चौक कर्जत मार्गावर वाहतूक कोंडी
चौक-कर्जत मार्गावर वाहतूक कोंडी
खालापूर, ता. २० (बातमीदार) ः वीकएण्डला गटारी साजरी करण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडलेल्या पर्यटकांमुळे चौक-कर्जत मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. १५ मिनिटांच्या अंतरासाठी ९० मिनिटे लागत होती. धबधब्यावर असलेली बंदी आणि वीकएण्डला खंडाळा, लोणावळा घाटात होणारी वाहतूक कोंडी यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक खालापूर, कर्जतची निवड करतात. मागील काही वर्षांपासून कर्जत परिसरात फार्महाउसला मोठी पसंती मिळत आहे. त्यामुळे अनेक पर्यटक कर्जत, खालापूर परिसरात गर्दी करीत आहेत. शिवाय, अनेकजण माथेरानची वाट पकडतात. रविवारीदेखील प्रचंड संख्येने बाहेर पडलेले पर्यटक जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून चौक ते कर्जत मार्गावर आल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेऊन वाहतूक पोलिस चौक व कर्जत फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आले होते; परंतु वाहनांची नेहमीपेक्षा वाढलेली संख्या यामुळे वाहतूक सुरळीत करताना मोठ्या प्रमाणात पोलिसांची दमछाक झाली होती.
.................
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी घेतला भातलावणीचा आनंद
पोयनाड (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील कुर्डूस परिसरातील आनंदवाडी या दुर्गम भागातील शाळकरी विद्यार्थ्यांनी नुकतेच शेतामध्ये जाऊन प्रत्यक्ष भातलावणीचा आनंद घेतला. विद्यार्थांना पुस्तक आणि वर्ग याबाहेरील जगाचा आनंद घेता यावा, यासाठी भातलावणीचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. सर्वांचा अन्नदाता बळीराजा म्हणजेच शेतकऱ्याच्या कष्टाची जाणीव व्हावी, शेतीविषयक कामांची प्रत्यक्ष माहिती मिळावी. विद्यार्थ्यांच्या अंगी श्रम, प्रतिष्ठा आदी मूल्यांची रुजवणूक व्हावी, विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरणात ज्ञान मिळवता यावे आणि पर्यावरण व निसर्ग या गोष्टींची माहिती व्हावी, यासाठी कुर्डूसजवळील आनंदवाडी शाळेने हा उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रत्नप्रभा गोळे, शाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत पाटील, पालक व ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
............
गोवे येथील रामा गुजर यांचे निधन
रोहा (बातमीदार) ः रोहा तालुक्यातील गोवे येथील उत्तम मार्गदर्शक रामा होनाजी गुजर यांचे गुरुवारी (ता. १७) निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८२ वर्षे होते. त्यांनी परिसरातील तरुणांना मल्लखांब व महाभारतातील सारिपाटाचा खेळ आत्मसात करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे हे दोन्ही खेळ आजही तरुणांनी पुढे सुरू ठेवले आहेत. ते स्वाध्याय परिवाराचे सदस्य होते. त्यांना भजन-कीर्तनाची आवड होती. यामध्येही त्यांचा नित्यनेमाने सहभाग असे. त्यांनी आयुष्यभर शेतीव्यवसाय केला. तसेच, गाव कमिटीमध्ये त्यांनी निःस्वार्थपणे सेवा केली. त्यांना क्रिकेट खेळाची आवड होती. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
...........
पोयनाड नाक्यावरील हायमास्ट बंद, नागरिकांची गैरसोय
पोयनाड (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील पोयनाड ही जिल्ह्यातील महत्त्वाची बाजारपेठ आहे. पोयनाड नाक्यावरून पेण-अलिबाग हा राज्यमार्ग जात असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा असते; मात्र मागील एक वर्षापासून येथे बसविण्यात आलेला हायमास्ट बंद आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे अंधारातून येथून वाट काढावी लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पोयनाड नाक्याजवळ छोटे-मोठे खड्डे पडले आहेत. रात्रीच्या वेळेस येथील हायमास्ट बंद असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे, तसेच येथे चोरीची दाट शक्यता वर्तवली जात आहे. येथे असलेल्या हायमास्टमुळे परिसरात उजेड होता; मात्र मागील वर्षभरापासून हा हायमास्ट बंद आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. यासंदर्भात शेकाप अलिबाग तालुका चिटणीस मंडळ सदस्य प्रमोद राऊत यांनी पोयनाड ग्रामपंचायतीला निवेदन दिले असून लवकरात लवकर पोयनाड नाक्यावरील हायमास्ट सुरू करण्याची मागणी केली आहे.
...........
वाडगाव जि.प. शाळेत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
अलिबाग (वार्ताहर) ः रायगड फोटोग्राफर अँड व्हिडिओग्राफर्स असोसिएशनशी संलग्न असलेल्या अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन आणि अलिबाग-मुरूड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वाडगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व भारती डायग्नोस्टिकच्या वतीने रक्टगट तपासणी शिबिराचे आयोजन शुक्रवारी (ता. १८) करण्यात आले होते. वेश्वी ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका पवार, शाळा समिती अध्यक्षा प्रवीणा भगत, उपसरपंच जयेंद्र भगत यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. अलिबाग-मुरूड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. वैभव भगत, डॉ. अमेय केळकर, डॉ. ओंकार पाटील, डॉ. वैजेश पाटील, डॉ. समीर धाटावकर, डॉ. गणेश गवळी, डॉ. निशिकांत ठोंबरे, डॉ. भूषण शेळके, डॉ. संकेत मोरे यांनी विद्यार्थ्यांची कान, नाक, घसा, छाती, पोट, हृदयाचे ठोके, रक्त प्रमाण, दातांची तपासणी करून मोफत औषधे दिली. या वेळी भारती डायग्नोस्टिकचे राकेश थळे, रायगड फोटोग्राफर्स ॲड व्हिडिओग्राफर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष समीर मालोदे, खजिनदार जितेंद्र मेहता, शाळेचे मुख्याध्यापिका सुगंधा पाटील व विद्यार्थी उपस्थित होते. या शिबिरात एकूण ६३ विद्यार्थ्यांची आरोग्य व रक्टगट तपासणी करण्यात आली.