सुजित पाटकर यांना जामीन
सुजित पाटकर यांना जामीन
कोरोना काळजी केंद्राच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सुटका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : कोरोना काळजी केंद्र घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. १६) जामीन मंजूर केला. याप्रकरणी पाटकर यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असले तरीही प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्याने त्यांना तुरुंगात ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाने जामीन मंजूर करताना निरीक्षण नोंदवले.
अर्जदार जुलै २०२३पासून कोठडीत आहे आणि त्याच्याविरुद्धचा खटला नजीकच्या काळात सुरू होण्याची शक्यता नाही, कोरोना केंद्राच्या नियमित व्यवस्थापनासाठी जबाबदार असलेला सहआरोपी हेमंत गुप्ता याला कधीही अटक करण्यात आली नाही. त्यामुळे समानतेच्या आधारावर न्या. अमित बोरकर यांच्या एकलपीठाने पाटकर यांना एक लाख रुपयाच्या बंधपत्रावर जामीन मंजूर केला. तसेच आरोपींनी तुरुंगात घालवलेला वेळ आणि खटला सुरू होण्यास झालेला विलंब यांसारख्या घटकांचे मूल्यांकन करता जामीन हा नियम असून तुरुंग अपवाद या प्रमुख तत्त्वाचाही विचार करणे आवश्यक आहे, विशेषतः आरोपी पुरावे नष्ट करण्याची किंवा फरारी होण्याची शक्यता नसते, असेही न्यायालयाने आपल्या २५ पानी आदेशात नमूद केले. सक्तवसुली संचालनालयाने याप्रकरणी दाखल केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्यात जामीन मिळावा, यासाठी पाटकर यांनी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. तो फेटाळण्यात आल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने पाटकर यांच्या याचिकेवर सविस्तर युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. पाटकर यांचा आता कारागृहातून सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी
वरळी आणि दहिसर येथील कोरोना काळजी केंद्राचे कंत्राट मिळवण्याकरिता बनावट कागदपत्रे सादर केल्याच्या आरोपाप्रकरणी पाटकर यांच्यासह अन्य आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढे हा गुन्हा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे (ईओडब्ल्यू) वर्ग केला. ईओडब्ल्यूकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.