दंडात ९० टक्‍के सवलत

दंडात ९० टक्‍के सवलत

Published on

दंडात ९० टक्‍के सवलत
आंदोलनानंतर पनवेल आयुक्तांची घोषणा; अभय योजनेचा मालमत्ताधारकांना लाभ

पनवेल, ता. १७ (बातमीदार)ः आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केल्यानंतर पनवेल महापालिका आयुक्‍त मंगेश चितळे यांनी विहित मुदतीत म्हणजे १८ जुलै ते २० सप्टेंबर या कालावधीत मालमत्ता कराचा भरणा केल्यास ९० ते २५ टक्‍के दंड माफीची घोषणा केली आहे. मालमत्ताधारकांनी या कालावधीमध्ये कराची रक्कम भरल्यास त्यांना जवळपास ६०० कोटी रुपयांची सवलत मिळू शकते, असे आयुक्तांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पनवेल महापालिकेची स्थापना २०१६ झाली. त्यानंतर मालमत्ता कराचे भिजत घोंगडे कायम आहे. याविरोधात परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांच्यासह इतर सामाजिक संस्थांनी थेट न्यायालयात धाव घेतली; परंतु याबाबत अद्याप अंतिम निर्णय देण्यात आलेला नाही.
पनवेलकरांवर पूर्वलक्षी मालमत्ता कर लादण्यात आला. याविरोधात खारघर कॉलनी फोरमनेसुद्धा आवाज उठवला. सिडको वसाहतीतील नागरिकांनी सेवाशुल्क भरले. त्यानंतरही रहिवाशांना मालमत्ता कर देण्यात आला. विधानसभा निवडणुकांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाची पाहणी दौऱ्यात मालमत्ता करावरील शास्ती माफ करण्याबाबतची घोषणा केली होती; मात्र त्याबाबत नगरविकास विभागाने कोणताही निर्णय घेतला नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यानंतर नगरविकास विभागाच्या सचिवांनी बैठक घेतली आणि शास्ती माफीचे अधिकार आयुक्तांनाच असल्याचे स्पष्ट केले. याच मुद्द्यावर गुरुवारी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पनवेल महापालिकेत आंदोलन केले.
कोणत्या परिस्थितीत शासकीय माफी झालीच पाहिजे, अशी मागणी करीत भाजपने ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर आयुक्त मंगेश चितळे यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. सायंकाळी पाचपर्यंत याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दिली. त्यानंतर पंधरा मिनिटांतच पत्रकार परिषद घेऊन चितळे यांनी अभय योजना जाहीर केली.

शास्ती सवलत चार टप्प्यांत
१८ जुलै ते १५ ऑगस्ट - ९० टक्के
१६ ते ३१ ऑगस्‍ट - ७५ टक्के
१ ते १० सप्टेंबर - ५० टक्के
१० ते २० सप्टेंबर - २५ टक्के

मालमत्ता करावरील अभय योजना आताच आणि एकदाच आहे. योजनेचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ ध्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. पनवेल महापालिकेच्या वेबसाईट अथवा पनवेल कनेक्ट ॲपद्वारे नागरिकांनी मालमत्ता कर ऑनलाइन भरल्यास त्यांना दोन टक्के सवलत मिळेल, तसेच चालू वर्षाचा म्हणजे २०२५-२६चा कर भरल्यास त्यांना मालमत्ता करामध्ये पाच टक्के सूट मिळेल.
- मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com