकल्पातून प्रक्रिया केलेले पाणी सद्यस्थितीत ठाणे- बेलापूर औद्योगिक क्षेत्रात असणाऱ्या कंपन्यांना देण्यात येत आहे. पालिकेकडून जवळपास ६५ औद्योगिक कंपन्याना पाच एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येतो. यातून पालिकेला महसूलही मिळत आहे. गतवर्षी सुरुवातीच्या काळात पालिकेला या पाणीपुरवठ्यातून सुमारे दीड कोटींचा महसूल प्राप्त झाला होता. आता नुकतेच पालिकेला महापे येथील एका कंपनीकडून १५ एमएलडी पाण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रक्रियायुक्त पाणी वापरास औद्योगिक कंपन्याकडून प्रतिसाद मिळत असल्याचे पालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांनी स्पष्ट केले.


कारखान्यांकडून सकारात्मक प्रतिसाद
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सिडकोकडून हस्तांतरित झालेले एक व महापालिकेने बांधण्यात आलेली सहा अशी एकूण सात मलप्रक्रिया केंद्र आहेत. यातून तयार झालेले पाणी समुद्रात सोडण्यात येत होते; परंतु राज्य सरकारच्या ३० नोव्हेंबर २०१७च्या निर्णयानुसार औष्णिक विद्युत केंद्रांना प्रक्रियायुक्त पाण्याचा पुनर्वापर बंधनकारक केल्याच्या धर्तीवर राज्यातील एमआयडीसी परिक्षेत्रातील उद्योगांना त्यांच्या सभोवतालच्या ५० किमी परिघातील उपलब्ध प्रक्रियायुक्त सांडपाणी प्राधान्याने वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रक्रियायुक्त पाणी वापरण्यास सुरुवातीच्या काळात औद्योगिक कंपन्याचा नकार होता; पण नंतर औद्योगिक कंपन्यांनीदेखील पाणी वापरास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.


उद्यान, झाडांना पुरवठा
पाण्याच्या तुटवड्यामुळे औद्योगिक कंपन्या हे मलनिस्सारण पाणी घेण्यासाठी तयार आहे. जवळपास आता ६५ औद्योगिक कंपन्यांना पाणी देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शहारातील मोठ्या गृहसंकुलामध्येदेखील प्रक्रियायुक्त पाणी पालिकेकडून उद्यान तसेच वाहन धुण्यासाठी वापरत आहेत. नवी मुंबईत एकूण १५ एमएलडी प्रक्रियायुक्त पाण्याचा वापर औद्योगिक कंपन्यांना व नवी मुंबईतील उद्यान, दुभाजकांमधील झाडे, दुभाजक धुण्यासाठी करण्यात येत आहे. नवी मुंबईत प्रक्रियायुक्त ४० एमएलडी पाणी तयार करण्याची क्षमता आहे. आता प्रक्रियायुक्त पाणी वापरण्यास औद्योगिक कंपन्यासह मोठ्या गृहसंकुलामध्येदेखील पाण्याची मागणी वाढली आहे. तर महापे येथील एका कंपनीकडून १५ एमएलडी पाणी मिळावे यासाठी मागणी केली आहे. त्यामुळे प्रक्रियायुक्त पाण्याच्या वापरासाठी उद्योजकांकडूनदेखील उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यात येत आहे.

एमआयडीसीकडून कंपन्यांना २२ रुपये ५० पैसे प्रति घनमीटर दराने पैसे आकारत आहे; पण नवी मुंबई महापालिका उद्योजकांना प्रक्रियायुक्त पाणी १८.५० दराने देत असल्याने कंपन्यांचा फायदा होत आहे. आता कंपन्याकडूनदेखील प्रक्रियायुक्त पाणी वापरास प्रतिसाद मिळत आहे. यामधून पालिकेला ६५ उद्योजकांकडून सुमारे दीड कोटींची रक्कम मिळाली आहे. तर आणखी उद्योजक हे प्रक्रियायुक्त पाणी मिळावे, यासाठी मागणी करीत आहेत.
- अरविंद शिंदे, अतिरिक्त शहर अभियंता, नवी मुंबई महानगरपालिका

ग्राफिक्सकरिता
- मोरबे धरणातून दर महिन्याला महापालिकेकडून ३५० एमएलडी पाणी घेतले जात होते. आता यात वाढ होऊन ४५० एमएलडीची गरज आहे.
- महापालिकेकडे पूर्वी एक लाख ३२ हजार इतक्या नळजोडण्या होत्या. आता तो आकडा एक लाख ४० हजारांच्या घरात गेला आहे.
- महापालिकेने बचत केलेल्या १५ एमएलडी पिण्याच्या पाण्यावर नवीन आठ हजार नळजोडण्या करण्यात आल्‍या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com