शहापूरकरांना भावलीची प्रतीक्षा

शहापूरकरांना भावलीची प्रतीक्षा

Published on

शहापूरकरांना भावलीची प्रतीक्षा
विविध विभागांच्या मंजुरीअभावी योजना रखडली
राहुल क्षीरसागर
ठाणे, ता. १७ : धरणांचा तालुका अशी ओळख असणाऱ्या शहापूरमध्ये पावसाळा वगळता अन्य आठ महिने तीव्र पाणीटंचाई असते. शहापूर तालुक्यातील ९७ गावे २५९ पाड्यांची तहान भागविण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. ही पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी गुरुत्वाकर्षणावर आधारित भावली योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील कामे पर्यावरणासह रेल्वे, राष्ट्रीय-राज्य महामार्ग तसेच जलसंपदा विभागाच्या मंजुरी आणि स्थानिकांचा होणारा विरोधामुळे रडतखडत सुरू आहेत. त्यामुळे भावली योजना पूर्णत्वास जाण्यासाठी अजून वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे त्या गाव-पाड्यांना प्रत्यक्ष पाण्यासाठी अजून वर्षभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मुंबईसह ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा, वैतरणा आणि भातसा अशी मोठी धरणे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात आहेत; मात्र याच धरणांच्या तालुक्यातील ९७ गावे २५९ पाडे आजही तहानलेली आहे. या गावपाड्यांची तहान भागविण्यासाठी गुरुत्वाकर्षणावर आधारित भावली योजना राबविण्याचा निर्णय ठाणे जिल्हा परिषदेने घेतला. त्यानुसार २०१६ला जिल्हा परिषद प्रशासनाने प्रस्ताव तयार करून राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला होता. तसेच २०११च्या जनगणनेनुसार लोकसंख्या विचारात घेत पाणी आरक्षणासाठीदेखील पाठपुरावा सुरू केला. त्यानंतर २०१८ला १२.६९ दशलक्ष लिटर पाणी आरक्षण मंजूर केले. तर, २०२० मध्ये या योजनेसाठी प्रशासकीय मान्यतादेखील देण्यात आली. यानंतर प्रत्यक्ष कार्यादेश देत ऑगस्ट २०२२ला कामाला सुरुवात केली. या योजनेची कामे करताना, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे प्रशासनाच्या आवश्यक असलेल्या मंजुरीच्या कचाट्यात अडकली आहे. काही ठिकाणी खासगी जागांचादेखील अडसर येत आहे. यामुळे या योजनेचा प्रवास आजही रडतखडत सुरू आहे.

जलवाहिनी अंथरण्याचे काम ५० टक्केच
भावली प्रकल्पांतर्गत २४५ किलोमीटर पाण्याची वाहिनी अंथरण्याचे काम हाती घेतले होते. तसेच, ज्या प्राधिकरणाच्या अखत्यारितून जलवाहिनी अंथरण्यासाठी खोदकाम करण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्यांसाठी अधिक वेळ खर्ची पडत असल्यामुळे गेल्या चार वर्षांत अवघे १४३ किलोमीटर जलवाहिनी अंथरली आहे. आणखी १०२ किलोमीटरची जलवाहिनी अंथरण्याचे काम शिल्लक आहे.

२५ पाण्याच्या टाक्या उभारण्याचे काम शिल्लक
शहापूर तालुक्यातील ९७ गावे आणि २५९ पाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी भावली योजना राबविण्यात येत आहे. तसेच गाव-पाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी ४९ ठिकाणी पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार आहे; मात्र आजच्या घडीला केवळ २४ पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या असून २५ पाण्याच्या टाक्या उभारण्याचे काम शिल्लक आहे.

विहीगाव येथील पर्यायी जागेचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
जलशुद्धीकरण केंद्रासाठी तीन हेक्टर जमीन वनविभागाची असल्याने वनविभागाला त्या जमिनीच्या मोबदल्यात तालुक्यातील विहिगाव येथील महसूल जमीन वर्ग करण्याचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठविण्यात आला आहे. शासनाकडून अद्याप त्यास मंजुरी मिळाली नाही. शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर जागेचा तिढा सुटणार आहे.

भावली योजनेची माहिती
- २०१६ला भावली योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला.
- २०१८ला १२.६९ दशलक्ष लिटर पाणी आरक्षण मंजुरी
- २०२०ला भावली योजनेला प्रशासकीय मान्यता
- २०२२ला प्रत्यक्ष कामाचे कार्यादेश दिले.


स्थानिक अडचणी
कंत्राटदाराकडून डिसेंबर २०२४ मध्ये जलसंपदा विभागाच्या हद्दीत जलवाहिनी अंथरण्याचे काम सुरू करण्यात आले होते; परंतु हे काम करण्यास जलसंपदा विभागाने मनाई केली आहे. तसेच, या ठिकाणी माणवेढे, बोरली, फंगूळगव्हाण व नांदगाव सदो या गावातील स्थानिकांनीदेखील या कामास विरोध केलेला आहे.

भावली योजनेच्या जलवाहिनीसाठी काही प्रमाणात भूसंपादनाचा प्रश्न शिल्लक आहे. काही ठिकाणी वनजमिनींचा प्रश्न आहे. भूसंपादन करणे राहिल्याने या योजनेला विलंब होत आहे, त्यामुळे ही योजना प्रत्यक्ष वर्षभरात सुरू होईल.
- केतन चौधरी, उपअभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com