डोंबिवलीत अघोषित भारनियमन
डोंबिवलीत अघोषित भारनियमन
वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १९ : काही दिवसांपूर्वी महापारेषणच्या पडघा पाल सबस्टेशनवर तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे सहा ते सात तास कल्याण-डोंबिवली शहर अंधारात बुडाले होते. यानंतर डोंबिवली शहरात विजेचा वारंवार लपंडाव सुरू झाला आहे. या अघोषित भारनियमनामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. महापारेषण, महावितरणकडून ग्राहकांना यासंदर्भात कोणताही सविस्तर खुलासा करण्यात आला नसल्याने वीज ग्राहकांमध्ये नाराजी आहे.
आठ-दहा दिवसांपूर्वी महापारेषणच्या भिवंडी-पडघा येथील पडघा-पाल (मानपाडा, डोंबिवली) २२० केव्ही ईएचव्ही मनोरा मार्गाने (टॉवर लाइन) येणाऱ्या उच्च दाब वीज वाहिनीत काही तांत्रिक बिघाड झाले. त्यामुळे कल्याण, डोंबिवली शहर परिसराचा वीजपुरवठा पाच ते सहा तास खंडित झाला होता. मुसळधार पाऊस, वादळाची परिस्थिती नसताना वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती.
अत्युच्च दाब वीजवाहिनीवरील बिघाडानंतर पडघा-पाल वीज वाहिनीवरून कल्याण, डोंबिवली शहर परिसरांना वीजपुरवठा होतो. शहरांमध्ये गेल्या आठवड्यापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. एक ते दोन तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. बँका, खासगी आस्थापनांमधील व्यवहार ठप्प होत असल्याने ग्राहकांना त्याचा फटका बसत आहे. वीजपुरवठा खंडित झाला की इंटरनेट यंत्रणा बंद पडत आहे. या यंत्रणेवर अवलंबून असलेल्या व्यावसायिक, नोकरदारवर्ग, आस्थापनांना खंडित वीजपुरवठ्याचा मोठा फटका बसत आहे. पडघा येथून वीजपुरवठा खंडित आहे; मात्र नागरिकांना हे माहिती नसल्याने नागरिक स्थानिक महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारून भंडावून सोडत आहेत. महावितरणच्या संपर्क क्रमांकावर नागरिक वीजपुरठा खंडित झाला की सतत फोन करतात. त्यामुळे महावितरणचा संपर्क क्रमांक नागरिकांना एक एक तास व्यस्त येत असल्याचा अनुभव येत आहे.
विजेच्या या सततच्या लपंडावामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा विचार करून कल्याण ग्रामीणचे ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख राहुल भगत यांनी गुरुवारी (ता. १७) महावितरणच्या डोंबिवलीतील कार्यकारी अभियंत्यांची भेट घेतली. कल्याण, डोंबिवली शहरांचा वीजपुरवठा सुरळीत राहील यासाठी व्यवस्था करण्याची मागणी केली. हा पुरवठा सुरळीत झाला नाही तर जनआंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिली. वीजपुरवठा खंडित राहत असल्याने रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, व्यावसायिक, व्यापारी, खासगी आस्थापनांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे, असे त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले.
आंदोलनाचा इशारा
काही दिवसांपूर्वीच पडघ्यावरून डोंबिवलीला येणाऱ्या दोन मुख्य विद्युत वहिन्यांपैकी एका विद्युत वाहिनीवर बिघाड झाला होता. तेव्हापासून डोंबिवलीत अघोषित भारनियमन करण्यात आले आहे. याचा फटका रुग्णालय, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बसतो. आता १५ दिवस उलटले तरी महावितरण ही वाहिनी दुरुस्त करू शकले नाही. त्यामुळे भारनियमन करण्याची नामुष्की महावितरणवर आली आहे. स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणारे आणि या शहराला विकासाकडे नेणारे सत्ताधारी कुठे बसले असावे, असा प्रश्न पडतो. महावितरणने लवकरच ही दुरुस्ती केली नाही तर आंदोलन करावे लागेल, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.