हातगाड्यामुक्तचा दावा कागदावरच

हातगाड्यामुक्तचा दावा कागदावरच

Published on

हातगाड्यामुक्तचा दावा कागदावरच
शर्मिला वाळुंज
डोंबिवली, ता. १६ : कल्याण-डोंबिवली महापालिकेने शहर ‘हातगाडीमुक्त’ झाल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात शहराच्या मुख्य रस्त्यांपासून स्थानक परिसरापर्यंत अजूनही हातगाड्यांवरील खाद्यविक्री सुरूच आहे. मागील सहा महिन्यांत ३५६ हातगाड्यांवर कारवाई करत दोन लाख ५७ हजारांचा दंड वसूल करण्यात आला असला, तरी या मोहिमेचा प्रत्यक्ष परिणाम फारसा जाणवत नाही. त्यामुळे महापालिकेचा दावा केवळ कागदावरच उरल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

मागील सहा महिन्यांत महापालिका प्रशासनाने हातगाड्यांवरील कारवाईतून दोन लाख ५७ हजारांची दंडात्मक वसुली केली आहे; मात्र शहरात हातगाड्यांची संख्या निरंक असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. त्यामुळे या कारवाईबद्दल नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. शहरात अजूनही उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री होत आहे. त्यामुळे त्या गाड्या अधिकृत आहेत का, असा सवाल नव्याने उपस्थित होत आहे.

एकीकडे शहरात साथीच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे; तर दुसरीकडे कल्याण-डोंबिवली शहरात एकही हातगाडी नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. सध्या डेंगी, मलेरियासह सर्दी, खोकला, ताप, घसादुखी यांसारखे साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. रस्त्याच्या कडेला साचलेल्या घाण पाण्यावर, बांधकामाच्या ठिकाणी, तसेच स्थानक परिसरात जिथे अशा हातगाड्या लागतात, तेथील कचरा, घाणपाणी यावर निर्माण होणाऱ्या डासांमुळे डेंगी, मलेरियाचे रुग्णदेखील वाढत आहेत.

पावसाळ्यात साथीचे, संसर्गजन्य आजार वाढू नयेत, यासाठी उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नका, बाहेरचे खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे, अशी जनजागृती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येते. पथनाट्य, पत्रक वाटणे, झोपडपट्टी परिसरात सर्व्हे करणे अशा प्रकारे जनजागृती करण्यात येते; मात्र तरीदेखील साथरोग रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही.

कारवाईनंतरही परिस्थिती जैसे थे
उघड्यावरील खाद्यपदार्थांमुळे साथीचे रोग पसरतात, त्यांना अटकाव करण्यासाठी बाजार परवाना, आरोग्य विभाग प्रभाग स्तरावर पालिका हद्दीतील उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या हातगाडी, फेरीवाल्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या वतीने परिसरातील बेकायदा हातगाड्या लावून उघड्यावर खाद्यपदार्थविक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे, असा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

क प्रभागात सर्वाधिक संख्या
पालिकेच्या क प्रभागात सर्वात जास्त म्हणजेच ९३ हातगाड्यांवर कारवाई केली आहे, तर ब आणि ग प्रभागात सर्वात कमी म्हणजेच अनुक्रमे १२ व १३ हातगाड्यांवर कारवाई केली आहे. कारवाईनंतर पालिका हद्दीत एकही हातगाडी नसल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मग दररोज ज्या हातगाड्या स्थानक व आजूबाजूच्या परिसरात लागत आहेत, त्या गाड्या कोणाच्या आशीर्वादाने चालत आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.


१)प्रशासनाचा दावा अन् वास्तव
महापालिका प्रशासन एकही हातगाडी नसल्याचा दावा करत आहे; मात्र प्रत्यक्षात हातगाड्यांवर खाद्यपदार्थ विक्री होत असल्याचे चित्र दिसते.

२) नियोजनाचा अभाव
हातगाड्यांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा का काम करत नाही, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. कारण महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर हातगाड्या दिसत नाहीत; मात्र काही दिवसांतच परिस्थिती मूळपदावर येते. तसेच पर्यायी व्यवस्था नसल्याने विक्रेते पुन्हा त्याच जागेवर परत येतात.

३) जागरूकतेपेक्षा जबाबदारी महत्त्वाची
पथनाट्य व पत्रके देणे ही एकांगी प्रक्रिया आहे. नागरिकांना केवळ उपदेश न करता व्यवस्थेतच सुधारणा गरजेची आहे.

कारवाई केलेल्या एकूण गाड्या - ३५६ गाड्या
एकूण दंड वसुली- २,५७,८००
पालिकेचा दावा- शहर हातगाडीमुक्त
आम्ही काय पाहिले - शहरात ठिकठिकाणी रस्त्यावरच हातगाड्यांवर खाद्यपदार्थांची विक्री होत आहे. शाळा, महाविद्यालय परिसर, स्थानक व बाजारपेठ परिसरात कोणतीही स्वच्छता न बाळगता सर्हास विक्री होत आहे.
साथरोग स्थिती- डेंगीसह विविध आजारांमध्ये वाढ झाली आहे. नुकताच एका रुग्णाचा डेंगीमुळे मृत्यू झाला आहे.

सहा महिन्यांतील कारवाई
प्रभाग कारवाई दंडवसुली
१/अ ६३ १५, ८००
२/ब १२ १५,४००
३/क ९३ ६७,४००
४/जे १६ २२,४००
५/ड २४ २८,८००
६/ फ ३० १९,१००
७/ ह ६१ २६,२५०
८/ग १३ १३,२००
९/आय १९ २२,८००
१०/ ई २५ २६,६५०
एकूण ३५६ २,५७,८००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com