पलावा पुलावर खड्डे

पलावा पुलावर खड्डे

Published on

पलावा पुलावर खड्डे
विरोधकांचे पुन्हा सत्ताधाऱ्यांवर ताशेरे
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १९ : कल्याण-शिळ रोडवरील नवीन पलावा उड्डाणपूल सुरू झाला नाही तोच त्यावर खड्डे पडले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यानंतर पुलाची नव्याने डागडुजी केल्यावर पुन्हा पुलावर खड्डे पडू लागले आहेत. यावरून विरोधकांनी पुन्हा एकदा सत्ताधारी शिवसेना शिंदे गटावर ताशेरे ओढण्यास सुरुवात केली आहे. मनसे नेते राजू पाटील यांनी ‘पलावा पुलावर गुणवत्तेचा खून’ असे म्हणत समाजमाध्यमांवर पोस्ट केली आहे. तर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी पुलाची शांती करून घेण्याचा उपरोधिक सल्ला दिला आहे. इतकेच नाही तर मित्रपक्ष भाजपमधील जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी आम्हाला बोलावले नाही म्हणून खड्डे पडले असतील, अशी टीका केली आहे. पलावा पुलावरून विरोधक सत्ताधारी शिंदे गटाला डिवचण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत.

कल्याण-शिळ रोडवरील पलावा पुलाचे शुक्लकाष्ठ संपताना दिसत नाही. ४ जुलैला शिंदे गटाचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी नवीन पलावा पुलाचे उद्घाटन केले. यानंतर लगेच पूल वाहतुकीसाठी बंद केला. पुलावर दोनच दिवसांत पावसाने खड्डे पडले आणि हा पूल चर्चेत आला. यानंतर पुलाची डागडुजी करण्यात आली. पावसाने उघडीप दिल्याने पूल सुरू होता; मात्र पावसाने हजेरी लावताच पुलावरील रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आणि पुन्हा एकदा पूल चर्चेत आला आहे. याबाबतचा एक फोटो आणि व्हिडिओ मनसे नेते राजू पाटील यांनी समाजमाध्यमांत पोस्ट केला आहे. ‘पलावा पुलावर गुणवत्तेचा खून’ असे म्हणत त्यांनी कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सत्ताधारी शिवसेनेवर टीका करीत पूल जैसे थे आहे असे म्हटले. तसेच मला वाटते की, या पुलाची शांती केली पाहिजे. कारण ज्या दिवसापासून पूल सुरू झाला त्या दिवसापासून पुलाची स्थिती काही ठीक दिसत नाही. हिंदुत्ववादी सरकार म्हणणाऱ्या लोकांनी लवकरच होमहवन त्या पुलावर करावे; जेणेकरून पूल सुरक्षित राहील. कारण आपण पाहिले तर पुलावर पुन्हा खड्डे पडले आहेत, असे ते म्हणाले.

मित्रपक्षाकडून टीका
सत्ताधारी पक्षातील मित्रपक्ष भाजपनेदेखील शिंदे गटावर टीका करण्याची संधी सोडली नाही. भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी आम्हाला बोलावले नाही म्हणून खड्डे पडले असावेत. भाजपशिवाय हा पूल पूर्ण होऊ शकत नाही म्हणून खड्डे पडले असतील, असे ते म्हणाले. दरम्यान, याबाबत शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांना विचारले असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com