थोडक्यात बातम्या रायगड
उसरखुर्दच्या अभिनव ज्ञान मंदिरमध्ये स्नेहमेळावा
माणगाव (बातमीदार) ः छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित अभिनव ज्ञानमंदिर, उसरखुर्द विद्यालयात रविवारी (ता. २०) इयत्ता दहावी बॅचच्या २०११–१२ मधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा अत्यंत उत्साहात पार पडला. या मेळाव्यासाठी मुंबई, वाशी, बदलापूर इत्यादी ठिकाणांवरून माजी विद्यार्थी आले होते. या विद्यार्थ्यांना अध्यापन करणारे शिक्षक अण्णासाहेब चिंधे, भरत काळे, अजित शेडगे, परमेश्वर खेडकर, प्रशालेचे मुख्याध्यापक नागनाथ सुर्वे, सहाय्यक शिक्षक दीपक गुजर, विनोद लाड, सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांचा माजी विद्यार्थ्यांनी शाल व भेटवस्तू देऊन सत्कार केला. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये शाळेने वेळेपलीकडे जाऊन जादा तास घेऊन आम्हाला शिकवले. आमच्यावर संस्कार केले. त्यामुळे आज आम्ही विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी झालो आहोत. शाळेत आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. शाळेने आम्हाला उंच भरारी घेण्यासाठी बळ दिले. आम्ही सदैव सर्व शिक्षकांचे ऋणी राहू. सर्व आजी विद्यार्थ्यांनी अभ्यास करून मोठे व्हा, या राष्ट्राचे आदर्श नागरिक बना, अशी भावना माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. या वेळी सर्व शिक्षकांनी मनोगत व्यक्त करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
..........
मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर
कर्जत (बातमीदार) ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (ता. २२) दहिवली येथील माजी आमदार सुरेश लाड यांच्या कार्यालयात सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान रक्तदान शिबिर पार पडले. शिबिरात सुमारे ५० रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये भाजप कर्जत शहर मंडळाचे अध्यक्ष राजेश लाड यांचा विशेष पुढाकार होता. या कार्यक्रमात महिला पदाधिकाऱ्यांनीही उत्साहाने सहभाग घेतला. शर्वरी कांबळे, स्नेहा गोगटे, सरस्वती चौधरी, सुषमा ढाकणे, राधा बहुतुले, विशाखा जिनगरे, गायत्री परांजपे यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.
................
आदिवासी बांधवांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी
जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना
अलिबाग, ता. २२ (वार्ताहर) ः आदिवासी समाजातील नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनेक नावीन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सोमवारी (ता. २१) अलिबाग सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात आयोजित आदिवासी विभागाच्या विविध योजनांच्या आढावा बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
या वेळी जिल्हाधिकारी जावळे म्हणाले, की जिल्ह्यातील आदिवासी समाजातील नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके आढावा घेणार आहेत. याकरिता प्रत्येक विभागाने आपली कामे पूर्ण करावीत. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान, धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान, वनहक्क दावे व इतर योजना याबाबत काही प्रलंबित कामे असतील तर ती कामे पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी उपस्थित संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा शल्यचिकित्स पाटील, प्रकल्प संचालक, आदिवासी विभाग पेण आत्माराम धाबे, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक विजय कुलकर्णी यांच्यासह इतर शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
...........
अलिबागमध्ये रेड रन मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात
आंतरराष्ट्रीय युवादिनानिमित्त जिल्हा प्रशासनाचा पुढाकार
अलिबाग, ता. २२ (वार्ताहर) ः आंतरराष्ट्रीय युवादिनानिमित्त अलिबाग येथे रेड रन मॅरेथॉन स्पर्धेचे भव्य आयोजन सोमवारी (ता. २१) करण्यात आले. ही स्पर्धा जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि लायन्स क्लब, श्रीबाग यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.
ही स्पर्धा अलिबाग समुद्रकिनाऱ्यापासून सुरू होऊन काँग्रेस भवनमार्गे हिराकोट तलाव फेरी करून पुन्हा समुद्रकिनाऱ्यावर पार पडली. स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम पारितोषिक स्वागत समीर पाटील - पीएनपी कॉलेज वेश्वी, द्वितीय अमर भागोजी धुमाने - केईएस डॉ. सी. डी. देशमुख कॉलेज रोहा, तृतीय अशोक बाळाराम वारगुडे - भाऊसाहेब नेने कॉलेज पेण, तर मुलींमध्ये प्रथम नेहा हेमंत म्हात्रे - जेएसएम कॉलेज, द्वितीय अदिती बबन मेंगाळ - भाऊसाहेब नेने कॉलेज पेण, तृतीय प्रणाली शशिकांत तळेगावकर - पीएनपी कॉलेज वेश्वी यांनी पटकावला. विजेत्यांना अनुक्रमे दोन, दीड आणि एक हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, मेडल आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. भूमी म्हात्रे आणि पर्णवी मयेकर यांनी लहान वय असूनही स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल त्यांना ॲड. निहा राऊत यांच्यातर्फे उत्तेजनार्थ विशेष बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने यांनी केले. या वेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण शिंदे, अधिष्ठाता प्रतिनिधी डॉ. अनंत बिडकर, डॉ. रवि वरट, डॉ. बंडेवाड, डॉ. प्रवीण कंदाडे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने, जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे, संस्थापक ॲड. निहा अनिस राऊत, लायन्स क्लब पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
...........
राष्ट्रवादी सेवा दलाच्या जिल्हाध्यक्षपदी गंगाधर पाटील
पेण (वार्ताहर) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली पेण तालुक्यातील बोर्झे गावचे गंगाधर पाटील यांची पक्षाच्या सेवा दलाच्या जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. या निवडीमुळे सेवा दलाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसंदर्भात येथील युवक, युवतींना मार्गदर्शन करणे यासह पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या जबाबदारीला खऱ्या पद्धतीने न्याय देणे आवश्यक असल्याचे सांगून माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाधर पाटील यांनी काम करावे, असे या वेळी खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले. या नियुक्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी गंगाधर पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
.................
गोविंद कासार यांची भाजप जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती
माणगाव (बातमीदार) ः भाजपचे कार्यकर्ते कोस्ते खुर्द ग्रामपंचायतीचे माजी सदस्य गोविंद परशुराम कासार यांची भाजप जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तालुक्यातील निजामपूर विभागातील हिंदुत्ववादी संघटना आणि भारतीय जनता पार्टी संलग्न संघटना तसेच माणगाव तालुका समन्वय समिती सदस्य, भारतीय जनता पार्टी निजामपूर विभाग अध्यक्ष ते माणगाव तालुका भाजप अध्यक्ष म्हणून कासार यांनी काम केले आहे. भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष खासदार धैर्यशील पाटील, विधानपरिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर, जिल्हा भाजप निवडणूक प्रमुख सतीश धारप, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रवि पाटील, आमदार महेश बालदी यांच्या सर्वानुमते गोविंद कासार यांची भाजप रायगड जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. तसे नियुक्तीपत्रदेखील त्यांना देण्यात आले आहे. पक्षाने सोपवलेली नवीन जबाबदारी इमानेइतबारे पार पाडू, असे आश्वासन गोविंद कासार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.
.............
बँक ऑफ बडोदा बनली ‘नि:क्षय मित्र’
२० क्षयरुग्णांना घेतले दत्तक
अलिबाग, ता. २२ (वार्ताहर) ः प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात बँक ऑफ बडोदाने २० क्षयरुग्णांना दत्तक घेतले आहे. या रुग्णांना नियमित पोषण आहार पुरवून त्यांच्या आरोग्य सुधारणेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची जबाबदारी बँकेने स्वीकारली आहे. बँक ऑफ बडोदाच्या स्थापनेच्या दिवशी अलिबाग, रेवदंडा व चणेरा शाखांच्या संयुक्त विद्यमाने दत्तक घेतलेल्या क्षयरुग्णांना पोषण आहाराचे वितरण करण्यात आले.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याआधी सर्व बँका, स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट क्षेत्र व अधिकारी वर्गांना ‘नि:क्षय मित्र’ होण्याचे आवाहन केले होते. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत बँक ऑफ बडोदा ही ‘नि:क्षय मित्र’ बनली आहे. दरवर्षी रायगड जिल्ह्यात सरासरी चार हजार ५०० क्षयरुग्ण आढळतात. त्यांच्यावर प्रभावी उपचारासोबत पोषण आहाराचा पुरवठा झाल्यास उपचार अधिक यशस्वी होतील, हे लक्षात घेऊन जिल्हा क्षयरोग केंद्रामार्फत ‘नि:क्षय मित्र’ उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाच्या वितरण सोहळ्याला बँक ऑफ बडोदा अलिबाग शाखेचे व्यवस्थापक चैतन्य मुड, चणेरा शाखेचे व्यवस्थापक शशिकांत चौगुले, रेवदंडा शाखेचे व्यवस्थापक श्रीकृष्ण खंदारे, तसेच जिल्हा क्षयरोग केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ‘नि:क्षय मित्र’ उपक्रमातून दानशूर संस्था, कंपन्या व व्यक्तींनी पुढाकार घेतल्यास क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने समाज एक पाऊल पुढे टाकू शकतो, असे मत या वेळी व्यक्त करण्यात आले. जिल्ह्यातील इतर संस्था, बँका व नागरिकांनीही पुढे येऊन या उपक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्षयरोग केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
............
आमदारांच्या आढावा बैठकीत वीज समस्यांचा पाढा
पेण, ता. २२ (वार्ताहर) : पेण शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या वीज समस्या सोडविण्यासाठी नुकतेच प्रांताधिकारी कार्यालयात आमदारांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नागरिकांनी विजेबाबत अनेक समस्या मांडल्या.
एकीकडे पेण शहराच्या विकासात भर पडत असताना लोकसंख्यादेखील लक्षणीय वाढत आहे. मात्र त्याचबरेबर अनेक नागरी समस्यांना पेणवासीयांना तोंड द्यावे लागत आहे. यामध्ये खड्ड्यांबरोबर वीज समस्या सध्या सर्वाधिक नागरिकांना भेडसावत आहेत. भरपावसाळ्यात बत्ती गुल होत असल्याने अंधारात रात्र काढावी लागत आहे. शिवाय वीजबिलदेखील अधिक येत असून, ते वेळेत न भरल्यास दंडदेखील आकारला जात आहे. वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. पेण नगर परिषद दरमहा १६ लाखांचे वीजबिल देयक भरूनसुद्धा वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यातच आता सण, उत्सवाचे दिवस जवळ आले आहेत. त्यामुळे वीज गायब होत असल्याने गणपती कारखानदारांची डोकेदुखी वाढली आहे. अशा विविध प्रश्नांचा भडीमार महावितरणच्या अधिकाऱ्यांवर या वेळी उपस्थितांनी केला. आमदार रवींद्र पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरून येथील वीजपुरवठा योग्य पद्धतीने सुरळीत करावा, असे निर्देश दिले. त्यानंतर महावितरणचे अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड यांनी विभागातील शाखा अभियंत्यांना सूचना करीत येत्या आठवडाभरात सर्व प्रलंबित कामे पूर्ण करावीत. येणारे सण, उत्सव याकरिता कोणत्याही तक्रारी येता कामा नयेत अन्यथा कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे निर्देश दिले. या वेळी बैठकीला आमदार रवींद्र पाटील, प्रांताधिकारी प्रवीण पवार, वीज मंडळ अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड, पेण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील, माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील, बाजार समिती सभापती महादू मानकर, जि. प. सदस्य डी. बी. पाटील, प्रभाकर म्हात्रे आदींसह नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
............
कॅरम स्पर्धेत राजेश गोहील अंतिम विजेते
पोयनाड, ता. २२ (बातमीदार) : पोयनाड येथे नुकतेच रायगड जिल्हा कॅरम असोसिएशन व झुंझार युवक मंडळ पोयनाड यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. नथुरामभाऊ पाटील यांच्या जयंतीनिमित्त कॅरम दिन म्हणून जिल्हास्तरीय पुरुष एकेरी कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कामोठे येथील राजेश गोहील यांनी अंतिम विजयी होण्याचा मान मिळवला. राजेश गोहील हे आंतरराष्ट्रीय मानांकनप्राप्त असलेले खेळाडू आहेत.
अंतिम सामन्यात त्यांनी सचिन नाईक यांचा पराभव करून अंतिम विजेतेपद पटकावले आहे. त्यांना रोख रुपये सात हजार व झुंझारचे माजी अध्यक्ष अन्वर बुराण स्मृतिचषक देऊन गौरविण्यात आले. उपविजयी ठरलेले पनवेलचे सचिन नाईक यांना रोख पाच हजार व चषक बक्षीस म्हणून देण्यात आले. तृतीय क्रमांक अलिबागच्या देवेन सिनकर यांना तर चतुर्थ क्रमांक श्याम घायवत यांनी पटकावला आहे. स्पर्धेतील पाचवा क्रमांक सुरेश बिस्त, सहावा क्रमांक निखिल कोशिमकर, सातवा क्रमांक अभिजित तुळपुळे तर आठवा क्रमांक आशीष देशमाने यांनी पटकावला आहे. स्पर्धेत ९ ते १६ क्रमांकावर असणाऱ्या खेळाडूंना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील १६८ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष गिरीष तुळपुळे, सचिव दीपक साळवी, मनोहर पाटील, सहसचिव अभिजित तुळपुळे, झुंझार युवक मंडळाचे सचिव किशोर तावडे, तहसीन बुराण, क्रीडाप्रमुख नंदकिशोर चवरकर, अजय टेमकर, योगेश चवरकर यांच्यासह खेळाडू व कॅरमप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.