शहरात जातनिहाय वर्गीकरण करा

शहरात जातनिहाय वर्गीकरण करा

Published on

शहरात जातनिहाय वर्गीकरण करा
वसई, ता. २१ (बातमीदार) : वसई-विरार शहरात विविध जाती-धर्माची माणसे गुण्यागोविंदाने राहत आहेत. प्रत्येक समाजाला भवन हवे आहे, जेणेकरून एकाच ठिकाणी सुविधा मिळेल, यासाठी जातनिहाय वर्गीकरण करा. माहिती एकत्रित करा, प्रत्येक समाजासाठी आपण वसईच्या गोगटे सॉल्ट भागात समाजभवन उभारण्यासाठी प्रयत्न करूया. यासाठी मंत्रालयात बैठक घेऊ, अशी सूचना वनमंत्री गणेश नाईक यांनी माजी महापौर नारायण मानकर यांना केली.

आगरी समाज विकास मंडळ, वसई तालुका, वसई प्रगती को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड अर्नाळा आणि आगरी समाज विकास शिक्षण संस्था वसई यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी व गुणीजन सत्कार समारंभ व आगरी समाज विकास निधीवाटप कार्यक्रमाचे आयोजन उमेळमान आगरी समाज विकास शिक्षण संस्थेत करण्यात आले होते. या वेळी वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, आमदार ज्ञानेश्वर पाटील, माजी महापौर तथा आगरी समाज विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नारायण मानकर, आगरी समाज विकास मंडळाचे वसई तालुकाध्यक्ष भरत भोईर व वसई प्रगतीचे अध्यक्ष अशोक पाटील, माजी अध्यक्ष मदन किणी, माजी नगरसेवक कल्पेश मानकर, सचिन घरत, वसई प्रगतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हितेश पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

गणेश नाईक पुढे म्हणाले, की वाढवण येथे होणारे जागतिक दर्जाचे बंदर, माहीम केळवे येथील प्रकल्प पालघर जिल्ह्याच्या विकासाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारा आहे. त्यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळेल, व्यवसायाची दालने खुली होतील. आगरी भवनसाठी २५ लाख रुपये देण्यात येतील. आगरी समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून प्रगती करू लागला आहे. शिवसेनेत असताना मंत्री झालो, राष्ट्रवादीत असतानादेखील व आता भाजपमध्ये मंत्री आहे, हे केवळ माणसांचे प्रेम आहे. या वेळी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसई प्रगतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हितेश पाटील यांनी केले.

आगरी समाजात हुंडा पद्धत नाही
आगरी समाज शिक्षण, जलतरण, गिर्यारोहक व अनेक क्षेत्रामध्ये पुढे जात आहे. एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षेत उतरत नावलौकिक करीत आहे. मुलीदेखील मागे नाहीत. उच्च पदावर जात आहेत. शिक्षण विकासातून आपला ठसा उमटवत आहेत, तर संस्कृती टिकवून ठेवली आहे, असे सांगत गणेश नाईक यांच्या कार्याची आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी स्तुती केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com