मनुष्यबळाअभावी अग्निशमन यंत्रणेवर ताण

मनुष्यबळाअभावी अग्निशमन यंत्रणेवर ताण

Published on

अग्निशमन यंत्रणेवर ताण

भिवंडी, ता. २१ (वार्ताहर) : आगीची घटना किंवा दुर्घटना घडल्यास सर्वात प्रथम अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी पोहोचते. भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागातील गोदामांना आग लागल्यास वित्त व जीवितहानी टाळण्यासाठी भिवंडी पालिकेच्या अग्निशमन दलातील जवान नेहमीच एक पाऊल पुढे असतात. भिवंडी पालिकेच्या अग्निशमन दलाकडे यंत्र व वाहनसामग्री पुरेशी आहे; मात्र नोकरभरती रखडल्याने मनुष्यबळाअभावी अग्निशमन दलावर अतिरिक्त ताण येत आहे.

पालिकेच्या अग्निशमन दलातील मुख्य अग्निशामक अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी ही दोन्ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रभारी भार अधिकाऱ्यांवर सोपवला आहे. तर उपकेंद्र अधिकाऱ्यांच्या मंजूर १२ पदांपैकी केवळ एक पद भरले आहे. तर ११ पदे रिक्त आहेत. चालकाच्या या मंजूर ३१ पदांपैकी केवळ एक पद भरले आहे. तर, ३० पदे रिक्त आहेत. मुख्य अग्निशमन जवानांच्या मंजूर १५ पदांपैकी एकच पद भरले आहे. १४ पदे रिक्त आहेत. अग्निशमन जवानांच्या मंजूर १०० पदांपैकी केवळ ४६ पदे भरली आहेत. तर, ५४ पदे रिक्त आहेत. त्यामुळे एकूण १६० पदांपैकी केवळ ४९ पदे भरण्यात आली आहेत. त्यामुळे अग्निशमन दलातील जवानांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत आहे.

भिवंडीची लोकसंख्या १४ लाखांच्या घरात आहे. त्यातील सुमारे दहा लाख लोकसंख्या शहरी भागात आहे. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागासाठी स्वतंत्र यंत्रणेची गरज आहे; मात्र भिवंडी शहर, ग्रामीणसह आसपासच्या ग्रामीण भागात आगींच्या घटना घडल्यास भिवंडी अग्निशमन यंत्रणेवर ताण येत आहे. मागील कित्येक वर्षांत भिवंडी अग्निशमन दलात नोकर भरती झालेली नाही. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळाच्या मदतीने ही तारेवरची कसरत अग्निशमन दलाला करावी लागत आहे.

अग्निशमन दलाकडे वॉटर टॉवर एक आहे. अग्निशमन इंजिन आठ आहेत. बहुउद्देशीय फायर इंजिन पाच आहेत. वॉटर ब्राउझरची संख्या पाच आहे. मिनी फायर इंजिन सात आहेत.
फायर अँड रेस्क्यू व्हॅनची संख्या दोन आहे. जीप एक आहे. तर दुचाकी तीन आहेत. विशेष म्हणजे, आजही या फायर बाइक एक वर्षांपासून वापराविना पडून आहेत. २०२२ ते २०२४ या मागील तीन वर्षांचा आलेख पाहिल्यास शहरात ४४० तर ग्रामीण भागात याच काळात ३०५ आगीच्या घटना घडल्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे एखादी मोठी घटना घडल्यास जीवीत व वित्तहानी होण्याची भीती व्यक्त होत आहे.

कोंडीचा अडथळा
भिवंडी ग्रामीण भागात सततची वाहतूक कोंडी असते. तसेच, गोदाम भागातील अरुंद, नादुरुस्त रस्ते, त्याठिकाणी पाण्याची कमतरता यामुळे या भागातील आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाला मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. अनेक वेळा गोदामातील केमिकलमुळे दोन दोन दिवस आग सुरू असते. अशा वेळी भिवंडीसह ठाणे, कल्याण, उल्हासनगर येथील अग्निशमन यंत्रणेला पाचारण करावे लागते. त्यात वेळ अधिक जात असल्याने वित्तहानी अधिक होते.

५० हजारहून अधिक गोदामे
शहरात ५० हजारांहून अधिक गोदामे आहेत. यामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा माल साठवला जातो. या ग्रामीण भागाच्या विकासाची जबाबदारी सरकारने २००९ पासून एमएमआरडीए प्राधिकरणाकडे सोपविली आहे; परंतु या १५ वर्षांच्या काळात या भागात विकास शुल्क म्हणून कोट्यवधी रुपये जमा करणाऱ्या एमएमआरडीए प्रशासनाने या भागात अग्निशमन केंद्र उभारण्यात कधीच पुढाकार घेतला नाही. २०२१मध्ये तत्कालीन खासदार कपिल पाटील यांनी याबाबत केलेल्या पत्रव्यवहारास उत्तर देताना एमएमआरडीएकडून ११ मे २०२१ रोजी या भागात स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभारणीसाठी प्राधिकरणाच्या ७ जुलै २०२० रोजीच्या बैठकीत मंजुरी दिल्याचे सांगितले होते.


भिवंडी अग्निशमन दलातील पदे
पदाचे नाव मंजूर भरलेली रिक्त
मुख्य अग्निशमन अधिकारी १ ० १
उपमुख्य अग्निशमन अधिकारी १ ० १
उपकेंद्र अधिकारी १२ १ ११
चालक ३१ १ ३०
वरिष्ठ अग्निशमन जवान १५ १ १४
अग्निशमन जवान १०० ४६ ५४
एकूण १६० ४९ १११

भिवंडी अग्निशमन दलाची वाहने
वाहनप्रकार संख्या
वॉटर टॉवर १
अग्निशमन इंजिन ८
बहुउद्देशीय फायर इंजिन ५
वॉटर ब्राउझर ५
मिनी फायर इंजिन ७
फायर अँड रेस्क्यू व्हॅन (देवदूत/गुरखा) २
जीप १
दुचाकी ३
एकूण ३२

आग व बचावकार्यांचा आलेख
कार्यप्रकार शहर (भिवंडी) ग्रामीण भाग
आगीच्या घटना ४४० ३०५
रेस्क्यू ऑपरेशन ४७४ १०७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com