आरोपीनी गुन्हा केल्यावर विश्वास ठेवणे कठीण

आरोपीनी गुन्हा केल्यावर विश्वास ठेवणे कठीण

Published on

२००६ बॉम्बस्फोट प्रकरण
---
खटला सिद्ध करण्यास सरकार अपयशी
उच्च न्यायालायाची निकालपत्रातून टिप्पणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : मुंबईत २००६मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींविरोधातील दाखल खटला सिद्ध करण्यास राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, घटनास्थळ, आरोपींकडून जप्त केलेले साहित्य तसेच कबुलीजबाब या तीन घटकांच्या आधारे हा खटला चालवण्यात आला; मात्र या तिन्ही पातळ्यांवर तपास यंत्रणा आरोपींविरुद्धचा गुन्हा सिद्ध करू शकल्या नाहीत. त्यामुळे आरोपींनी गुन्हा केल्यावर विश्वास ठेवणेच कठीण असल्याची टिप्पणी उच्च न्यायालयाच्या विशेष पीठाने सोमवारी (ता. २१) निकालपत्रात केली.
बॉम्बस्फोटासारख्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्ह्यातील प्रत्येक गुन्हेगाराला शिक्षा करणे महत्त्वाचे आहे; मात्र याप्रकरणी खटल्यातील खरे गुन्हेगार शोधल्याचा देखावा निर्माण करून दिशाभूल केल्याची टीकाही न्यायालयाने केली. या फसव्या देखाव्यामुळे जनतेचा व्यवस्थेवरचा विश्वास कमी होतो. यामुळे समाज आश्वस्त झाला तरी प्रत्यक्षात खरा धोका कायम राहतो आणि या खटल्यातही हेच झाल्याचेही न्या. अनिल किलोर आणि न्या. श्याम चांडक यांच्या विशेष खंडपीठाने आपल्या ६७१ पानी निकालपत्रात अधोरेखित केले. खटल्यातील सर्व आरोपी हे बंदी घातलेल्या स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या संघटनेचे सदस्य होते आणि त्यांनी लष्कर-ए-तोएबा (एलईटी) या दहशतवादी गटाच्या पाकिस्तानी सदस्यांसोबत हा कट रचल्याचा दावा तपास राज्य दहशतवाद विरोधी पथकाने केला होता; परंतु न्यायालयाने त्यांचा दावा फेटाळून लावून सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले.
----
कबुलीजबाबांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह
१. सर्व आरोपींवर गुन्ह्याचा कबुलीजबाब देण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यासाठी त्यांचा छळ करण्यात आला. बहुतेक प्रकरणांमध्ये पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने कबुलीजबाब नोंदवला जातो, हे सर्वज्ञात आहे. गुन्ह्यात वापरलेल्या बॉम्बचा प्रकार रेकॉर्डवर आणण्यातही सरकारी वकिलांना अपयश आले.
२. कट रचण्याचे नियोजन, बॉम्ब कोणत्या कंटेनरमध्ये पॅक केले होते, त्यांचा कसा स्फोट झाला, बॉम्बस्फोट करण्यासाठी कोणते उपकरण वापरले, याबाबत कबुलीजबाबात अस्पष्टता आहे.
३. आरोपींची ओळख पटवणाऱ्या साक्षीदारांमध्ये आरोपींना चर्चगेट रेल्वेस्थानकाच्या दिशेने नेणारे टॅक्सीचालक, आरोपींना बॉम्ब ठेवताना, ते जमा करताना आणि बॉम्बस्फोट घडवण्याच्या कटाची बैठक घेताना पाहणाऱ्यांचा समावेश होता. परंतु एवढ्या वर्षांनी साक्षीदारांनी आरोपींचे चेहरे लक्षात ठेवणे हे अविश्वसनीय असल्याचे निरीक्षणही विशेष खंडपीठाने नोंदवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com