ऐन पावसाळ्यात घामाच्या धारा
ऐन पावसाळ्यात घामाच्या धारा
पावसाची दडी, तापमान वाढले
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : ऊन-पावसाचा खेळ मांडणारा श्रावण महिना उंबरठ्यावर असताना ‘वरुणराजा’ने अचानक दडी मारली आहे. तीन दिवसांमध्ये ठाणे महापालिका क्षेत्रातून पाऊस गायब झाला आहे. जिल्ह्यातही पावसाचा जोर ओसरला आहे. त्यात आर्द्रताही वाढली आहे. त्यामुळे दिवसा दमटपणा, कडक ऊन आणि रात्री उकाडा असा अनुभव सध्या ठाणेकर घेत आहेत. परिणामी ऐन पावसाळ्यात घामाच्या धारांनी ठाणेकर घामाघूम होत आहेत.
यंदा मे महिन्यापासूनच पावसाच्या सरी बरसू लागल्या. त्यामुळे यंदा पाऊस सरासरीपेक्षा जास्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. जूनमध्ये पावसाच्या सरी अपेक्षित बरसल्या. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यातच ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये पावसाने सरासरी एक हजार मिमीचा टप्पा ओलांटला. पण जुलैचा पहिला आठवडा सोडला तर त्यानंतर पावसाने अचानक दडी मारली आहे. दिवसातून एकदा तुरळक सरी बरसत आहेत. १८ जुलै रोजी तर पावसाचा एकही थेंब पडला नाही. वास्तविक आषाढ महिन्यात जोरदार पावसाच्या सरी बरसतात. त्यानंतर श्रावणात पावसाचा जोर कमी होतो; पण यंदा आषाढात हवा तसा पाऊस पडला नाही. उलट ऐन पावसाळ्यात उन्हाचे चटके बसू लागले आहेत.
ठाणे पालिका क्षेत्रात ६ जुलै रोजी ४४.४३ मिमी पाऊस पडला होता. त्याआधी ४ आणि ५ जुलैला ६१.८६ मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर पाऊस गायब झाला आहे. ठाणे पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार तापमानात वाढ झाली आहे. ठाण्याचे तापमान गेल्या सहा दिवसांपासून सरासरी ३० अंशाच्या पुढे आहे. १७ जुलै रोजी सर्वाधिक ३६.१६ अंश तापमानाची नोंद झाली. तर १५ जुलै रोजी ९३.३२ टक्के सर्वाधिक आर्द्रता म्हणजे दमटपणाची नोंद झाली आहे. दिवसा चटके देणारे ऊन आणि रात्रीचा उकाडा अशा हवामानामुळे ठाणेकर हैराण झाले आहेत.
२१ जुलैपासून पाऊस धरणार जोर
इराणकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्याच्या प्रभावामुळे पावसाचा जोर कमी झाला आहे. ब्रेक मान्सून स्थिती निर्माण झाल्याने ठाणे शहरासह जिल्ह्याचे तापमानही ३२ ते ३३ अंशापर्यंत पोहोचले आहे. पण आता हळूहळू मान्सून सक्रिय होण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे २१ व २२ जुलैपासून पावसाच्या सरी पुन्हा कोसळतील. त्यामुळे तापमानात घट होईल तसेच तापमानापासून दिलासा मिळेल, असा अंदाज हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी व्यक्त केला आहे.
ठाणे महापालिका हद्द
सहा दिवसांचा सरासरी पाऊस
१९ जुलै - ००.७८ मिमी
१८ जुलै - ००.०० मिमी
१७ जुलै - ०२.५३ मिमी
१६ जुलै - ११.६४ मिमी
१५ जुलै - ३८.८२ मिमी
१४ जुलै - ३०.९४ मिमी
तापमान
तारीख अधिकतम न्यूनतम
१८ जुलै - ३२.०७ २६.०९
१७ जुलै - ३६.१६ २६.१८
१६ जुलै - ३०.८९ २६.०७
१५ जुलै - ३०.८९ २७.५३
सरासरी आर्द्रता
१७ जुलै - ८३.७५
१६ जुलै - ८४.९५
१५ जुलै - ९३.३२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.