विधानमंडळात गुंडा''राष्ट्र''
विधिमंडळात गुंडा‘राष्ट्र’
पडळकर-आव्हाड वाद विकोपाला, विधिमंडळाच्या लॉबीत हाणामारी
मुंबई, ता. १७ ः विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात कायदा आणि सुरक्षेवर चर्चा सुरू असतानाच गुरुवारी (ता. १७) लॉबीत हाणामारी झाल्याची संतापजनक घटना घडली. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांवर हल्ला करून सभागृहाच्या पावित्र्यास धक्का लावला आहे. विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच लॉबीत हाणामारी झाल्यामुळे आमदारांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकारानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनी दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
लॉबीत झालेल्या हाणामारीचे तीव्र पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत उमटले. यावर आमदार जितेंद्र आव्हाड याबाबत सभागृहात म्हणाले, की सभागृहात मला व्हॉट्सॲपवर गलिच्छ शब्दांत शिव्या आणि जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे माझ्यावर हल्ला करण्यासाठीच ते आले होते. मी निघून गेल्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला.’ या प्रकारानंतर आमदार रोहित पवार, सना मलिक यांनी सुरक्षेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यावर विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानमंडळ परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी माझी आहे. यामुळे आपण याविषयीचा अहवाल मागवला आहे. मी उचित कारवाई करीन, असे सभागृहाला आश्वासन दिले. विधान परिषदेत ॲड. अनिल परब यांच्यासह काही आमदारांनी या घटनेविषयी चिंता व्यक्त करून कारवाईची मागणी केली. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या विषयावर माध्यमांशी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला.
----
हे काय चालले आहे?
१. विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीचा दरवाजा आमदार जितेंद्र आव्हाड यांना लागला. त्यावरून दोघांत वाद
२. विधान परिषदेच्या उपाध्यक्षांच्या सुरक्षा रक्षकाने जाणीवपूर्वक धक्का दिल्याचा आमदार वरुण सरदेसाई यांचा आरोप
३. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची कँटीन सुपरवायझरला मारहाण
४. सभागृहात एकमेकांना पाहून घेण्याची धमकी
५. विधिमंडळाच्या लॉबीत थेट आव्हाड-पडळकर यांच्या समर्थकांमध्ये मारहाण
...
सुरक्षेबाबत काही प्रश्न
१. विधिमंडळ अधिवेशनाचा पास देताना संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमी तपासली जाते का?
२. विधिमंडळाच्या लॉबीत हाणामारी करण्याची हिंमत आली कुठून?
३. पुन्हा अशी घटना होऊ नये म्हणून कडक कारवाई होणार का?
...
सत्ताधारी आमदारांच्या समर्थकांची गुंडगिरी विधान भवनापर्यंत पोहोचली असेल तर त्यांच्यासह त्यांच्या पोशिंद्यावरही कारवाई केली पाहिजे.
- उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना (ठाकरे गट)
----
संसदेत दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे विधिमंडळात कोणाला आणायचे, याची काळजी आमदारांनी घेतली पाहिजे.
- नाना पटोले, काँग्रेस नेते
----
आमदारांना विधिमंडळाच्या पायऱ्यांवर मारहाण, धक्काबुक्की होत असेल तर आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. यावर कठोर कारवाई व्हायला हवी.
- सचिन अहिर, आमदार, शिवसेना (ठाकरे गट)
----------
विधिमंडळ शासकीय कामांव्यतिरिक्त ज्यांना पास दिले जातात, त्यांची चौकशी होणे आवश्यक आहे. विधानसभा अध्यक्षांनी याबाबत गंभीर नोंद घेऊन दोषींवर कारवाई करावी.
- ॲड. आशीष शेलार, सांस्कृतिक कार्यमंत्री
...
पहिल्यांदाच अशा प्रकारचे चित्र पाहायला मिळते, अशा प्रकारावर कठोर कारवाई केली जावी.
- गुलाबराव पाटील, पाणीपुरवठामंत्री
----
विधिमंडळात अशा प्रकारे हाणामारीचा प्रकार कधीही घडला नाही. आजचा प्रकार खेदजनक आहे. विधिमंडळाला पोलिसांप्रमाणे कारवाई करण्यासाठीचे अधिकार किंवा तशी तरतूद नाही, त्यामुळे सुरक्षा रक्षक संबंधितांना पोलिसांच्या ताब्यात देतील.
- डॉ. अनंत कळसे, विधिमंडळाचे माजी सचिव
...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.