भिवंडीत भटक्या कुत्र्यांची दहशत

भिवंडीत भटक्या कुत्र्यांची दहशत

Published on

संजय भोईर : सकाळ वृत्तसेवा
भिवंडी, ता. १७ : काही दिवसांपासून भिवंडी शहरात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. श्वानदंशाचे प्रकारही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मागील सहा महिन्यांत शहरात सहा हजारांहून अधिक नागरिकांना श्वानदंश झाल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाने दिली.
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे लोकांच्या समस्या वाढत आहेत. दोन दिवसांपूर्वी शहरातील दर्गा रोड परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने एकाच दिवशी परिसरातील ११ जणांचा चावा घेतला. यापैकी एक इमारतीमध्ये उभ्या असलेल्या व्यक्तीवर कुत्र्याने हल्ला केला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भटकी कुत्रे गटागटाने फिरत असतात. अनेकदा नागरिकांचा पाठलाग करत असतात. अशा वेळी जीव मुठीत घेवून जावे लागते. अनेक वेळा पळून जाण्याच्या प्रयत्नात अपघाताच्या घटनाही झाल्या आहेत. वाहनचालकही गंभीर जखमी झाले आहेत.
उपजिल्हा रुग्णालयाच्या आकडेवारीवरून भिवंडीत जानेवारी महिन्यात १,०६६, फेब्रुवारी १,०४२, मार्च १,१०४, एप्रिल ९८८, मे १,०००, जून ६८९ व १५ जुलै २०२५ या १५ दिवसांमध्ये ३६१ असे सहा महिन्यांत एकूण ६,२५० श्वानदंश झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
--------------------------------------
हैदराबादच्या संस्थेला ठेका
मागील वर्षीसुद्धा शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने तत्कालीन आयुक्त अजय वैद्य यांनी १२ वर्षे बंद असलेले श्वान निर्बीजीकरण केंद्र ११ नोव्हेंबर २०२४ पासून पुन्हा सुरू केले आहे. हैदराबादच्या ‘वेट्स सोसायटी फॉर ॲनिमल वेल्फेअर असोसिएशन’ या संस्थेला पाच वर्षांसाठी या कामाचा ठेका देण्यात आला आहे. या संस्थेस प्रति श्वान निर्बीजीकरण करण्यासाठी १,४५० रुपये दिले जात आहेत. ११ नोव्हेंबर २०२४ ते १५ जुलै २०२५ या काळात शहरातील एकूण तीन हजार २७५ श्वानांवर निर्बीजीकरण व रेबिज प्रतिबंधक लस देण्यात आल्याची माहिती स्वच्छता विभागाचे प्रमुख फैजल तातली यांनी दिली.

सहा महिन्यांतील श्र्वानदंशाची आकडेवारी

जानेवारी... १,०६६
फेब्रुवारी ... १,०४२
मार्च ... १,१०४
एप्रिल ... ९८८
मे ... १,०००
जून ... ६८९
१५ जुलैपर्यंत ... ३६१

एकूण ६,२५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com