‘व्यसनमुक्त भारत’ची साद उल्हासनगरात घुमली

‘व्यसनमुक्त भारत’ची साद उल्हासनगरात घुमली

Published on

उल्हासनगर, ता. २० (वार्ताहर) : ‘एक पाऊल व्यसनमुक्तीसाठी’ या प्रेरणादायी संकल्पाने उल्हासनगरच्या एसएसटी महाविद्यालयात ‘नशा मुक्त भारत अभियान’ अंतर्गत झालेल्या विशेष उद्‍बोधन वर्गाला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध व्यसनमुक्ती कार्यकर्ते आणि अमली पदार्थविरोधी विभागाचे माजी क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांच्या प्रभावी संवादाने युवकांमध्ये व्यसनमुक्त जीवनशैलीबाबत नवचैतन्य जागृत झाले.
‘नशामुक्त भारत अभियान’अंतर्गत उल्हासनगरमधील एसएसटी महाविद्यालयात प्रेरणादायी व्यसनमुक्ती विशेष उद्‍बोधन सत्र घेण्यात आले. ‘एक पाऊल व्यसनमुक्तीसाठी-जाणीव, जागरूकता आणि जबाबदारी’ या घोषवाक्याने सत्राची सुरुवात झाली आणि त्याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सत्रात प्रा. प्रफुल केदारे यांनी वानखेडेंची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी समीर वानखेडेंनी आपल्या सेवाकाळातील अनुभव, समोर आलेले व्यसनाधीनतेचे भीषण परिणाम, तसेच तरुणांनी त्यातून दूर राहण्यासाठी कोणती भूमिका घ्यायला हवी याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना त्यांनी थेट, सडेतोड आणि उदाहरणांसहित उत्तरे दिली.

महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉ. जे. सी. पुरस्वानी यांनी महाविद्यालयाच्या उपक्रमांची माहिती देताना विद्यार्थ्यांना या अभियानाशी जोडण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यानंतर डॉ. गणेश राठोड (अध्यक्ष, एम्का) आणि वसुंधरा मोरे-केदारे (वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या, ठाणे मनोरुग्णालय) यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य जीवन विचारे, दीपक गवादे, संतोष करमाणी यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते. समारोपाला विद्यार्थ्यांनी ''मी व्यसनमुक्त राहीन आणि इतरांना प्रेरित करीन'', अशी शपथ घेतली.


व्यसन हे काही क्षणांचे समाधान देते; पण आयुष्यभराची गुलामी लादते. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद आणि त्यांची जागरूकता पाहून मी भारावून गेलो. शपथ घेणे सोपे आहे; पण ती पाळणे ही खरी जबाबदारी असते. व्यसनमुक्त भारत ही केवळ घोषणा नाही, तर प्रत्येक तरुणाने उचलले व्रत आहे.
- समीर वानखेडे


समीर वानखेडे यांच्या अनुभवांनी केवळ व्यसनमुक्तीचा नव्हे, तर आयुष्य जगण्याची नवी दिशा दिली. विद्यार्थ्यांनी संवाद साधून प्रश्न विचारले आणि व्यसनमुक्त राहण्याची शपथ घेतली. शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हे आजच्या कार्यक्रमाचे जिवंत उदाहरण ठरले आहे.
- प्रा. प्रफुल केदारे, एसएसटी महाविद्यालय


आमच्यासाठी आजचा दिवस आयुष्य बदलणारा ठरला. हे मार्गदर्शन व्यसनापासून दूरच नाही, तर जबाबदार नागरिक म्हणून घडण्याचे भान दिले. व्यसन म्हणजे फक्त सिगारेट, दारू नव्हे, तर सोशल मीडियाचीही अति गरज त्याच प्रकारचे व्यसन आहे, हे समजले. व्यसनातून बाहेर पडण्यासाठी आत्मविश्वास, कुटुंबाचा पाठिंबा आणि योग्य मार्गदर्शन हवे. आज घेतलेली शपथ आयुष्यभर लक्षात राहील.
- प्राची बोखारे, विद्यार्थिनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com