प्लास्टिकच्या कृत्रिम फुलावर बंदी येणार!
प्लॅस्टिकच्या कृत्रिम फुलांवर बंदी येणार!
१०५ आमदारांचा पाठिंबा; फूल उत्पादकांना फटका
पनवेल, ता. १७ (बातमीदार) ः सण-उत्सवात वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिक (कृत्रिम) फुलांमुळे नैसर्गिक फुलांची शेती करणाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय. शिवाय, पर्यावरणाचाही ऱ्हास होत आहे. याविरोधात तासगाव-कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील यांनी कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या मागणीला १०५ आमदारांनी पाठिंबा दिला असून मुख्यमंत्र्यांनी याबाबत मंत्री भरत गोगावले आणि पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. गणेशोत्सव अवघ्या महिनाभरावर आल्याने सरकार लवकरच कृत्रिम फुलांवर बंदी घालणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिवाळी, दसरा, पाडव्यासह वर्षभर सणानिमित्त फूल उत्पादक शेतकरी व विक्रेत्यांना हमखास नफा मिळतो. पनवेल ही फूल विक्रेत्यांसाठी मोठी बाजारपेठ आहे; परंतु गेल्या काही वर्षांपासून कृत्रिम प्लॅस्टिकच्या फुलांनी बाजारपेठ व्यापल्याने सण-उत्सवात नैसर्गिक फुलांची मागणी कमी झाल्याचे फुलशेती करणारे महेश ढेंबरे यांनी सांगितले.
केसांमध्ये माळण्यासाठीच्या गजऱ्यापासून दारावरचे तोरण, देवपूजा, सण-उत्सवाची सजावट करण्यापर्यंत फुलांचा वापर होतो; मात्र प्लॅस्टिकच्या कृत्रिम फुलांमुळे आपण फुलांच्या नैसर्गिक सुगंधाला मुकत आहोत. दुसरीकडे ही प्लॅस्टिकची फुले पर्यावरणाचेही नुकसान करीत आहेत. आज घरोघरी शोभेची वस्तू म्हणूनही कृत्रिम विशेषतः प्लॅस्टिक फुले पोहोचली आहेत. सण, समारंभाव्यतिरिक्तही बाजारपेठा कृत्रिम फुलांनी सजलेल्या आहेत. त्याचबरोबर रासायनिक रंगांचा वापर यामुळे प्लॅस्टिकची फुले पर्यावरणदृष्ट्या अत्यंत घातक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
ताज्या फुलांचा बाजार कोमेजला
फूल व्यवसाय हा अगदी अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही चांगले आर्थिक उत्पन्नाचे साधन आहे. सण-उत्सवात फुलांना चांगला भाव मिळतो. त्यामुळे थोड्याशा जमिनीत फुलेशेती करून अनेकजण चांगले उत्पन्न मिळायचे; मात्र प्लॅस्टिक फुलांमुळे ताज्या फुलांचा बाजार कोमेजत आहे. दहा वर्षांत कृत्रिम विशेषतः प्लॅस्टिकच्या फुलांनी बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर काबीज केली आहे.
कृत्रिम फुलांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास
कृत्रिम फुले हव्या त्या रंगात, विविध आकारांत, थ्रीडी तंत्रज्ञानाद्वारे आकर्षक पद्धतीने बनविलेली असतात. शिवाय, ही फुले हाताळायला सोपी असल्याने ग्राहक या प्लॅस्टिकच्या फुलांकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहेत. एकीकडे प्लॅस्टिकवर बंदी घालण्याच्या गोष्टी केल्या जातात तर दुसरीकडे प्लॅस्टिकच्या फुलांवर कसलीच बंदी नाही. प्लॅस्टिकमुळे होणारे नदीचे प्रदूषण आणि पर्यावरणाला होणारा धोका विचारात घेऊन या फुलांवर बंदी घालण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे.
मानवी आरोग्यावरही परिणाम
सिंगल युज प्लॅस्टिकच्या पिशव्यांसारखाच प्लॅस्टिकच्या फुलांचा पर्यावरणावर परिणाम होतो. लवकर विघटन होत नाही. विघटित प्लॅस्टिकचे कण किंवा प्लॅस्टिकची फुले जर पाण्यात मिसळली तर हळूहळू तापमान वाढीबरोबर त्यांचा अंश पाण्यात उतरतो. त्यामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. स्तनदा मातांच्या दुधात पाण्याद्वारे त्याचा अंश उतरू शकतो. त्याला मायक्रो प्लॅस्टिक म्हणतात. हे लघू कण दुधातून बालकांच्या शरीरात प्रवेश केल्यावर मेंदूचे झटके येणे किंवा मेंदूवर परिणाम होणे, इतर अवयवांवरही विकृती निर्माण होण्यासारखे परिणाम होऊ शकतात, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
पाच वर्षांपासून फुलशेती करतोय. सध्या गुलाब, शेवंती, झेंडू शेतात आहे. दसरा, दिवाळी, पाडवा या सणानिमित्त नवी मुंबई व पनवेल या ठिकाणी फुलांसाठी मोठे मार्केट असूनही प्लॅस्टिक फुलांमुळे कमी किमतीत फुले विकावी लागतात. प्लॅस्टिकच्या फुलांमुळे फुलशेतीवर ६० टक्के प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यामुळे आता फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी काय करावे, असा प्रश्न आहे.
- महेश ढेंबरे, फूल उत्पादक शेतकरी, फलटण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.