आदिवासी विद्यार्थ्याला शिवसेनेची मदत

आदिवासी विद्यार्थ्याला शिवसेनेची मदत

Published on

कासा, ता. २० (बातमीदार) : वणई भावरपाडा येथील रहिवासी आणि चिंचणी येथील आयटीआयमध्ये शिकणारा विरेंद्र किसन उमतोल याच्या शिक्षणात आर्थिक समस्येमुळे अडथळा येत होता. ही बाब शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना समजताच त्यांच्या मदतीमुळे त्याला दिलासा मिळाला आणि त्याचे पुढील शिक्षण सुरळीत सुरू झाले आहे.

घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असूनही विरेंद्रने काही प्रमाणात फी भागवण्यासाठी बोईसर येथे मजुरीचे काम केले होते, मात्र ३० हजारांपैकी उर्वरित रक्कम भरता न आल्याने फी भरण्याबाबत सतत तगादा लावण्यात येत होता. फी न भरल्यास परीक्षा व हॉल तिकीट मिळणार नसल्याचा इशाराही देण्यात आला होता. त्यामुळे मानसिकदृष्ट्या व्यथित झालेल्या विरेंद्रने चिंचणी येथील युवा एल्गार आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाने ॲड. विराज गडग यांच्या वाणगाव येथील कार्यालयात जाऊन व्यथा मांडली. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत गडग यांनी लगेचच शिवसेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष कुंदन संखे आणि तालुका अध्यक्ष हेमंत धर्ममेहर यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण प्रकरण त्यांच्यासमोर मांडले. यानंतर विरेंद्रला पालघर येथील शिवसेना कार्यालयात बोलावण्यात आले आणि आवश्यक ती आर्थिक मदत देण्यात आली. या वेळी अजय वायेडा, रोहित किणी, चिन्मय उंबरकर, विशाल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. विरेंद्रने त्यांचे आभार मानले आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com