हिंदीसक्ती करून तर बघा!
हिंदीसक्ती करून तर बघा!
राज ठाकरे यांचा इशारा; मुख्यमंत्र्यांवर टीका
भाईंदर, ता. १८ (बातमीदार) : राज्याचे मुख्यमंत्री तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करणारच, अशी भाषा बोलत आहेत. राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर खुशाल करावी. मोर्चाच्या केवळ धसक्याने हिंदीसक्तीचा निर्णय मागे घेतला; मात्र पहिली ते पाचवी हिंदी सक्तीची करण्याचे प्रयत्न करून बघाच, केवळ दुकाने नाही तर शाळाही बंद करू. मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिरा रोड येथे दिला.
मराठी बोलण्यावरून एका दुकानदाराला मारहाण झाल्याच्या घटनेवरून मिरा रोडमध्ये तणाव निर्माण झाला होता. या वादानंतर राज ठाकरे शुक्रवारी (ता. १८) मिरा रोडमध्ये आले होते. मिरा रोडमधील तो प्रसंग होता; मात्र विनाकारण वाद वाढवला. विषय समजून न घेता राजकीय पक्षांच्या दबावाखाली बंद केला. किती काळ बंद करणार आहात? महाराष्ट्रात राहता तर शांत राहा, तुमच्याशी आमचे काही वाकडे नाही; मात्र मस्ती केली तर महाराष्ट्राचा दणका बसणारच, असे सांगून राज ठाकरे यांनी मिरा रोडमध्ये घडलेल्या घटनेचे समर्थन केले. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतो. अन्य शाळांमध्ये मराठी सक्तीची करायला हवी ते सोडून हिंदी सक्तीची करण्याच्या मागे लागता. हे सर्व कोणाच्या दबावाखाली, असा सवाल करून ते म्हणाले, की केंद्र सरकारचे हे पूर्वीपासूनचे आहे. काँग्रेसच्या काळापासून हे चालत आले आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा प्रचंड मोठा होता. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायचा डाव काही गुजराती नेते व गुजराती व्यापाऱ्यांचा होता. मुंबई महाराष्ट्राला देऊ नका, असे पहिल्यांदा वल्लभभाई पटेल यांनी सांगितले. वल्लभभाई पटेल यांच्याकडे लोहपुरुष म्हणून बघत होतो. तुम्ही महाराष्ट्राला विरोध केला. मोरारजी देसाई यांनी आंदोलन करणाऱ्यांना गोळ्या घालून ठार मारले. मुंबईवर अनेक वर्षांपासून डोळा आहे. हिंदीसक्ती ही पहिली पायरी आहे. आपण शांत बसलो तर हळूहळू मुंबई गुजरातला जोडण्याचे त्यांचे स्वप्न आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले.
मुंबईलगतचे मिरा-भाईंदरपासून ते पालघरचे सगळे मतदारसंघ यांना हिंदी भाषिक बनवायचे आहेत. त्यानंतर हे मुंबईत पोहोचणार व ती गुजरातला मिळवणार. भाजपचा खासदार सांगतो ‘पटक पटक के मारेंगे’; मात्र त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. मुंबईत येऊन दाखव. तुला मुंबईच्या समुद्रात बुडवून मारू. तुमची सत्ता विधानसभा आणि लोकसभेत आमची सत्ता रस्त्यावर आहे. माझी कोणाशीही मैत्री अथवा शत्रुत्व नाही; मात्र मराठी आणि महाराष्ट्र यावर कोणाशी तडजोड नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. माजी आमदार राजू पाटील, संदीप देशपांडे, अविनाश जाधव आदी या वेळी उपस्थित होते.
----
मराठीला २,५०० वर्षांचा इतिहास!
हिंदीला केवळ दोनशे वर्षांपासूनचा इतिहास आहे तर मराठीला दोन ते अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला; मात्र एक वर्ष होऊन गेल्यानंतरही एक पैसाही दिला नाही. भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी १,४०० वर्षांचा इतिहास लागतो. त्यामुळे हिंदीला अभिजात दर्जा मिळणासाठी अजून १,२०० वर्षे आहेत आणि अशी भाषा तुम्ही आमच्यावर लादणार? हिंदी भाषेने काय भले केले? हिंदी नट आणि नट्यांचे भले झाले आणि या भाषेसाठी मुख्यमंत्री पेटलेत, असा टोला राज ठाकरे यांनी हाणला.
......
हिंदीने अडीचशे भाषा मारल्या!
हिंदी ही कोणाचाही मातृभाषा नाही, ती कडबोळ्यातून तयार झालेली भाषा आहे. हिंदी भाषेने अडीचशे भाषा मारल्या. जगात कोणतीही भाषा वाईट नसते, हिंदीही वाईट नाही. हिंदी भाषा लादणार असला तर ती अजिबात बोलणार नाही आणि लहान मुलांवर तर अजिबात लादू देणार नाही. यावरून केवळ राजकारण सुरू आहे.
----
आम्ही हिंदू, हिंदी नाही!
आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही. हिंदुत्वाच्या बुरख्याखाली मराठी संपवणार असाल तर माझ्यासारखा कडवा मराठी नाही, असे राज ठाकरे यांनी ठणकावले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.