खारघर पाणी
तीन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होणार
सिडको अधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन; तोपर्यंत नवीन नळजोडण्या नाही
खारघर, ता. १७ (बातमीदार) : तीन दिवसांत खारघर परिसरातील पाणीपुरवठा नियमित होईल तसेच पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत नवीन नळजोडणी दिली जाणार नाही, असे लेखी आश्वासन सिडकोच्या मुख्य अभियंता शीला करुणाकरण यांनी भाजपच्या मंडळ अध्यक्षांना दिले आहे.
खारघर परिसरात काही महिन्यांपासून कमी दाबाने, अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने रहिवासी संकुलांतील पदाधिकाऱ्यांनी सिडको अधिकाऱ्यांची भेट घेत अनेकदा निवेदन दिले आहे. बुधवारी खारघरमधील भाजपच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी सिडकोच्या मुख्य अभियंता शीला करुणाकरण यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत खारघरमधील पाणी समस्या दूर होणार नाही, तोपर्यंत दालनाबाहेर पडणार नसल्याचा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. अखेर सिडकोच्या करुणाकरण यांनी आपत्कालीन दुरुस्ती कामामुळे पाण्याचा तुटवडा निर्माण झाला होता. ही तूट भरून तीन ते चार दिवसांचा कालावधी लागला. काम पूर्ण झाल्यानंतर ११ जुलैपासून हेटवणे धरणातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. पुढील तीन दिवसांत खारघर विभागातील पाणीपुरवठा सुरळीत होईल. तसेच पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत नवीन नळजोडणी दिली जाणार नाही, असे लेखी पत्र भाजपच्या शिष्टमंडळाला दिले. आंदोलनात भाजपचे खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, रायगड जिल्हा सचिव कीर्ती नवघरे, ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक ॲड नरेश ठाकूर, नीलेश बाविस्कर, गुरुनाथ गायकर, माजी नगरसेविका हर्षदा उपाध्याय, आरती नवघरे, नेत्रा पाटील, समीर कदम, वासुदेव पाटील, साधना पवार, अमर उपाध्याय आदी उपस्थित होते.
आश्वासनपूर्ती न झाल्यास आंदोलन तीव्र
खारघर परिसरात काही दिवसांपासून अनेक प्रभागांत रहिवाशांना पुरेसा पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे कार्यकर्त्यांना ठिय्या आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली. आंदोलन सुरू असताना सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्यात दूरध्वनीवर संभाषण झाले. दरम्यान, सिडकोने लेखी आश्वासनाचे पालन न केल्यास पुन्हा आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा भाजपचे जिल्हा सचिव कीर्ती नवघरे यांनी दिला आहे.
..........
रहिवाशांवर पाणी विकत घेण्याची वेळ
खारघर सेक्टर-१२ मध्ये समस्या गंभीर
खारघर, ता. १७ (बातमीदार) : खारघर सेक्टर-१२ बीयूडीपी वसाहतमधील एफ टाइप वसाहतीत दोन महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे रहिवाशांना टँकरने पाणी विकत घेऊन गरजा पूर्ण कराव्या लागत आहेत. सिडकोने एफ टाइप वसाहतमधील पाणी समस्या दूर करावी, या मागणीचे निवेदन एफ टाइप ओनर्स वेल्फेअर असोसिएशनने सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाला दिले.
जलजीवन मिशन योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नियमितपणे नळाचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारकडून ‘हर घर नल से जल’ ही योजना राबवण्यात येत आहे, मात्र आमची स्थिती ग्रामीण भागापेक्षाही वाईट आहे. दोन महिन्यांपासून पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने टँकरने पाणी विकत घेऊन गरजा पूर्ण कराव्या लागत आहेत. सोसायटीच्या देखभालीचे पैसे पाण्यासाठी वापरावे लागत आहे. सिडको अधिकाऱ्यांची भेट घेतल्यास पोकळ आश्वासन दिली जातात. रहिवाशांना पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे, असे निवेदन एफ टाइप ओनर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने सिडको अधिकाऱ्यांना देण्यात आले. या वेळी असोसिएशनचे पदाधिकारी रवींद्र कटकदौंड, सुहास शिर्के, प्रशांत कदम आदींसह महिला सदस्या उपस्थित होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.