स्वयंपुनर्विकासाचे शिवधनुष्य पेलवणार
स्वयंपुनर्विकासाचे शिवधनुष्य पेलवणार
वसईत प्रवीण दरेकरांचा विश्वास
नालासोपारा, ता. २० (बातमीदार) : ‘इमारतीचा स्वयंपुनर्विकास हे जनआंदोलन आहे. ठाणे, पनवेल, घणसोली आणि आता वसईत या शिबिराला झालेली गर्दी हे त्याचे उदाहरण आहे. शिवधनुष्य पेलणे फार अवघड असते; पण स्वयंपुनर्विकासाचे हे शिवधनुष्य आम्ही उचलले आहे आणि ते पेलवणारही आहोत,’ अशी ग्वाही भाजप गटनेते आणि मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी नुकतीच वसईत दिली.
वसई येथे भाजप आमदार स्नेहा दुबे-पंडित यांच्या पुढाकाराने स्वयंपुनर्विकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी प्रवीण दरेकर बोलत होते. याप्रसंगी नालासोपारा येथील आमदार राजन नाईक, भाजप वसई-विरार जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील, प्रांताधिकारी शेखर घाडगे, सहकार खात्याचे उपनिबंधक शिरीष कुलकर्णी, अमन शिंदे, ठाणे हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे वरिष्ठ अधिकारी शरद काशिवले, नीलेश पेंडुलकर, राजाराम मुळीक, ईश्वर घोले, अभ्यासक हर्षद मोरे आदी उपस्थित होते.
दरेकर म्हणाले, ‘स्वयंपुनर्विकासात गुणवत्तेला स्थान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वच क्षेत्रांत आत्मनिर्भर होण्यास सांगितले आहे. गृहनिर्माण क्षेत्रातही आत्मनिर्भर व्हायचे आहे.’
मुंबईप्रमाणे स्वयंपुनर्विकास वसईत झाला पाहिजे, या भावनेने स्नेहा दुबे-पंडित काम करीत आहेत. स्वयंपुनर्विकास म्हणजे विकसकाशिवाय आपली सोसायटी विकसित करायची. मी मुंबई जिल्हा बँकेचा अध्यक्ष आहे. या बँकेच्या सदस्य असलेल्या गृहनिर्माण संस्थांना पैसे पुरवले आणि सरकारने पाठबळ दिले तर विकसकाची गरजच नाही. त्यासाठी मुंबई बँकेने कर्ज धोरण आणले. सरकारचे पाठबळ मिळवण्यासाठी गोरेगावला गृहनिर्माण संस्थांची परिषद घेतली. या परिषदेत १८ मागण्या शासनाकडे केल्या. त्यापैकी १६ शासन निर्णय फडणवीस यांनी तत्काळ काढले. त्यानंतर स्वयंपुनर्विकासाला हळूहळू गती मिळाली. मुंबई बँकेच्या पुढाकाराने २० इमारती उभ्या राहिल्या आहेत. पाच इमारती वसईत उभ्या करा, तेव्हा लोकांचा या योजनेवर विश्वास बसेल. या पाच इमारतींचे भूमिपूजन महिनाभरात करा, असे दरेकर म्हणाले.
कांदिवली येथील श्वेतांबरा इमारतीच्या चावी वाटप कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वयंपुनर्विकासाला राज्यातील सर्व शहरांत राबवण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली दरेकर समिती घोषित केली. त्यानंतर महाराष्ट्रभर दौरा करून त्याचा अहवाल सरकारला सादर केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी झोपडपट्टीतील नागरिकांसाठी अफजलपूरकर समितीच्या माध्यमातून एसआरएची निर्मिती केली होती. त्याचप्रमाणे या समितीद्वारे राज्यात स्वयंपुनर्विकास ताकदीने होईल, असेही ते म्हणाले.
----
वित्तीय मंडळाला तत्त्वत: मंजुरी
मुंबई बँकेकडे १,६०० प्रस्ताव आले आहेत. मुख्यमंत्र्यांना विनंती केल्यानंतर राज्य सहकारी बँकेकडून दीड हजार कोटी, एनसीडीसीकडून एक हजार कोटी या योजनेसाठी मिळणार आहेत. त्याचबरोबर सेल्फ डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन करण्याची विनंतीही सरकारला केली आहे. त्याला तत्त्वत: मान्यताही मिळाली आहे.
-----
दुबे-पंडितांवर जबाबदारी
दरेकर अभ्यास गटाच्या पालघर जिल्ह्याची जबाबदारी आमदार स्नेहा दुबे-पंडित यांच्याकडे सोपवण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार ही घोषणा करीत आहे, असे दरेकर यांनी सांगितले. पालिकेशी समन्वय, सोसायट्यांना मार्गदर्शन, जिल्हा बँकेकडून पतपुरवठा आणि इतर दुबेंच्या नेतृत्वाखाली करण्यात येईल, असे ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.