फसव्या इ-चलानची धास्ती
फसव्या ई-चालानची धास्ती
दंड आकारणी संदेशातून बँक खात्यांवर डल्ला
मुंबई, ता. १७ ः वाहतूक नियम मोडल्याबद्दल पाठवण्यात येणाऱ्या ई-चालानच्या निमित्ताने मुंबई महानगर प्रदेशासह देशभरातील महानगरांमध्ये फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. विशेष म्हणजे, हे चालान संबंधित व्यक्तीकडील वाहनाच्या नोंदणी क्रमांकासह पाठवले जात आहे. त्यामुळे सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता अधिक वाढली आहे.
--------------------------------
दंडवसुलीची प्रक्रिया
बेशिस्त वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी पोलिसांनी दंडवसुली प्रक्रिया पारदर्शक केली आहे. या प्रक्रियेतील भ्रष्टाचार, पोलिस-वाहनचालकांमधील शाब्दिक चकमकी रोखण्यासाठी शासनाने इलेक्ट्रॉनिक प्रणालीने नियमभंग करणाऱ्यांकडून ई-चालान पद्धतीने दंड आकारला जात आहे. मुंबईतील अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वाहन, त्याचा मालक याचे तपशील विभागीय आरटीओ, वाहतूक पोलिसांकडे उपलब्ध होत आहेत. अशा व्यक्तींना कुठे, कोणता नियमभंग झाला आणि त्याचा दंड किती याचा तपशील पाठवताना ऑनलाइन किंवा वाहतूक पोलिस चौकीत जाऊन दंड भरण्याची मुभा आहे.
----------------------------
फसवणुकीची पद्धत
गेल्या काही दिवसांत वाहतूक पोलिस, आरटीओच्या नावे सायबर भामटे नागरिकांना फसवी ई-चालान पाठवत आहेत. आपल्या वाहनावर अमुक तमुक नियम भंग केल्याने पाचशे, हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. तो भरण्यासाठी ही लिंक क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, असा संदेश पाठवला जातो. ही लिंक ई परिवहनशी मिळत्या जुळत्या नावाने तयार केली जाते. यात वाहतूक पोलिस किंवा आरटीओशी मिळते जुळते ॲप सुरू होते. दंड भरण्याच्या निमित्ताने संबंधित व्यक्तीचे बँक खात्याचे तपशील, मोबाईलचा ताबा परस्पर भामट्यांकडे जातो. त्या आधारे बँक खात्यातील रक्कम काढली जाते.
-----------------------------------
नोंदवलेले घटनाक्रम
-आठवडाभरापूर्वी एका बांधकाम व्यावसायिकाकडे नोकरी करणाऱ्या ओशिवरातील तरुणाला आरटीओच्या नावे दुचाकीवरील ई-चालानचा फसवा संदेश आला होता. त्यातील लिंकवर क्लिक करताच डेबिट कार्ड, आधार कार्डचा तपशील मागण्यात आला. त्याला ओटीपी आला. संशय आल्याने त्याने लिंक डिलिट केली, मात्र तरीही खात्यातून सव्वा लाख रुपये काढण्यात आले.
- काळबादेवीतील व्यावसायिकाला त्याच्या कारच्या अचूक नोंदणी क्रमांकासह ई-चालानचा संदेश आला. वाहन क्रमांक असल्याने व्यावसायिकाने कुतूहलापोटी लिंक क्लिक करून ॲप डाऊनलोड केले. ॲपमध्ये गोपनीय बँक खात्यांचा तपशील मिळवताना दीड लाख रुपये काढले. अशाच प्रकारे पेडर रोड येथील एका व्यावसायिकाच्या खात्यातून सव्वा लाख रुपये काढण्यात आले होते.
-------------------------------
पोलिसांचे आवाहन
- ई-चालानच्या संदेशाची शहानिशा करा.
- पोलिसांच्या, आरटीओच्या अधिकृत ॲपचा वापर करा.
- अधिकृत ॲपवर जाऊन खात्री करा.
- वाहतूक पोलिसांच्या कार्यालयात जाऊन माहिती घ्या.
- संदेशातील लिंकवर क्लिक करू नका.
- एपीके फाइल डाऊनलोड करणे टाळा.
----------------------------
पॉइंटर
आठ लाख
दररोज सरासरी आठ लाख वाहने सहा टोलनाक्यांवरून शहरात मुंबईत येतात. दहिसर २.३० लाख, वाशी दोन लाख, मुलुंड १.१६ लाख, मुलुंड (एलबीएस) ८८ हजार, ऐरोली १.२ लाख आणि अटल सेतूवरून मुंबईत येणाऱ्या २० हजार वाहनांची नोंद होते.
------------------------
४८ लाख
वाहतूक पोलिसांच्या नोंदीनुसार शहरात ४८ लाख वाहने आहेत. त्यात १४ लाख खासगी कार - एसयूव्ही, २९ लाख दुचाकी आणि रिक्षा, टॅक्सी, मालवाहू मोटारी आदी अन्य वाहने सुमारे पाच लाखांच्या घरात आहेत.
------------------------
५९.३७ लाख
२०२४ मध्ये वाहतूक पोलिसांनी विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर एकूण ५९.३७ लाख ई-चालान बजावले. या चालनांद्वारे ४७८.४० कोटींचा दंड बजावण्यात आला. त्यापैकी २०.१६ लाख चालनांद्वारे बजावण्यात आलेला १५१.०५ कोटी दंड नागरिकांनी भरला, तर ३२७.३४ कोटींचा दंड अद्याप थकीत आहे.
------------------------
११.५० लाख
सर्वाधिक ११.५० हजार ई-चालान बेकायदा पार्किंगद्वारे केल्याबद्दल आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.