प्लॅस्टिक फूलविक्रेत्यांवर संक्रांत
प्लॅस्टिक फूलविक्रेत्यांवर संक्रांत?
बंदीच्या निर्णयाचे भय; लाखो रुपयांचा फटका
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १७ ः फूल उत्पादक शेतकऱ्यांनी प्लॅस्टिकच्या फुलांना विरोध केल्यामुळे प्लॅस्टिकची फूलविक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर संक्रांत आली आहे. ऐन सणासुदीच्या काळात बंदीचा हा निर्णय झाल्यास विक्रेत्यांना लाखो रुपयांचा फटका बसेल, अशी शक्यता वाशीच्या एपीएमसीतील व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या वस्तू विक्रेत्यांची मोठी दुकाने आहेत. या दुकानांतून नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरात प्लॅस्टिकच्या विविध वस्तू आणि सजावटीचे साहित्य विक्रीकरिता खरेदी केले जाते. आता गोपाळकाला, स्वातंत्र्यदिन, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी असे एकामागोमाग एक सण येत आहेत. या सणानिमित्ताने अनेक घरांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी सजावट केली जाते. या सजावटीमध्ये रंगीबेरंगी फुलांचा वापर केला जातो; मात्र सणाच्या काळात खऱ्या फुलांचा भाव वधारतो. अशा परिस्थितीत सामान्य लोकांना खरी फुले सजावटीकरिता घेणे परवडत नसल्याने प्लॅस्टिकच्या फुलांचा आधार असतो. त्यामुळे सणाच्या काळात प्लॅस्टिकपासून तयार केलेल्या रंगीत फुलांना मोठी मागणी असते. आमदार रोहित पाटील यांनी आज दादर येथे फूल मार्केटबाहेर प्लॅस्टिकच्या फुलांची होळी केली. तसेच १०५ आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बंदी घालण्याबाबत पत्र लिहिले आहे. त्यामुळे सरकारने बंदी आणल्यास प्लॅस्टिकची फुले आणि सजावटीच्या साहित्य विक्रीवर अवलंबून असणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे व्यापारी संघटनाही मंत्रालयस्तरावर भेट घेणार असल्याचे समजते आहे.
...
श्रावण महिन्यातील सण आणि उत्सव लक्षात घेता आम्ही जास्त प्रमाणात प्लॅस्टिकच्या फुलांचा माल भरला आहे. अचानक विक्री बंद केल्यास आमचे लाखो रुपयांचे नुकसान होईल. त्यामुळे आम्ही संघटनेमार्फत सरकारकडे काही दिवसांचा अवधी मागणार आहोत. त्यानंतर बंदी घातली तरी चालेल.
- रमेश कारानिया, प्लॅस्टिक फुलांचे व्यापारी, एपीएमसी, वाशी
...
प्लॅस्टिकच्या फुलांचा शेतकऱ्यांना फटका
पनवेल, ता. १७ (बातमीदार) ः दिवाळी, दसरा, पाडव्यासह वर्षभर सणानिमित्त फूल उत्पादक शेतकरी व विक्रेत्यांना हमखास नफा मिळतो. पनवेल ही फूल विक्रेत्यांसाठी मोठी बाजारपेठ आहे; परंतु गेल्या काही वर्षांपासून कृत्रिम प्लॅस्टिकच्या फुलांनी बाजारपेठ व्यापल्याने सण-उत्सवात नैसर्गिक फुलांची मागणी कमी झाल्याचे फुलशेती करणारे महेश ढेंबरे यांनी सांगितले.
फूल व्यवसाय हा अगदी अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही चांगले आर्थिक उत्पन्नाचे साधन आहे. सण-उत्सवांत फुलांना चांगला भाव मिळतो. त्यामुळे थोड्याशा जमिनीत फूलशेती करून अनेक जण चांगले उत्पन्न मिळायचे; मात्र प्लॅस्टिक फुलांमुळे ताज्या फुलांचा बाजार कोमेजत आहे. दहा वर्षांत कृत्रिम विशेषतः प्लॅस्टिकच्या फुलांनी बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर काबीज केली आहे. प्लॅस्टिकमुळे होणारे नदीचे प्रदूषण आणि पर्यावरणाला होणारा धोका विचारात घेऊन या फुलांवर बंदी घालण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे. सिंगल यूज प्लॅस्टिकच्या पिशव्यांसारखाच प्लॅस्टिकच्या फुलांचा पर्यावरणावर परिणाम होतो, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
...
६० टक्के प्रतिकूल परिणाम
प्लॅस्टिकच्या फुलांमुळे फुलशेतीवर ६० टक्के प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यामुळे आता फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी काय करावे, असा प्रश्न आहे, असे फलटणचे फूल उत्पादक शेतकरी महेश ढेंबरे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.