
वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. १९ (बातमीदार)ः पनवेल महापालिकेने विकासाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक आणि चांगल्या दर्जाचे बसथांबे उभारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, ते पर्यावरणपूरक असून सौरप्रणालीवर पंखे, दिवे कार्यान्वित केले जात आहेत. यामुळे बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांचे ऊन, वारा, पावसापासून संरक्षण होणार आहे.
पनवेल तालुक्यातील खारघर, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, नावडे, तळोजा वसाहतीचा विकास सिडकोकडून करण्यात आला आहे तर सार्वजनिक वाहतुकीसाठी काही वर्षांपासून एनएमएमटीची बससेवा सुरू करण्यात आली. पनवेल रेल्वेस्थानकातून करंजाडे, साईनगर, खांदेश्वर, मानसरोवर, रोडपाली असा बसफेऱ्या सुरू असतात. पनवेल महापालिकीच्या हद्दीत एसटी प्रवासी वाहतूकही होते. शहरात अनेक बसथांबे आहेत. त्यापैकी बहुतांश थांब्यावर निवारा शेड नसल्याने प्रवाशांची गैरसोय व्हायची. कामोठे येथील सचिन गायकवाड यांनी अत्याधुनिक बस थांबण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार सिडको वसाहती तसेच महामार्गावर अत्याधुनिक थांबे बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
५७ बसथांबे उभारणार
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान २०२४-२५ योजनेंतर्गत पनवेल महापालिका हद्दीत नागरी दळणवळण साधनांचा विकासअंतर्गत प्रवाशांच्या सोयीसाठी एकूण ५७ पर्यावरणपूरक बसथांबे विकसित करण्याचे मंजूर करण्यात आले आहे.
३८ ठिकाणी काम पूर्णत्वास
खारघर २५, कामोठे दोन, कळंबोली चार आणि पनवेल शहरात सात असे एकूण ३८ बसथांबे विकसित करण्यात आले आहेत. तर १९ ठिकाणी काम प्रगतिपथावर आहे. गॅल्वनाइज्ड स्टील, ॲल्युमिनियम कंपोझिट पॅनेल, वूड प्लॅस्टिक कंपोझिट, स्टेनलेस स्टील त्यासाठी वापरण्यात आले आहे. एक बसथांबा उभारणीचा खर्च जवळपास २२.८९ लाख इतका आहे. तीन वर्षांत सर्व बसथांब्यांची दुरुस्ती संबंधित ठेकेदारामार्फत करण्यात येणार आहे. बसथांबे पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणार असून आधुनिक पद्धतीने स्वयंचलित दिवे व पंखे लावण्यात येत आहेत.
पनवेल महापालिका हद्दीत येणाऱ्या बसथांब्यावर निवारा शेड टाकण्याकरिता नवी मुंबई परिवहन उपक्रमाने पनवेल महापालिकेकडे यादीसह परवानगीसाठी अर्ज केला होता. त्याप्रमाणे प्रवासांच्या सोयीकरिता शेड टाकण्याची परवानगी महापालिकेडून देण्यात आली होती; मात्र एनएमएमटीने पनवेल पालिकेकडे बोट दाखवले होते. त्यामुळे प्रवाशांना मात्र ऊन, वारा, पावसाचा त्रास सहन करावा लागत होता. तब्बल पाच वर्षांनंतर महापालिकेने बसथांबे उभारण्याचे काम हाती घेतले. प्रशासनाची भूमिका स्वागतार्ह आहे.
- सचिन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते, कामोठे
स्मार्ट बसथांब्यांमुळे प्रवाशांना आधुनिक व सुरक्षित सुविधा मिळणार आहेत. शिवाय, ही संकल्पना पर्यावरणपूरक असल्यामुळे हरित शहराच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले जात आहे. स्मार्ट शहर योजनेंतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा दर्जा सुधारण्याचा एक प्रयत्न म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा अनुभव अधिक सुसह्य व आरामदायी करण्यासाठी ही योजना निर्णायक ठरणार आहे.
- डॉ. वैभव विधाते, उपआयुक्त, पनवेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.