पाण्यासाठी महिलांचा महापालिकेवर मोर्चा
पाण्यासाठी महिलांचा महापालिकेवर मोर्चा
कल्याण, ता. १७ (बातमीदार) : शहरातील पूर्व विभागात काही भागांत गेल्या काही वर्षांपासून अनियमित व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. कैलास नगर, खडेगोळवली, साईनगर, चिंचपाडा व इतर प्रभागात पाण्याची परिस्थिती भीषण आहे. अनेकदा तोंडी व लेखी तक्रारीकरूनदेखील परिस्थिती बदलत नसल्याने येथील त्रस्त महिलांनी महापालिकेच्या ‘५-ड’ प्रभाग क्षेत्र येथील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. यादरम्यान, स्थानिक माजी नगरसेवक मनोर राय हेदेखील उपस्थित होते.
मागील १० वर्षांच्या कालावधीत पाणीटंचाईबाबत काय उपाययोजना केली, असा सवाल माजी नगरसेवक राय यांनी पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंते राजेश गोयल यांना केला. तसेच आठ दिवसांत हा प्रश्न मार्गी लावला नाही, तर २५ जुलैला तीव्र आंदोलन करण्यात येईल, तसेच महापालिकेला टाळे ठोकू, असा इशाराही राय यांनी दिला आहे.
कल्याण पूर्वेला नेतिवली प्लांटमधून पाच एमएलडी पाणीपुरवठा व्हावा, असा ठराव मंजूर असताना मंजूर कोट्याचे पाणी दिल्यास प्रश्न काहीसा सुटेल, असेही आंदोलकांनी निदर्शनास आणून दिले. त्याचबरोबर बारावे प्लांटमध्ये वारंवार वीज जाणे, नदीतून जलवाहिनीत कचरा, गाळ अडकणे असे प्रकार घडत असल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा करतो, अशीही उत्तर मिळतात. मग यावर पाणीपुरवठा विभाग काय करीत आहे, असाही सवाल या वेळी केला.
कल्याण पूर्वेला होणारा पाणीपुरवठा हा इतर ठिकाणी वळवला जात असल्याने येथील लोकांना पुरेसे पाणी मिळत नाही. येथील पाण्याच्या टाक्यादेखील पूर्ण क्षमतेने भरत नाहीत. त्यामुळे नागरिकांनाही मुबलक प्रमाणात पाणी मिळत नाही. परिणामी इतर ठिकाणी दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा होतो. हा भेदभाव म्हणजे कल्याण पूर्वेतील नागरिकांवर केला जाणारा अन्यायच आहे. अशा संतप्त भावना या वेळी आंदोलनकर्ते राजेश अंकुश यांनी व्यक्त केल्या. मनसेने आंदोलन केल्यानंतर २४ तासांतच पाणीप्रश्नावर आणखी एक मोर्चा आल्याने कल्याण पूर्वेत पाण्याच्या विषयावर महापालिकेविरोधात येत्या काही दिवसांत मोठे जनआंदोलन उभे राहील, असे चित्र सध्या निर्माण झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.