बसस्थानकातील खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांची कसरत
बसस्थानकातील खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांची कसरत
खोपोली नगरपालिकेचे दुर्लक्ष, अस्वच्छतेमुळे प्रवासी हैराण
खोपोली, ता .२२ (बातमीदार) ः नगरपालिकेचे सिटी बसस्थानक सध्या समस्यांच्या गर्तेत असून त्याचा फटका प्रवासी विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना बसतो आहे. बसस्थानकात मोठमोठे खड्डे पडले असून पावसाचे पाणी साचल्याने प्रवाशांना अक्षरशः कसरत करावी लागते. खड्डे टाळण्याच्या नादात प्रवासी घसरून पडणे, जखमी होते, असे प्रकार घडतात. याबाबत नगरपालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता, कराराचा अटी-शर्तीनुसार बसस्थानकाची देखभाल व डागडुजीची जबाबदारी परिवहन सेवा ठेकेदारांची असल्याचे सांगण्यात येत आहे.
सिटी बसस्थानकातील निवारा शेडची दुरवस्था, बिघडलेली सार्वजनिक स्वच्छता येथील शौचालय , मुतारीची झालेली दुरवस्थेमुळे प्रवासी त्रस्त आहेत. पावसामुळे अनेकदा बसचे वेळापत्रक कोलमडते, अशा वेळी प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते. बसस्थानकाच्या देखभाल व डागडुजीची जबाबदारी परिवहन सेवा देणाऱ्या ठेकेदारांची आहे. मात्र हे कामे वेळेवर करून घेण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची असल्याचे आपचे नेते डॉ. रियाजखान पठाण यांनी सांगितले.
सिटी बस स्थानकातील खड्डे बुजवण्यासाठी बारीक खडी व रेती टाकण्यात येईल. याबाबत त्वरित कार्यवाहीसाठी बांधकाम विभागाला आदेश दिले जातील.
- डॉ पंकज पाटील, मुख्याधिकारी, खोपोली
खोपोली : बस स्थानकात पडलेल्या खड्ड्यांतून विद्यार्थ्यांना मार्गक्रमण व्हावे लागते.