ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची अट ६० वर्षेच हवी,
ज्येष्ठांची वयोमर्यादा किती?
६५ करण्याचे अशासकीय विधेयक; तज्ज्ञ म्हणतात, ६०च हवे!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ ः ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांसाठी वयाची अट वेगवेगळी आहे. त्यात समतोल साधला जावा, यासाठी ज्येष्ठांचे वयोमर्यादा ६५ वर्षेच असावी, असी मागणी करणारे अशासकीय विधेयक आमदार डॉ. राहुल पाटील यांनी प्रस्तावित केले आहे; परंतु राज्यात आणि केंद्राच्या सर्वच योजनांसाठी ज्येष्ठांचे वय हे ६० वर्षे असावे, असे मत तज्ज्ञांनी मांडले आहे.
डॉ. पाटील यांनी आपल्या अशासकीय विधेयकात ज्येष्ठांच्या वाढत्या संख्येचा मुद्दा उपस्थित केला आहे. केंद्र सरकारकडून ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्यमान वय वंदना योजना राबवली जाते. एसटी बसमध्ये ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना तिकिटात ५० टक्के सवलत, तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते. विविध योजनांसाठी वयाचा समन्वय साधला जावा, यासाठी ज्येष्ठांचे वय हे ६५ वर्षे असावे, अशा प्रस्ताव डॉ. पाटील यांनी मांडला आहे.
---
सरकारकडून खर्च करणे शक्य नाही
डॉ. पाटील यांनी मांडलेल्या विधेयकावरील वित्तीय ज्ञापनात, ज्येष्ठ नागरिकांना मानधनापोटी दरमहा सात हजार रुपये आर्थिक सहाय्य करणे, पाच लाख रुपयापर्यंत मोफत आरोग्य सेवा, महाराष्ट्र दर्शनासाठी १५ हजारपर्यंत अनुदान, जेवण आणि राहण्याची तरतूद करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना द्यावयाच्या सोयीसुविधांसाठी राज्याच्या एकत्रित निधीतून आवर्ती खर्च होण्याची शक्यता आहे. सद्यःस्थितीत या अधिनियमाच्या अधिनियमितीवरील खर्च नमूद करणे शक्य नसल्याचे विधेयकाच्या वित्तीय ज्ञापनात म्हटले आहे.
----
कोट
राज्यात ज्येष्ठांची संख्या सुमारे १.४७ कोटी आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढत जाणार असून त्यांच्या आरोग्य, सुरक्षा आणि जगण्याचे असंख्य प्रश्न निर्माण होतील. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांसाठी वयाचे निकष ६० वर्षे केल्यास सर्वांना त्याचा लाभ मिळेल.
- प्रकाश बोरगांवकर, सीईओ, आजी केअर सेवक फाऊंडेशन
-
ज्येष्ठ नागरिकांसंदर्भातील प्रस्तावित विधेयकात वयासंदर्भात त्रुटी आहेत. राज्यात ज्येष्ठांचे वय ६० वर्षे आहे. रेल्वेच्या सवलतीचा प्रवास केंद्राने कधीच बंद केला. पेन्शनसंदर्भातील काही मुद्दे आणि उणिवा त्यात दिसतात.
- विजय औंधे, माजी उपाध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक महासंघ
----
ज्येष्ठांची वाढणार संख्या
राज्यात २०११ मध्ये १.११ कोटी असलेली ज्येष्ठांची संख्या २०२५ मध्ये १.४७ कोटी, तर २०३५ मध्ये १.९८ कोटी होईल. एका अहवालानुसार २०३१ मध्ये मुंबईत २४ लाख ज्येष्ठ एकटे असतील. एकंदरीत वाढलेले आर्युमान व ज्येष्ठांची संख्या पाहता, राज्यात २०३५ मध्ये जवळपास ७०-७५ लाख ज्येष्ठ नागरिक एकटे असतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.