महामार्गातील अर्धा रस्ताच गायब

महामार्गातील अर्धा रस्ताच गायब

Published on

महामार्गाचा अर्धा रस्ता गायब
ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह
मोहिनी जाधव ः सकाळ वृत्तसेवा
बदलापूर, ता. २२ (वार्ताहर) : बदलापूर-वांगणी यादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली सुरू असलेल्या महामार्गाचे काम अर्धवट राहिल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. काही ठिकाणी रस्ता रुंद, तर पुढच्याच पट्ट्यात अरुंद बनवला गेला आहे. यामुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

बदलापूरकडून कर्जत-पुणे मार्गावर जाणाऱ्या महामार्गात कासगावजवळ ३०० ते ४०० मीटर भागात रस्ता अरुंद बनवला गेला आहे. लगेच पुढे तो रुंद होत असल्याने रचनेतील असमतोल स्पष्टपणे जाणवतो. महामार्गामध्ये समान लांबी-रुंदी असणे आवश्यक आहे; मात्र येथे रस्त्याचा अर्धा भाग जणू कापल्यासारखा वाटतो. याशिवाय रस्त्याच्या कडेने वाहनांना दिशा देणारी पांढरी पट्टी टाकलेली नाही.
महामार्गाच्या दोन्ही बाजूला पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी गटारे असणे आवश्यक असते, मात्र या मार्गावर एकही गटार आढळत नाही. त्यामुळे रस्ता नेमका कशासाठी बांधला यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अपघाताची भीती
संबंधित रस्त्याचे काम दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले आहे; मात्र अद्यापही ते पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या ठिकाणी रस्ता अपूर्ण स्थितीत तसेच रस्त्याचा अर्धा भाग कापलेला भासत आहे.
बदलापूर ते कर्जत पुढे पुणे असा महामार्ग असल्याने या महामार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते; रस्त्याच्या कडेला प्रकाशव्यवस्था नाही, तसेच पांढरीपट्टी मारलेली नाही. त्यातत रस्ता व बाजूची जमीन यामध्ये एक फूट अंतर असल्याने वाहन घसरल्यास गंभीर अपघाताची शक्यता आहे. यामुळे हा महामार्ग वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

मोबदलाच मिळाला नाही
रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी निधी मिळवून दिला असला तरी अनेक शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा मोबदला दिला नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला देणे अपेक्षित आहे; मात्र अनेक शेतकऱ्यांना मोबदला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळाला नसल्याची तक्रार ग्रामस्थ करत आहेत.

रस्त्याच्या कामात गटारे, संरक्षण पट्ट्या व योग्य रस्त्याची लांबी-रुंदी यांची नोंद नाही. तसेच शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा प्रश्नही अनुत्तरीत आहे. त्यामुळे आम्ही शेतकरी एकत्र येऊन या कामाला विरोध करत आहोत.
-राकेश टेंबे, ग्रामस्थ

शेतकऱ्यांच्या मोबदल्याबाबत माहिती घेत आहोत. रस्त्याच्या कडेला पांढऱ्या पट्ट्या आणि काही गटारांचे काम बाकी आहे. काही गटारांचे प्रस्ताव नव्याने सादर करण्यात येतील. लवकरच हे काम पूर्ण करण्यात येईल.
-प्रशांतकुमार मानकर, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com