आश्रमशाळांमध्ये कर्मचाऱ्यांची वानवा

आश्रमशाळांमध्ये कर्मचाऱ्यांची वानवा

Published on

महेंद्र पवार : सकाळ वृत्तसेवा
कासा, ता. १७ : डहाणू तालुक्यातील आदिवासी विकास विभागाच्या निवासी आश्रमशाळांमध्ये सध्या शिक्षक, सुरक्षा कर्मचारी, महिला अधीक्षक या आवश्यक कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. अनेक पदे न भरण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच सुरक्षेवरही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीमुळे काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना, शैक्षणिक सुविधांचा अभाव, गैरसोयी आणि सुरक्षेचा अभाव अशा समस्या यापूर्वी समोर आल्या आहेत.

डहाणू तालुक्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत एकूण ३३ आश्रमशाळा कार्यरत आहेत. त्यामध्ये एकूण ५६१ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे; मात्र यातील ३५६ पदे भरलेली असून २३५ जागा रिक्त असून केवळ काही पदे कंत्राटी पद्धतीने भरलेली आहेत. यामध्ये शिक्षक, अधीक्षक, शिपाई, स्वयंपाकी आदींचा समावेश आहे. शिक्षकांची संख्या अपुरी असल्यामुळे काही शिक्षकांवर अतिरिक्त तास आणि जबाबदाऱ्या येत आहेत. परिणामी, शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे.

आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची शारीरिक, मानसिक व शैक्षणिक घडामोडी योग्य पद्धतीने पार पडाव्यात, यासाठी प्रशिक्षित व पुरेसे कर्मचारी असणे अत्यावश्यक आहे. शाळांतील अनेक पदे रिक्त असल्याने पालक व स्थानिक नागरिकांकडून यावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यांनी शिक्षक आणि महिला अधीक्षकांची संख्या तातडीने वाढवण्याची मागणी केली आहे. या प्रश्‍नावर तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे. आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी पालक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून जोर धरत आहे.

भरती प्रक्रिया सुरू असल्याचा दावा
प्रशासनाकडून या समस्येकडे काही प्रमाणात लक्ष दिले जात असल्याचे चित्र दिसत आहे. आताच २६ शिक्षक कर्मचाऱ्यांची पदे भरली, तर इतर कर्मचाऱ्यांची आयुक्तालय कार्यालयाकडून कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येत आहे. यात कला, क्रीडा, संगणक या विषयांतील शिक्षकांसह अन्य पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे, असे आदिवासी विकास अधिकाऱ्यांनी सांगितले.

डहाणू विभागातील आश्रमशाळांमध्ये रिक्त पदे भरली जात आहेत. आताच २६ शिक्षक व कर्मचाऱ्यांची पदे भरली असून, लवकरच कर्मचारी संख्येत वाढ होईल. त्यामुळे शिक्षण व सुरक्षेसंदर्भातील अडचणी दूर होतील. महिला अधीक्षकांची संख्या वाढवण्याचादेखील आमचा प्रयत्न आहे. आयुक्तालयाकडून कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती होत आहे.
- विशाल खत्री, प्रांत अधिकारी, प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास विभाग, डहाणू

एकूण मंजूर पदे ५९१
भरलेली पदे ३५६
रिक्त पदे २३५

डहाणूतील पदांचा लेखाजोखा
पद मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे
माध्यमिक मुख्याध्यापक २७ २० ७
उच्च माध्यमिक शिक्षक १०४ ५२ ५२
माध्यमिक शिक्षक १०८ ७० ३८
प्राथमिक शिक्षक (पदवीधर) ३३ १२ २१
प्राथमिक शिक्षक २०० १२३ ७७
अधीक्षक ३३ ३० ३
महिला अधीक्षक ३३ २७ ६
वरिष्ठ लिपिक १२ ३ ९
कनिष्ठ लिपिक १८ ९ ९
ग्रंथपाल १२ ८ ४
प्रयोगशाळा परिचर ११ २ ९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com