थोडक्यात नवी मुंबई
दिवाळे गावातील उघडी गटारे बंदिस्त करण्याची मागणी
तुर्भे (बातमीदार) : दिवाळे गावातील उघडी गटारे बंदिस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात डासांची उत्पती होत असून, परिसरात रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दिवाळे गावात उघडी गटारे, तुटलेली झाकणे यामुळे संपूर्ण परिसरात अस्वच्छता आणि सर्वत्र पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे उघड्या गटारांमुळे अरुंद गल्लीतून चालताना वृद्ध नागरिकांसह शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. रात्री-अपरात्री चालताना अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दिवाळे कोळीवाड्यातील मंगलमूर्ती मित्रमंडळ, छाया कला सर्कल या संस्थांसह माजी नगरसेविका भारती कोळी व मनसेचे भूषण कोळी यांनी याबाबत नवी मुंबई महापालिकेला वारंवार यासंदर्भात तक्रार करून रीतसर पत्रदेखील दिले आहे. दरम्यान, त्याकडे पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.
.............
चिंचवलीतील वनवासी कल्याण आश्रमाला मदतीचा हात
तुर्भे, ता. १७ (बातमीदार) : नेरूळ येथील युथ कौन्सिल या सेवाभावी संस्थेच्या विद्यमाने पनवेल तालुक्यातील चिंचवली येथील वनवासी कल्याण आश्रमातील मुलांसाठी शालेय साहित्य, साबण, टूथपेस्ट, खोबरेल तेल, हातरुमाल अशा दैनंदिन गरजेच्या वस्तूंची पूर्तता करण्याबरोबरच दोन सिलिंग पंखे अशा स्वरूपाची मदत उपलब्ध करून देण्यात आली. डॉ. रवींद्र गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या उपक्रमात आश्रमाच्या छात्रावास पालक प्रिया आचवल, विवेक फोफावणे, सुभाष हांडे देशमुख, जी. आर. पाटील, अशोकराव महाजन, दत्तात्रय आंब्रे, दिलीपराव चिंचोळे, रवींद्र कांबळे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमांतर्गतच सिद्धिविनायक केअर सेंटर, तुर्भे स्टोअर यांच्यातर्फे आश्रमातील सर्व मुलांची शारीरिक तपासणी, उपचार, चिकित्सा व आवश्यक औषधे देण्यात आली. डॉ. रवींद्र गोसावी यांनी या वेळी युथ कौन्सिल संस्थेच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करून विद्यार्थ्यांना शरीर स्वास्थ्याविषयी सखोल मार्गदर्शन केले. आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, हे विशद करताना त्यांनी सांगितले, की आपला सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे आपले शरीर व आपले आरोग्य हेच आहेत. त्याची व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. त्यासाठी स्वच्छता राखणे खूप महत्त्वाचे आहे.
.............
सोन्याची चेन खेचणारा अल्पवयीन गजाआड
नवी मुंबई (वार्ताहर) : महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या १७ वर्षीय अल्पयवीन मुलाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना गत मंगळवारी रात्री ऐरोलीत घडली. रबाळे पोलिसांनी या घटनेतील अल्पवयीन मुलाविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर पुढील कारवाई सुरू आहे.
या घटनेतील तक्रारदार महिला निशी पवार (वय २८) या ऐरोली सेक्टर-७मधील ज्ञानदीप दर्शन सोसायटीत राहण्यास आहेत. गत मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्या कामावरून आपल्या घरी परतत होत्या. या वेळी त्या आपल्या इमारतीच्या गेटसमोर आल्या असताना, पाठीमागून आलेल्या अल्पवयीन मुलाने निशी पवार यांच्या गळ्यातील आठ ग्रॅम वजनाची ७० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन खेचून पलायन केले. या वेळी निशी पवार यांनी आरडाओरड केल्यानंतर नागरिकांनी सोन्याची चेन घेऊन पळून जाणाऱ्या अल्पवयीन मुलाला पकडले. त्यानंतर नागरिकांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी या अल्पवयीन मुलाविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर पुढील कारवाई सुरू केली आहे.
............
पालिकेच्या पद भरतीला प्रतिसाद
वाशी, ता. १७ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिका सरळ सेवा भरती-२०२५ प्रक्रियेला बुधवारी (ता. १६) सुरुवात झाली. १९ जुलैपर्यंत दररोज तीन सत्रांमध्ये ऑनलाइन स्पर्धा परीक्षा पार पडणार आहे. परीक्षेच्या पहिल्या दिवशी १२ जिल्ह्यांतील २८ केंद्रांवर सुरळीतपणे परीक्षा सुरू झाली आहे. ही परीक्षा प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस यांच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. गट-क आणि गट-ड मधील ३० संवर्गातील ६६८ पदांकरिता ८४, ७७४ अर्ज ऑनलाइन प्राप्त झाले आहेत. उमेदवारांना परीक्षा देणे सोयीचे जावे, याकरिता १२ जिल्ह्यांमध्ये २८ केंद्रांवर परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी नऊ वाजता सर्व २८ परीक्षा केंद्रांवर परीक्षा नियोजित वेळेमध्ये पार पडली. सकाळी ९ ते ११ वाजताच्या पहिल्या सत्रात ७, ८९८ उमेदवारांनी परीक्षा दिली. दुपारी १ ते ३ वाजता दुसऱ्या सत्रात ७, ००९ उमेदवारांनी परीक्षा दिली. तर सायंकाळी ५ ते ७ वाजता तिसऱ्या सत्रात ६, ६०८ उमेदवारांनी परीक्षा दिली. अशाप्रकारे नवी मुंबई महापालिकेच्या सरळ सेवा भरती प्रक्रियेतील पहिल्या दिवशी २१, ५१५ उमेदवारांनी परीक्षा दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.