घोषित पर्यावरण संवेदनशील क्षेत्राला विरोध

घोषित पर्यावरण संवेदनशील क्षेत्राला विरोध

Published on

घोषित पर्यावरण संवेदनशील क्षेत्राला विरोध
ग्रामीण भागात ग्रामस्‍थांचा बैठकांवर जोर; संबंधित प्रशासनाला निवेदन
रोहा, ता. १९ (बातमीदार) ः केंद्र शासनाच्या पर्यावरण वने व वातावरण बदल मंत्रालयाने रोहा तालुक्यातील ४३७ गावांचे क्षेत्र वन पर्यावरण संवेदनशील म्हणून घोषित केले आहे. तालुक्यातील तलाठी सज्जा चिल्हे हद्दीतील देवकान्हे, धानकान्हे, चिल्हे व तळवली इत्यादी गावांचा यामध्ये समावेश आहे. नियोजित क्षेत्रावर हरकत घेण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी एकजूट दाखवून ग्रामीण भागात जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. सरकारच्या या निर्णयाने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. ग्रामस्थांनी या निर्णयाविरोधात आक्रमक पवित्रा घेत आपला विरोध अधिकच तीव्र दाखविण्यासाठी गावोगावी बैठकांचा धडाका सुरू केला आहे. या विषयाबाबत महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी (ता. १८) चिल्हे गावात पार पडली.
रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांत पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यात आल्याचा मसुदा तहसील कार्यालयाकडून देण्यात आला आहे. जिल्ह्यातील ४३७ गावे ही या क्षेत्राअंतर्गत केंद्र शासनाच्या मसुद्यामध्ये नमूद आहेत. त्यानुसार रोहा तालुक्यातील ११९ गावांना पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्‍हणून घोषित करण्यात आले आहे. रोहे तालुक्यातील देवकान्हे, धानकान्हे, चिल्हे व तळवली ही कोलाड पाटबंधारे विभाग (जलसंपदा विभाग) यांच्या अंतर्गत कालव्याच्या पाण्यावर ओलिताखाली असणारी गावे आहेत. या विभागात कोणत्याही दगडखाणी नाहीत. अभयारण्ये नाहीत किंवा कोणत्याही प्रकारे पर्यावरणाचा ऱ्हास होईल, असे कोणतेही काम या गावांच्या हद्दीत नाही. तरीदेखील घोषित करण्यात आलेले पर्यावरण संवेदनशील क्षेत्र रद्द करावे, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. त्‍यामुळे याप्रकरणी रविवारी (ता. ६) धानकान्हे येथील मारुती मंदिरात शेतकरी व ग्रामस्थांनी बैठक घेत पर्यावरण संवेदनशील क्षेत्राला विरोध केला होता. त्‍यानंतरही प्रशासनाने नमते न घेतल्याने पुन्‍हा या विषयाबाबत महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी (ता. १८) चिल्हे गावात पार पडली. या वेळी विभागातील ज्येष्ठ नेते तथा शेतकरी बालकृष्ण बामणे, वसंतराव मरवडे, धनाजीराव लोखंडे, ज्ञानदेव भोईर, भिकू सुटे, दामोदर भोईर, सरपंच रवींद्र मरवडे, पोलिस पाटील गणेश महाडिक, गणपत शिंदे, सखाराम कचरे, सुरेश महाडिक, सुनील महाडिक, रामभाऊ शेलार, किशोर भोईर आदी विविध गावांतील शेतकरी बांधव, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याबाबतच्या लढ्याचा एक भाग म्हणून रोहा तहसीलदार, प्रांताधिकारी, वन विभाग तसेच लोकप्रतिनिधी रायगडचे खासदार सुनील तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांना याबाबचे निवेदन देण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकारी, राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील त्याचप्रमाणे माजी आमदार, शेकाप नेते जयंत पाटील यांनादेखील येत्या दोन दिवसांत निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

...............
वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू : शंकरराव म्हसकर
रोहा, ता. १७ (बातमीदार) ः तालुक्यात होऊ घातलेल्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्राविरोधात शेकापने दंड थोपटले आहेत. या अनुषंगाने प्रशासनाविरोधात शेकापने आक्रमक भूमिका घेत प्रांत अधिकारी, वन विभाग आणि तहसीलदार यांना निवेदन देत आपल्या भावना आणि राग व्यक्त केला आहे. शेकापने केलेल्या मागणीकडे गंभीरपणे लक्ष न दिल्यास शेकाप रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर यांनी दिला आहे.
रोहा तालुका हा एमआयडीसी क्षेत्र असलेला आहे. मुंबई व नवी मुंबई, पनवेल महापालिकेच्या जवळ हे क्षेत्र आहे. तसेच रोहा तालुक्यालगत अलिबाग व पेणमधील एमएमआरडी क्षेत्र येते. रोहा तालुक्यामध्ये नागोठणे परिसरात रिलायन्स इंडस्ट्रीज, महाराष्ट्र सिमलेस, महालक्ष्मी सिमलेस, सुप्रीम पेट्रोकेमिकल, जिंदाल ड्रिलिंग, विभोर स्टील इत्यादी कारखाने आहेत. तर धाटाव एमआयडीसीच्या क्षेत्रामध्ये ५० केमिकल कारखाने आहेत. रोहा हा भात उत्पादक शेतकऱ्यांचा तालुका आहे. रायगड जिल्हा हा भाताचे कोठार आहे. रोह्याचा पोहा देशभरामध्ये जातो. तसेच शेतीपूरक व्यवसाय म्हणून वीटभट्टी, कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, भाजीपाला शेतीचा व्यवसाय करतात. असे असताना प्रशासनाकडून पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित केल्यानंतर येथील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होणार आहे. आपल्या स्वतःच्या शेतीमध्ये कोणतेही पूरक व्यवसाय व कुटीरोद्योग करता येणार नाहीत. स्वतःच्या मालकीची जमीन असूनदेखील कुक्कुटपालन, वीट व्यवसाय, दुग्धव्यवसाय, शेळीपालन, मत्स्यशेती व्यवसाय करण्यास अडचण येणार आहे. त्यामुळे तालुक्यातील ११९ गावांतील हजारो शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचे शेकापकडून सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com