ड्रग्ज माफीयांविरोधात धडक कारवाई
ड्रग्ज तस्करांचा बिमोड
सहा महिन्यांत १,०४६ आरोपी अटकेत, नऊ कोटींचा मुद्देमाल जप्त
विक्रम गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १७ : नवी मुंबई पोलिसांनी सहा महिन्यांमध्ये अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. यात मेफेड्रॉन, हेरॉईनसह गुटखा खरेदी-विक्री करणारे तसेच हुक्का पार्लर चालवणारे अशा एकूण १,०४६ आरोपींना अटक केली आहे. तसेच, ८५९ कारवायांमध्ये सुमारे नऊ कोटी ६३ लाख रुपये किमतीचे वेगवेगळ्या प्रकारचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे, या कारवायांमध्ये एका परदेशी महिलेसह ३० महिलांची धरपकड करण्यात आली आहे.
नवी मुंबई शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई पोलिसांनी दोन वर्षांमध्ये शहरात सुरू असलेली अमली पदार्थांची तस्करी व त्यामागे असलेले रॅकेट उद्ध्वस्त केले आहे.
नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने तसेच आयुक्तालयातील विविध पोलिस ठाण्यांनी सहा महिन्यांमध्ये अमली पदार्थाशी संबंधित एकूण ६३७ कारवाया करून ७१८ आरोपींना अटक केली आहे. यात अमली पदार्थ बाळगणारे ८० तर अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या ६९१ आरोपींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यात पाच परदेशी महिलांसह २२ महिलांचा समावेश आहे. तसेच, पाच परदेशी नागरिकांचादेखील समावेश आहे.
हस्तगत अमली पदार्थ
प्रकार - किंमत - वजन
एमडी (मेफेड्रॉन) - तीन कोटी ६८ लाख - एक किलो ५१३ ग्रॅम
गांजा - चार कोटी १८ हजार - १४२ किलो ३९९.१५७ ग्रॅम
कोकेन - ८४ लाख चार हजार ४०० - २०२.२२४ ग्रॅम
हेरॉइन - ५४ लाख ३७ हजार - १७२.८ ग्रॅम
चरस - २८ हजार - १४ ग्रॅम
ब्राऊन शुगर - ३९ हजार - ७.१३ ग्रॅम
एमडीएमए एक्सटेसी - दोन लाख ४० - ११.३२ ग्रॅम
गुटखा आणि हुक्का पार्लरवर कारवाई
नवी मुंबई पोलिस आणि अमली पदार्थविरोधी पथकाने सहा महिन्यांमध्ये गुटखा, पान मसाला व सुगंधी तंबाखूच्या तस्करी प्रकरणात १८१ कारवाया करून १८७ आरोपींना अटक केली आहे. तसेच, ४९ लाख ४३ हजार ३८६ रुपये किमतीचा वेगवेगळ्या प्रकारच्या गुटख्याचा साठा जप्त केला आहे. तसेच, नवी मुंबई पोलिसांनी हुक्का पार्लरच्या ३५ कारवाया करून १३१ पुरुष व चार महिला अशा एकूण १३५ जणांना अटक केली आहे. त्याचप्रमाणे परदेशी सिगारेट बाळगण्याप्रकरणी सहा कारवाया करून सहा जणांना अटक केली आहे.
वर्षभरातील प्रमुख कारवाया
४८ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकून कारवाई
अमली पदार्थविरोधी कक्षाने मे महिन्यामध्ये अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध जोरदार कारवाई करीत ‘ऑपरेशन प्रहार’अंतर्गत एकाच दिवशी ४८ ठिकाणी छापे टाकून सात आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे २० किलो ७०० ग्रॅम गांजा आणि रोख रक्कम असा तब्बल ४० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हायड्रो गांजाचे रॅकेट उद्ध्वस्त
अमली पदार्थविरोधी पथकाने शहरात सुरू असलेले हायड्रो गांजाच्या तस्करीचे रॅकेट उघडकीस आणून तब्बल तीन कोटी रुपयांचा हायड्रो गांजा जप्त केला आहे. तसेच थायलंड व अमेरिका या देशातून हायड्रो गांजाची तस्करी करणारा आंतरराष्ट्रीय ड्रग्जतस्कर नवीन चिंचकर याला मलेशियातून भारतात आणण्यात यश आल्यानंतर त्याच्यासह या तस्करीत गुंतलेल्या २० आरोपींना अटक केली आहे. यात दोन पोलिसांसह कस्टम अधिकाऱ्यांचादेखील समावेश असून हायड्रो गांजाच्या तस्करीत गुंतलेल्या इतर १४ आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. या सर्व आरोपींविरोधात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे.
एकाचवेळी दोन घरांवर छापेमारी
नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने गत आठवड्यात दिघा, ईश्वरनगर परिसरातील एकाच इमारतीतील दोन घरांवर छापेमारी करीत तब्बल ७६ लाख ६९ हजार रुपये किमतीचे मेफेड्रॉन हे अमली पदार्थ जप्त केले आहे. कारवाईत एका महिलेसह चार जणांना अटक केली आहे.
शहरात अमली पदार्थांची तस्करी करणारे व त्याचे सेवन करणाऱ्यांवर नियमित कारवाई करण्यात येत आहे. त्याच्या दुष्परिणामाबद्दल नवी मुंबईतील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम व उपक्रमही नियमित राबविण्यात येत आहेत. नागरिकांना याबाबत काही माहिती मिळाल्यास त्यांनी अमली पदार्थविरोधी पथकाला अथवा स्थानिक पोलिसांना त्याबाबतची माहिती द्यावी, त्याआधारे तत्काळ कारवाई करण्यात येईल.
- संदीप निगडे, वरिष्ठ निरीक्षक, अमली पदार्थविरोधी कक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.