शिधावाटप धान्याची बेकायदा विक्री
घाटकोपर, ता. २२ (बातमीदार) ः शिधावाटप धान्याच्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश करत १८२ किलो तांदूळ जप्त केला आहे, तर या प्रकरणात घाटकोपर पोलिसांनी शराफत अली मोहम्मद नबी शाह आणि खेमचंद लखनलाल अग्रवाल यांना अटक केली आहे. सामाजिक कार्यकर्ते योगेश मौर्य यांच्या सतर्कतेमुळे ही कारवाई झाली. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
घाटकोपरमधील जीवदया लेन येथील अगस्ती भवन परिसरात संशयित टेम्पो आढळला होता. त्यात ८६८३.०६० किलो तांदूळ आढळून आला, ज्याची किंमत सुमारे ३.५४ लाख रुपये आहे. आरोपीने एफसीआय गोदामातून २४० तांदळाच्या गोण्या उचलून अधिकृत दुकानात वितरित केल्या, तर उर्वरित खासगी दुकानात विकल्या होत्या. घाटकोपर विभागात हे धान्य बेकायदेशीररित्या हलवण्यात आले होते. धान्याच्या गोण्यांवर ‘फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया फोर्टिफाईड राईस’ असे छपाई केलेली होती. याप्रकरणी शिधावाटप अधिकारी चैतन्य वानखेडे यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.