दिव्यांग मुलांकडून आकर्षक राख्यांची निर्मिती

दिव्यांग मुलांकडून आकर्षक राख्यांची निर्मिती

Published on

दिव्यांग मुलांकडून आकर्षक राख्यांची निर्मिती
पॅकिंगसह अन्य कौशल्य विकसित करण्यासाठी प्रशिक्षण
नवीन पनवेल, ता. १६ (बातमीदार) ः बौद्धिकदृष्ट्या अक्षम मुलांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे, यासाठी नवीन पनवेल येथील डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित शाळेत अशा मुलांना प्रशिक्षण देऊन उत्तम अशा राख्या बनवून घेतल्या जात आहेत. विशेष म्‍हणजे त्‍यांना संस्‍थेकडून पॅकिंगसह अन्य कौशल्य विकसित करण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे.
रंगीबेरंगी दोरे, रेखीव खडे आणि मोत्यांची सांगड घालत बनवलेल्या आकर्षक राख्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. सर्वसामान्यांनाही लाजवेल अशा रेखीव राख्या बघण्यासाठी सर्वजण कौतुकाने या ठिकाणी भेट देत आहेत. या शाळेत प्राथमिकपासून बौद्धिकदृष्ट्या अक्षम असलेले विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शालेय वयात सर्वसामान्य मुलांसारखे जीवन जगण्याचे विशेष प्रशिक्षण त्यांना शाळेत दिले जाते. वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्वावलंबी होण्यासाठी व्यवसाय कौशल्यपूरक प्रशिक्षण दिले जाते. त्याअनुषंगाने रक्षाबंधनासाठी १८ वर्षांवरील मुलांकडून राख्या बनविण्याचे काम सुरू आहे. राख्या बनवण्याबरोबरच पॅकिंग करण्याचे कामदेखील संस्थेकडून शाळेतील मुलांना शिकवले जात आहे.
.....................
विशेष शिक्षणासोबत प्रशिक्षण
बुद्ध्यांक कमी असलेल्या मुलांना या शाळेत थेरपी, विशेष शिक्षणाबरोबरच इतर कौशल्ये शिकविली जातात. १८ वर्षांवरील मुले हे प्रशिक्षण घेऊन राख्या, पणत्या, अगरबत्ती, तोरणे, कंदील अशा विविध वस्तू बनवून स्वत:ला स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न करत आहेत. लवकरच येऊ घातलेल्या रक्षाबंधननिमित्ताने मुलांनी शिक्षकांच्या मदतीने राख्या बनवल्या असून, त्याचे आकर्षक पॅकिंगही केले आहे. गटागटाने ही मुले शाळेत राख्या बनवतात. आपण स्वत: काहीतरी निर्माण करू शकतो, याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. काही स्टॉलवर, शाळांमध्ये शिक्षक या राख्यांचे महत्त्व सांगत त्‍या खरेदी करण्याचे आवाहन करत आहेत. विशेष मुलांना स्वावलंबी बनविणाऱ्या या उपक्रमास अनेकजण आवर्जून हजेरी लावताना दिसून येत आहेत.
....................
कोट
बौद्धिक अक्षम आणि १८ वर्षांवरील विद्यार्थी राख्या बनवत आहेत. विशेष मुलांना सहानुभूतीची नाही, तर संधीची गरज आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो. राख्यांची निर्मिती आणि विक्री यातून मिळालेले काही पैसे आम्ही त्यांच्यासाठी खर्च करतो. यातून मुलांचा आत्मविश्वास वाढतो.
-श्रेया जाधव, मुख्याध्यापिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com