गणेश मूर्तीकारांना महागाईच्या झळा

गणेश मूर्तीकारांना महागाईच्या झळा

Published on

गणेश मूर्तिकारांना महागाईच्या झळा
डहाणूत गणेशोत्सवाची लगबग; यंदा किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ
महेंद्र पवार : सकाळ वृत्तसेवा
कासा, ता. २१ (बातमीदार) : गणेशोत्सव अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपल्याने डहाणू तालुक्यातील विविध गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये जोरदार तयारी सुरू झाली आहे. मूर्तिकारांच्या मूर्ती साकारण्यासाठी लगबग सुरू असून, बाप्पाच्या आगमनासाठी गणेशभक्त आतुरतेने वाट पाहात आहेत. दरम्यान, यंदा महागाईचा फटका या उत्सवावरही जाणवणार असून, मूर्तींच्या किमतीत १० ते १५ टक्के वाढ झाली आहे.
डहाणूमधील एस. राणा मूर्तिकार यांचा तीन पिढ्यांची परंपरा असलेला कारखाना आजही शाडू मातीच्या पारंपरिक मूर्तींसाठी प्रसिद्ध आहे. निसर्गस्नेही मूर्ती बनवण्याचा छंद आज व्यवसायात रूपांतरित झाला असला तरी मूळ तत्त्वांना सोडलेले नाही.
मूर्तिकार एस. राणा यांनी सांगितले, ‘‘आमच्याकडे शाडू मातीच्या मूर्ती, साधी पण मोहक, बारीक डोळे व नैसर्गिक रंगकामामुळे गेल्या ३०-४० वर्षांपासून अनेक भाविक दरवर्षी आमच्याकडूनच मूर्ती घेत आहेत. यंदा जवळपास ५०० ते ६०० मूर्ती तयार करीत आहोत.’’
-------------------------------
पीओपीऐवजी शाडू मूर्ती
पीओपीऐवजी शुद्ध शाडू माती, नैसर्गिक रंग, बारकाईने साकारलेले डोळे आणि साधेपणातले सौंदर्य या मूर्तींना वेगळेपण देतात. त्यामुळे डहाणू, कासा, पालघरसह नाशिक, ठाणे, वाडा, वापी आणि मुंबईपर्यंत येथील मूर्तींची मागणी आहे.
-------------------------------
साहित्याचे दर वाढले
यंदा शाडू मातीच्या पाठीमागे जाणाऱ्या पोत्यांचा दर २२५ रुपयांवरून २७५ रुपये झाला आहे. ५० किलोचा काथ्या ३,५०० रुपये, तर २० लिटर रंग ७,००० रुपयांपर्यंत गेला आहे. सोनेरी रंगाचा किलोचा दर २,००० रुपयांवर पोहोचला आहे. पारंपरिक कारागिरांची कमतरता आणि मजुरी वाढल्यानेही उत्पादन खर्च वाढला आहे.
---------------------------
छंदाचा वारसा
कारखान्याच्या सुरुवातीपासूनच आजोबांनी लावलेला या छंदाचा वारसा सध्या मुलांनी स्वीकारलेला आहे. मूर्तींच्या किमती १०० रुपयांपासून ६,००० रुपयांपर्यंत असून, ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन विविध आकार व रूपे साकारली जात आहेत.
----------------------------------------
MUM25E99084

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com