घोडबंदर रोडवर सात तास कोंडी
घोडबंदर रोडवर
सात तास कोंडी
अवजड वाहनाची सिमेंट मिक्सरला धडक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड सिग्नलजवळ बुधवारी (ता. १६) पहाटे साडेचार वाजता भरधाव अवजड वाहनाने सिमेंट मिक्सरला धडक दिली. त्यानंतर ते वाहन पुढे जाऊन बूम क्रेनवर आदळले. या अपघातात क्रेन ऑपरेटर जखमी झाला आहे. क्रेनमधील तेल रस्त्यावर सांडून त्यावरून घसरून एक वाहन ठाण्याच्या दिशेने फिरले. यामुळे विस्कळित झालेली वाहतूक तब्बल सात तासांनंतर सुरळित झाल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली.
घटनास्थळी काम सुरू असलेल्या मेट्रो ट्रॅक प्लास्टरदरम्यान ही दुर्घटना घडली. जखमी क्रेन ऑपरेटरला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेल सांडल्यामुळे ओडिसी व अवजड वाहन घसरून रस्त्यात अडकल्याने ठाण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. हायड्रा व दुसरा पुलर बोलावून ही वाहने हटवण्यात आली. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने रस्त्यावर माती टाकून रस्ता वाहतुकीसाठी योग्य केल्यानंतर दुपारी एकच्या सुमारास मार्ग खुला करण्यात आला. याप्रकरणी अवजड वाहनचालकावर चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
--------------------