स्वच्छतेच्या शर्यतीत उल्हासनगरची झेप

स्वच्छतेच्या शर्यतीत उल्हासनगरची झेप

Published on

नवनीत बऱ्हाटे : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. १९ : स्वच्छ भारत अभियानाच्या अनुषंगाने केंद्र सरकारतर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’मध्ये उल्हासनगर महापालिकेने उल्लेखनीय यश संपादन करत देशभरात ४३वा क्रमांक पटकावला आहे. या आधी २०२३मध्ये उल्हासनगरचा क्रमांक ११० होता. केवळ एका वर्षात ६७ स्थानांनी उंचावलेल्या या यशामुळे संपूर्ण शहरात आनंदाचे वातावरण आहे.
उल्हासनगरची ही झेप म्हणजे फक्त आकड्यांची भरारी नसून, स्थानिक प्रशासनाच्या दूरदृष्टीपूर्ण धोरणांची, सातत्याने केलेल्या उपक्रमांची आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागाची ही फलश्रुती आहे. महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. किशोर गवस यांच्या नेतृत्वाखाली शहराने ‘स्वच्छता ही सेवा’ या संकल्पनेला खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप दिले आहे. महापालिकेने यंदा ओडीएफ++ प्रमाणपत्र टिकवून ठेवले आहे. स्वच्छता क्रमांकासाठी आवश्यक विविध मानकांमध्ये उच्च गुण मिळवले आहेत. यंदाच्या सर्वेक्षणात उल्हासनगरला १२,५००पैकी ८,६३२ गुण प्राप्त झाले आहेत. ‘घराघरातून कचरा संकलन ५६ टक्के, स्त्रोत पृथ्थकरण २५ टक्के, कचरा प्रक्रिया २१ टक्के, कचराकुंड्यांचे निराकरण ३६ टक्के, त्याचबरोबर निवासी स्वच्छता १०० टक्के, बाजार क्षेत्र १०० टक्के, जलस्रोत १०० टक्के आणि सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेसंबंधी ८० टक्के अशी कामगिरी नोंदवली गेली आहे.
या यशामागे उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, ग्रीन मार्शल्स, तसेच शहरातील नागरिकांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच हे यश शक्य झाले, अशी प्रतिक्रिया आयुक्त आव्हाळे यांनी दिली. महापालिकेने पुढील काळात स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, प्लॅस्टिकमुक्ती आणि हरित पर्यावरण संवर्धनासाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार केला आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२५मध्ये आणखी उच्च स्थान मिळवण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. स्वच्छ उल्हासनगर, सुंदर उल्हासनगर या दिशेने वाटचाल करताना हे यश म्हणजे एक प्रेरणादायी टप्पा ठरला आहे. शहरवासीयांनी दिलेल्या योगदानाची ही सन्मानपूर्वक पावती आहे.

स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये उल्हासनगरने मिळवलेली ४३ वी राष्ट्रीय रँक ही महापालिकेची आणि संपूर्ण शहरवासियांची सामूहिक यशोगाथा आहे. हे यश मिळवण्यासाठी आमच्या प्रशासनाने सातत्याने उपक्रम राबवले, तर नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद देत सक्रिय सहभाग नोंदवला. ODF++ दर्जा कायम ठेवणे आणि विविध निकषांमध्ये उल्लेखनीय प्रगती साधणे ही आम्हा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. आगामी काळातही आपण स्वच्छतेच्या दिशेने अधिक जोमाने काम करत उल्हासनगरला देशातील टॉप १० स्वच्छ शहरांमध्ये आणण्याचा प्रयत्न करू.
- मनीषा आव्हाळे, आयुक्त, उल्हासनगर महापालिका

अहवालातील ठळक बाबी
* राष्ट्रीय क्रमवारी : १०१ शहरांपैकी उल्हासनगरचा क्रमांक - ४३
* एकूण गुण : १२,५००पैकी ८,६३२
* ओडीएफ प्रमाणन : ओडीएफ++
* जीएफसी स्टार रेटिंग : कोणताही स्टार नाही

महत्त्वाचे स्वच्छता निर्देशांक :
* घरोघरी कचरा संकलन: ५६ टक्के
* स्रोत पृथक्करण : २५ टक्के
* कचरा निर्मिती विरुद्ध प्रक्रिया : २१ टक्के
* कचराकुंड्यांचे निराकरण : ३६ टक्के
* निवासी व बाजार क्षेत्राची स्वच्छता : १०० टक्के
* जलस्रोतांची स्वच्छता : १०० टक्के
* सार्वजनिक शौचालये स्वच्छता : ८० टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com