विकासकामांचा पाढा

विकासकामांचा पाढा

Published on

विकासकामांचा पाढा
रिंग रूट जाळे, उड्डाणपूल : कोंडी फोडण्याचे आश्वासन

वसई, ता. २१ (बातमीदार) : लवकरच महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्याची रंगीत तालीम सुरू झाली आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षांकडून विकासकामांचा पाढा वाचला जात आहे. त्यात यात शहरात रिंग रोड व उड्डाणपुलाचे जाळे निर्माण करण्याचा मुद्दादेखील समोर येऊ लागला आहे. शहरातील कोंडी फोडण्यासाठी हे उड्डाणपूल महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे ही आश्वासने कधी सत्यात उतरणार, असा सवाल नागरिक करीत आहेत.

वसई-विरार शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असतो. महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून यासाठी कोट्यवधीचा खर्च केला जात आहे; मात्र तरीही वाहतुकीसाठी मोकळा मार्ग मिळत नाही. त्यातच पर्यायी मार्गाची उपलब्धता नाही. वसई, विरार नालासोपारा येथे उड्डाणपूल असले तरी ते वाहनांची वर्दळ पाहता ते तोकडे पडत आहेत. त्यामुळे शहरात उभारण्यात येणारे चार रेल्वे उड्डाणपूल, तसेच प्रवास कमी वेळेत व्हावा, यासाठी रिंग रूट सेवेबरोबरच महामार्ग व शहराला जोडणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण इत्यादी प्रकल्पावर लक्ष देण्याचे आश्वासन देण्यात येत आहे; मात्र विरार नारंगी उड्डाणपुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.

नव्याने होणाऱ्या उड्डाणपुलासाठी निधीची उपलब्धता व अन्य सोपस्कार पार पाडल्यावर या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आणखी काही वर्षे पर्यायी मार्गाची प्रतीक्षा नागरिकांना करावी लागणार आहे. त्याचबरोबर वसई विरार शहर महापालिका काही वर्षांपूर्वी शहरात रिंग रूट सुरू करणार होती; मात्र त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता राज्य सरकार रिंग रूट मार्गासाठी प्रयत्न करणार आहे. परंतु यासाठी नवीन मार्ग, सर्व्हे तसेच त्यासाठी लागणारा निधी, तसेच तो कमी वेळेत पोहोचण्यासाठी सुलभ होईल का, याच्या चाचपणीची कामे पूर्ण झाल्यावर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल. त्यामुळे शहरात रिंग रूटचे जाळे पसरवण्यासाठी अवधी लागणार आहे.

नालासोपारा मतदारसंघाचे आमदार राजन नाईक यांनी रिंग रूटसाठी सरकार दरबारी आग्रही भूमिका घेतली आहे. तसेच पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी साकडे घातले आहे. त्यामुळे भविष्यात नवे उड्डाणपूल, रिंग रूट, वाहतूक व्यवस्थेमुळे कोंडी खरंच फुटेल का, असा सवाल वसईकर करत आहेत. सध्या वसई विरार शहर महापालिकेवर प्रशासकीय राजवट अस्तित्वात आहे. निवडणूक होईपर्यंत प्रशासक राहणार आहेत. राजकीय पक्ष येणाऱ्या निवडणुका समोर ठेवून वसई विरार शहरातील समस्या सोडविण्यासाठी आश्वासनांचा भडिमार करत आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या आश्वासनांवर मतदारराजा किती विश्वास ठेवतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

वसई विरार शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे, जर पर्यायी रिंग रूट व उड्डाणपूल मार्ग तयार झाले, तर वाहतूक सुरळीत होईल. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी हे प्रकल्प तत्काळ पूर्ण करण्याचे महापालिका प्रशासनाला निर्देश दिले आहेत.
राजन नाईक, आमदार, नालासोपारा
--------------
प्रत्येक निवडणुकीत अच्छे दिन, नोकरी मिळणार, पेट्रोल, डिझेल दर कमी होणार, अशी अनेक आश्वासने दिली जातात; मात्र त्याची पूर्तता केली जात नाही. वसई विरार शहरात रिंग रूट, उड्डाणपुलासह यासह अन्य आश्वासने दिली जात आहेत; मात्र महापालिकेच्या निवडणुका समोर ठेवून विकासाचे मुद्दे हाती घेतले जात आहेत. वसई-विरार शहराची वाहतूक कोंडी सोडविण्यात यश आले नाही; मात्र आताही केवळ विकास होणार इतकेच आश्वासन दिले जात आहे.
ओनील आल्मेडा, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
---------------
वसई-विरार शहराच्या विकासाचे मुद्दे हे विधानसभेत मांडण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, एमएमआरडी विभाग आहे. त्यामुळे त्याबाबत त्वरित अंमलबजावणी करण्यात आली. रिंग रूट, उड्डाणपुलासह अनेक कामे अनेक वर्षे रखडली आहेत. ती पूर्णत्वास नेण्यासाठी सरकार काम करत आहे. सरकार लोकाभिमुख कामांना प्राधान्य देत आहे. गोराई ते विरार कोस्टल रोडचे कामदेखील होणार आहे.
नीलेश तेंडोलकर, जिल्हाध्यक्ष, शिवसेना
-------------
वसई विरार शहरात विकास साधता यावा, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. ज्या समस्या आहेत, त्या निकाली काढून नागरिकांना सोयीसुविधा देण्यासाठी मुख्यमंत्री निर्णय घेत आहोत. त्याचाच एक भाग म्हणजे नवे उड्डाणपूल, नवे मार्ग हा आहे.
गणेश नाईक, पालकमंत्री
-------------
गेली १४ वर्षे अनेक विकासाचे मुद्दे मांडून सत्ता प्रस्थापित केली, मात्र विकास झाला नाही. वसई विरार शहरात परिस्थिती अशी आहे की पावसाळ्यात रस्ता कुठे आहे. हे शोधावे लागत आहे. त्यामुळे केवळ भूलथापा आहेत; निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेला आश्वासने दिली जात आहेत.
किरण चेंदवणकर, जिल्हा संघटक महिला आघाडी, उबाठा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com