थोडक्‍यात बातम्या रायगड

थोडक्‍यात बातम्या रायगड

Published on

डोलवी ग्रामपंचायतीअंतर्गत नागरी कामांबाबात तक्रार
पेण (वार्ताहर) : तालुक्यातील डोलवी ग्रामपंचायतीमधील झालेल्या कामांची पुन्हा निविदा काढण्यात येत आहे. अशा निविदा काढण्यामागचा उद्देश काय, असा सवाल रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय जांभळे यांनी गुरुवारी (ता. १७) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. डोलवी ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामनिधीअंतर्गत साहित्य पुरवठा व विकासकामे यांच्या जाहीर निविदा मागविण्यात आल्या होत्या; त्या अनुषंगाने गावातील कानिफनाथ समाजमंदिर शेजारील संरक्षक भिंत बांधण्यासाठीदेखील नऊ ते साडेनऊ लाखांच्या वर कामाच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत, मात्र हे काम यापूर्वीच झाले असल्याचे संजय जांभळे यांनी सांगितले, तर यापूर्वीदेखील असाच कोट्यवधी रुपयांच्या कामांबाबत भ्रष्ट व्यवहार झाला आहे, तर याच हद्दीतील ग्रामनिधीअंतर्गत साहित्य पुरवठा व विविध विकासकामे करण्याबाबत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्या निविदा उघडण्याची तारीख १८ जुलै आहे, परंतु या तारखेअगोदरच ही कामे झालेली आहेत, तर मग झालेल्या कामाची निविदा काढण्याचा उद्देश तरी काय, असा सवाल माजी सभापती संजय जांभळे यांनी या वेळी पत्रकार परिषदेत केला आहे. या पत्रकार परिषदेला ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पाटील, गणेश बैकर, एन. आर. पाटील, अभय पाटील, संदीप पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
................
प्रभा करंडकमध्ये दुर्वा झावरे, श्रुती नाईक प्रथम
अलिबाग, ता. १७ (वार्ताहर) ः शेकाप सरचिटिणीस जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्थानिक ग्रामीण भागातील कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी पीएनपी कलाविकास मंडळ, अलिबाग अंतर्गत ग्रामीण रंगभूमीतर्फे रविवारी (ता. १३) प्रभा करंडक २०२५ एकपात्री अभिनय स्पर्धा पीएनपी नाट्यगृहात उत्साहात पार पडली. ही स्पर्धा पीएनपी कलाविकास मंडळाच्या अध्यक्ष चित्रलेखा पाटील व चित्रपट दिग्दर्शक तथा संगीतकार विक्रांत वार्डे यांच्या प्रेरणेतून ग्रामीण रंगभूमीचे अध्यक्ष राजन पांचाळ यांच्या मार्गदर्शनाने आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत बालगटात दुर्वा झावरे हीने प्रथम क्रमांक पटकावला, तर मोठ्या गटात श्रुती नाईक प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. स्पर्धेचे उद्‌घाटन नागेश कुलकर्णी आणि रमेश धनावडे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत ग्रामीण भागातील एकूण ४८ स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेचे परीक्षण प्रदीप गोगटे आणि नरेंद्र ठाकूर यांनी केले. स्पर्धेत बालगटात प्रथम क्रमांक दुर्वा झावरे, द्वितीय क्रमांक आराध्य पाटील, तृतीय क्रमांक अनन्या प्रभाळे, तर उत्तेजनार्थ बक्षीस नव्या वर्तक व अंश ठाकूर यांनी पटकावले आहे. तसेच, मोठ्या गटात प्रथम क्रमांक श्रुती नाईक, द्वितीय क्रमांक अभिषेक पाटील, तृतीय क्रमांक मनाली इंगळे, तर उत्तेजनार्थ बक्षीस चेतन पाटील, सायली पाटील व कृतिका पाटील यांनी पटकावले. विजेत्यांना चित्रलेखा पाटील व शेकापचे अन्य पदाधिकारी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या वेळी चित्रलेखा पाटील यांनी पीएनपी नाट्यगृहात ग्रामीण नाट्य मंडळाचा भव्यदिव्य असा महोत्सव घेणार असल्याचे जाहीर केले आहे. सूत्रसंचालन देवेंद्र केळूसकर आणि जितेंद्र पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक सागर नार्वेकर यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ग्रामीण रंगभूमीचे पदाधिकारी राजेंद्र झावरे, संकल्प केळकर, सागर नार्वेकर, अश्रीता बारसे, संचित पानसरे, तन्वी पाटील, मयुर मोरे, तुषार पाटील, ऋषीकेश पडवळ, यश पाटील व नितेश पाटील यांनी मेहनत घेतली.
................
चारिझेन फाउंडेशनच्या उपक्रमांतर्गत महिलांसाठी प्रशिक्षण बॅच
माणगाव (वार्ताहर) : चारिझेन फाउंडेशनतर्फे महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत शिवणकाम, ब्युटीशियन आणि मेहंदी प्रशिक्षणाच्या सातव्या बॅचचा शुभारंभ नुकताच गोरगाव येथे संजीवनी सामाजिक चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा शितल गोगावले कदम यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश आर्थिकदृष्ट्या मागास व मध्यमवर्गीय महिलांना स्वावलंबी बनवणे हा असून, या प्रशिक्षणांद्वारे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळत आहे. त्यामुळे महिला छोट्या उद्योजिका बनत असून, कौटुंबिक जबाबदाऱ्यांसोबतच स्वतःचे आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकत आहेत. कार्यक्रमाचे आयोजन चारिझेन फाउंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन एन. एस. रंधावा, उपाध्यक्ष सतीश काळे, मार्केटिंग हेड राकेश पडवळ, जय दोशी, सुजाता इंगळे , जान्हवी लाड आदी टीमने केले. शुभारंभाप्रसंगी शिवसेना प्रमुख पदाधिकारी उपस्थितीत होते. चारिझेन फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com